सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ साठीनंतरचा अलिप्ततावाद  – लेखक : श्री सुहास पानसे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

मित्रहो,

बरेचदा ‘अलिप्त असणे’ आणि ‘आत्मकेंद्रित असणे’  या दोन गोष्टींमध्ये आपली गल्लत होते. माझ्यामते अलिप्त असणे म्हणजे  आपल्या आप्तांपासून दूर राहणे नाही, तर अलिप्त असणे म्हणजे आपल्या आसपास घडणारी(विशेषतः आपल्याला न रुचणारी) कुठलीही गोष्ट मनाला लावून न घेता, ती जशी आहे तसा तिचा मनोमन स्वीकार करणे !…

एक लक्षात असावे, माणसाचा स्वभाव सहसा बदलत नाही. स्वभावाला औषध नाही, हेच खरं आहे. सबब, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न न करता, त्या व्यक्तीला आपलं मानणे म्हणजे खरा अलिप्ततावाद !

पटायला अवघड वाटतंय ना? आता हे वाचा…

आपली मुले परदेशी आहेत. त्यांची वरचेवर भेट होणार नाही, प्रत्यक्ष भेट होणं शक्य नाही, हे त्यांच्यावर नाराज न होता आपल्या मनाला पटवून देणे ही अलिप्तता…

मुलं लग्नानंतर किंवा नोकरी व्यवसायाला लागल्यावर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात रमणार, यात गैर ते काय ? ते जर त्यांची कर्तव्ये त्यांच्या पद्धतीने पार पाडीत असतील, त्यांच्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेत असतील तर तक्रारीला जागा नसावी. निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते हे मान्य, पण त्यांनी प्रत्येक बाबतीत आपल्याशी चर्चा करावी, आपलेच ऐकावं असा हट्ट न धरणे ही पण अलिप्तता…

आपण आपली स्थावर-जंगम प्रॉपर्टी खूप  कष्टाने उभी केलेली असते, हे मान्य ! पण त्या सगळ्याचा उपभोग घेण्याची शक्ती कमी झाली असेल, तेव्हा त्या सगळ्याची आसक्ती न बाळगणे ही सुद्धा अलिप्तता…

आपल्या घरामध्ये खूप वस्तू असतात. कधी Marketing tricks मुळे तर कधी कुटुंबियांच्या आग्रहाखातर खरेदी केलेल्या, कधी emotional attachment तर कधी अजून काही. अशा अनेक कारणांनी घरात अनेक वस्तूंची दाटी झालेली असते. अशा वस्तूंमध्ये जीव अडकवून न ठेवता वेळीच त्या गरजू व्यक्तींना आनंदाने देऊन टाकणे, ही देखील अलिप्तता…

काही काळापूर्वी आपल्या विचारांची, आपल्या दृष्टिकोनांची शेजाऱ्यांबरोबर, मित्रांबरोबर, नातलगांबरोबर,  सहकाऱ्यांबरोबर देवाण घेवाण करणे ही अगदी सहज प्रक्रिया होती. आज परिस्थिती बदलली आहे. कोणी कोणाशी फारसं बोलत नाही, चर्चा करत नाही, सल्ला मागत नाही किंवा बरेचदा साधा सुसंवादही घडत नाही. अशावेळी हे सगळं झालंच पाहिजे असा दुराग्रह न धरणे, ही खरी अलिप्तता…

जेथे नाते आहे, तेथे ममत्व आहे. जेथे ममत्व आहे, तेथे आपलेपणा आहे. जेथे आपलेपणा आहे, तिथे भावनिक गुंतागुंत आहे. जिथे भावनिक गुंतागुंत आहे, तिथे राग, लोभ, दुःख हे साहजिकच येणार. पण हे नाते, हे ममत्व, हा आपलेपणा आणि पर्यायाने येणारी भावनिक गुंतागुंत याकडे जssरा दुरून बघता आलं तर ती अलिप्तता…

असं अलिप्त होणे म्हटलं तर अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूच्या झपाट्याने बदलत जाणाऱ्या सामाजिक परिस्थितीचा तार्किक अंगाने अभ्यासपूर्ण  विचार केला तर आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने  हे साध्य करणे क्रमप्राप्त आहे, हे सहज पटेल. असा अलिप्ततावाद अंगिकारता आला तर आपल्याच नव्हे तर आपल्या आप्तजनांच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील त्याचा सकारात्मक परिणाम झालेला तुम्हाला दिसून येईल. एवढंच नाही, तर उतारवयात कुटुंबापासून, समाजापासून, मित्रपरिवारापासून आपण तोडले गेलो नसल्याची जाणीवही तुम्हाला आनंद आणि समाधान देऊन जाईल, हे नक्की !

बघा, पटतंय का !

लेखक :श्री सुहास पानसे

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments