सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 52 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
९७.
मी जेव्हा तुझ्याबरोबर खेळत होतो,
तेव्हा तू कोण आहेस ते मी विचारलं नाही.
लज्जा आणि भीतीचा लवलेश माझ्या मनात नव्हता.
माझं जीवन चैतन्यमय होतं.
माझ्या मित्रासारखा तू मला सकाळी
लवकर उठवायचास,
गवताच्या पात्यां-पात्यांतून पळताना
माझ्यापुढं असायचास.
त्या वेळी तू जी गीतं गाण्यास,
त्यांचा अर्थ मी समजून घेतला नाही.
मी माझ्या आवाजात गात राहिलो.
त्या गाण्याच्या तालावर माझे ऱ्हदय नाचायचं.
खेळायची वेळ आता संपलीय.
आता माझ्यावर ही काय वेळ एकदम आलीय?
तुझ्या पायाशी सर्व नजरा वळल्या आणि
शांत तारकांतून सारं जग
आश्चर्यचकित होऊन पाहात आहे.
९८.
माझ्या पराभवाच्या पुष्पमाला व विजयचिन्हांनी
मी तुझा सन्मान करीन.
अपराजित होऊन निसटणं माझ्या कुवतीत नव्हतं.
माझा गर्व नष्ट होईल.
असह्य दु:खात माझं जीवन संपेल,
पोकळ बासरीप्रमाणं माझ्या ऱ्हदयातून सुस्काऱ्यांचे स्वर निघतील,
दगडातून अश्रू वाहतील याची मला खात्री होती.
कमळाच्या सहस्र पाकळ्या कायमपणे मिटून राहणार नाहीत.
मधाच्या गुप्त जागा खुल्या होतील, हे मला ठाऊक होतं.
निळ्या आकाशातून एक डोळा माझ्याकडे
टक लावून पाहिल आणि शांततेत मला बोलवेल.
माझं असं काहीच असणार नाही, काहीच नाही.
केवळ मृत्यूच तुझ्या पायी मला मिळेल.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈