?  वाचताना वेचलेले ? 

☆ ओंजळ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, करतल भिक्षा घेत असत’

‘करतल ‘ म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल इतकी..

मला हा शब्द खूपच आवडला..

म्हणजे प्रत्येक गोष्टीत समाधान मिळण्यासाठी जास्तीत जास्त माप म्हणजे ‘करतल’ असावे असे मनात आले.

करतल म्हणजे ओंजळभर !

आता हेच पहा ना.. 

खूप तहान लागली आणि ओंजळभर पाणी प्यायले तरी तृप्ती होते.

इतकंच काय ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो.

आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती होते..

 

म्हणजे खूप दुःख झाले की आपल्याच ओंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की मन हलके झालेच म्हणून समजा..

आणि कधी एखादा सुलज्ज चेहरा ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच दूर करतो..

 

बाप रे… केवढे महत्व आहे ना ह्या ओंजळीचे..

 

म्हणजे परमेश्वरानेच खऱ्या समाधानाचे हे परिमाण आपल्याला ठरवून दिले आहे आणि त्याचा विसर पडता कामा नये असेच पटकन मनात आले.

 

दुसऱ्या च्या ओंजळीने पाणी पिऊ नये वगैरे वगैरे ह्या विचाराशी विरोधाभास दाखवणारे शब्द प्रयोग आहेत म्हणा…

 

पण आपण नेहमी राजहंस होऊन मोत्यांचा चारा टिपावा असे वाटते त्यामुळे त्या कडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केलेले बरे!

 

ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांती साठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि ‘पसायदान’ मागितले…l

आज लिहायला बसलो आणि माझ्या ओंजळभर शब्दांना दाद देणाऱ्या तुमच्या सगळ्यांची आठवण आली..

म्हणजे माझे ओंजळभर शब्द मी तुमच्या ओंजळीत टाकतो आणि तुमची भरभरून दाद मिळाली की त्याचे सोने होते..

 

आज तुमच्या हातात ओंजळ रिती केली आणि आपसूक हात मिटले गेले..

परमेश्वरासमोर जोडतो ना तसेच!

आणि मग मन भरून आनंदाची अनुभूती झाली हे वेगळे काय सांगू?

 

लेखक :  अनामिक

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments