वाचताना वेचलेले
☆ सत्संग म्हणजे काय — ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना सहज विचारले- — ” देवा सत्संग सत्संग म्हणतात त्याचा एवढा काय हो महिमा?”
यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. नारद मुनी त्या कीटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकाला विचारले-
“सत्संगाचे काय फळ आहे तुला माहित आहे का?”
—कीटकाने त्यांचेकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला.
प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णाकडे आले, म्हणाले, “ देवा तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला. आता तुम्हीच उत्तर सांगा.”
देवांनी नारदांचे म्हणणे ऐकून घेतले, आणि ते म्हणाले, ” तेथे पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिलू आहे. ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.” नारदमुनी त्या पोपटाचे पिलाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचेकडे पहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच.
नारदमुनी मनाशीच विचार करू लागले ‘ काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे. कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला? ते मृत्यू पावले.’
अत्यंत दु:खी होऊन ते पुन्हा श्रीकृष्णापाशी आले. म्हणाले, “देवा आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू. पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत – अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात ?”
तेव्हा देव त्यांना म्हणाले, ” त्याची चिंता तू करू नकोस. तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा, नुकताच तिथे एका गाईने बछड्याला जन्म दिलाय.. तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.”
दु:खी अन्त:करणाने नारदांनी तेथे जावून त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला. त्यानेही नजर वळवून त्यांचे कडे पहिले आणि ते तेथेच लुढकले.
नारद मुनी घाबरून देवांकडे कडे परत आले. तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून श्रीकृष्ण म्हणाले, “राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आला आहे. त्याचे कडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल.”
नारदांनी विचार केला, ‘आतापर्यंत कीटक, पोपट, व बछड्याच्या मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही.. पण राजकुमाराचे जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राणही संकटात येवू शकतात.’
तथापि देवाचे भरवश्यावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याचे कानात विचारले – “ सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो? “
प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला, “ मुनिश्रेष्ठ अजून आपण नाही समजलात ?
अहो आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो..आपण मला हा प्रश्न विचारला
आणि मी मेलो आणि पोपट झालो. नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात मेलो आणि मला बछड्याचा देह प्राप्त झाला. पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून सर्व देहामध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला — आणि पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले. हे सर्व आपल्यासारख्या संतांच्या दर्शनाचेच फळ आहे. ज्यांना आपल्या सारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत.”
— नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमाही कळला.
“नारायण नारायण” म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले, ” देवा जशी आपली लीला अगाध
तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्य आहे “
******म्हणून मित्रांनो जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे
**बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात.
**या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो.
**ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला.
**श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला.
**याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला.
***** आपण ज्या सोबत रहातो त्याच्या विचारांचा,रहाणीचा, वागणीचा, अंमल हा आपल्यावर होत असतो.
**संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात . संगत कशी हवी याचा विचार करावा…
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈