श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ उसळ-चपाती…  ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एकदा भीमसेन जोशी (अण्णा) गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.

तेवढ्यात अण्णा म्हणाले, “आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या. . !”

रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली. . मंडळी गाडीतून उतरली.

अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा. . !

अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं. . अण्णा म्हणाले, ‘काय, कसं काय? ओळखलंत का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही. . ‘ अण्णा कानडीतनं बोलत होते.

रामण्णाही ओळखीचं हसले. . थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं. . आणि त्यांचा निरोप घेतला. .

साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला –

“इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.

स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा. . आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली”.

“उसळ-चपाती पाहिजे काय?”, असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.

रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार. . !”

“घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा. . !”

“जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही.

रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची ?”

रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती. . साथीदार मंडळी गप्प होती. . गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहेर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते. .

रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.

तात्पर्य – हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर असावेत.🙏🏻

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments