वाचताना वेचलेले
आयुष्य अजिबात कठीण नसतं… लेखक : श्री विजय बोंगिरवार ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई
कधी नळाला पाणी नसतं…
कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं…
कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .
कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .
कधी जागा नसते . .
कधी जागा असून स्पेस नसते . .
कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची ऊब नसते . .
कधी डब्यात आवडती भाजी नसते . .
कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . .
दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .
कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . .
कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्यासारखे वाटते . .
कधी काही शब्द कानावर पडतात . .
कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .
कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .
कधी आपण कसे वागायचे समजत नाही . .
कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .
कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . .
कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .
कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . .
कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .
कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .
कधी समोरचा आपल्याला अकारण हक्काचा वाटू लागतो. .
कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .
कधी पैसा असला, की नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली, की त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत, म्हणून जीव हिरमुसतो
. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ?
ताण घेतला तर तणाव . .
आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याचं काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करते.
आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात रहावं
या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं …. –
लेखक : श्री विजय बोंगिरवार
संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈