श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ ध चा मा ?… लेखक श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

आमच्याकडे एअरपोर्टला (इंडियन एयरलाईन्स) कधी कोणती घटना अचानकपणे वावटळीसारखी अंगावर येईल, याबद्दल भविष्य वर्तवणे मोठ्या मोठ्या ख्यातनाम ज्योतिषाचार्यांनाही शक्य होणार नाही.

त्या दिवशी पण तेच झाले. दुपारच्या (आफ्टरनून) शिफ्टला मी ड्युटी मॅनेजर होतो. आमची सर्व डिपार्चर फ्लाईटस व्यवस्थित वेळच्या वेळी निघाली होती. येणारी फ्लाईटस पण वेळेवर होती. त्यामुळे सर्व कर्मचारी अतिशय उत्साही, आनंदी मूडमध्ये होते. संध्याकाळच्या पांच वाजताच्या हैद्राबाद फ्लाईटची “प्रवाश्यांनी विमानाकडे प्रस्थान करावे” ही अनाऊन्समेंट झाली होती. तेवढ्यात वॉकीटॉकीवर बोर्डिंग पॉईंट स्टाफचा आवाज आला. “Coordination Cell, Base Coordination, Duty Manager all to note, a lady passenger wants to cancel her journey to HYD on flight IC117 on health ground.”

हा मेसेज ऐकताच मी कपाळाला हात लावला. या क्षणाला प्रवास रद्द करणे म्हणजे त्या महिलेचे बॅगेज विमानातल्या बॅगेज होल्डमधून असंख्य बॅगमधून शोधून खाली उतरवायचे. मग बोर्डिंग लिस्टमध्ये फेरफार करायचे. म्हणजे एकूणच फ्लाईटला उशीर होणार. 

पांचच मिनिटांत पुन्हा  वॉकीटॉकीवर त्याच स्टाफचा आवाज घुमला. “Duty Manager please rush to Boarding gate area. It’s an emergency situation. The lady passenger is having heated arguments with Tarmac Officer Bannerjee.” 

आता काय नवीन प्रॉब्लेम आला? मी बोर्डिंग गेटच्या दिशेने धांव घेतली. आमचा बॅनर्जी नांवाचा ऑफिसर त्या महिला प्रवाशाशी कांहीतरी बोलत होता. ती महिला प्रचंड भडकलेली होती. मला कांहीच कळेना की तिची सफर रद्द करण्यामध्ये एवढं भडकण्यासारखं काय झालं असेल. मी त्या महिलेला कांही विचारणार तोच बॅनर्जी तिला म्हणाला “ ऑप इतना गडम क्यूँ होता हाई म्हातारीअम्मा ? हाम आप को सिर्फ टांग उपर करने को बोला.” 

यावर ती महिला उसळली. “बेशरम आदमी हम को टांग उपर करने को बोलता है ? मै तुम को जमीन मे जिंदा दफना देगी. एयरलाईन्स का ड्रेस पेहना तो खुद को बादशहा समझाने लगा क्या ? और मै तुम को बुढ्ढी लगती हूँ ?” 

मी त्या महिलेला हाताच्या इशाऱ्याने शांत व्हायला सांगितले. “क्या हुवा बेहन जी ? आप मुझे बताइये . मै आप की मदद करुंगा . प्लीज आप गुस्सा मत होईये. इन्हे हिंदी मे ठीक तरह  से बातचीत करने नही आती. इसलिये ‘मोहतरमा’ के बदले ये ‘म्हातारी अम्मा’ कह गये. मै उन की तरफ से माफी मांगता हूं . ” 

माझ्या या सांगण्यावर ती महिला थोडी शांत झाली पण चढ्या आवाजांत म्हणाली “मेरे दांत मे बहोत दर्द है . मै सफर नही कर सकुंगी. बस इतना मैने इन जनाब से कहा, तो उन्होने मुझे टांग उपर करने को कहा. क्या ऐसे बेहुदा बाते करनेवाले अफसर आपने तैनात किये है ? मै उपरतक इनकी कम्प्लेंट करूंगी.”

मला आश्चर्याचा धक्का बसला. बॅनर्जी म्हणजे देवमाणूस. त्याच्या तोंडात कधी शिवीसुद्धा नसायची. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची शिकवण त्याच्या बोलण्यात सदैव असायची. हा माणूस असं कांहीतरी अभद्र बोलेल यावर विश्वास बसत नव्हता.

मी बॅनर्जीला म्हणालो, “यार पहलेही सिच्युएशन खराब है. और क्यूँ इसे बिगाड रहे हो ? इस लेडी को टांग उपर करने को क्यूँ कहा आप ने ?” 

यावर बनर्जीने जे उत्तर दिले ते ऐकून मला हंसावे की रडावे ते कळेना. 

तो म्हणाला “ मुझे डेंटल प्रॉब्लेम की एक आयुर्वेदिक दवा मालूम है. मुझे भी कभी कभी ये प्रॉब्लेम होती है. इसलिये मै वो दवा हमेशा मेरे पास रखता हूं. मैने लेडी को बोला टांग उपर करो. असं म्हणून बनर्जीने आपली अख्खी जीभ बाहेर काढली. ये … ये … इस को बोलते है ‘टांग’ रेगे साब. वो ‘टांग’ उपर करेगी तो मुझे मालूम पडेगा स्वेलिंग किधर है. फिर उधर ये गोली रख के मूंह बंद रखनेका. बस्स दस मिनिटमे दोर्द गायब होता है.” 

अरे देवा !! म्हणजे हा सद्गृहस्थ जीभेला ‘टांग’ म्हणत होता, टंगच्या ऐवजी. आणि ती महिला हिंदी ‘टांग’ समजली होती. आता चारचौघात “टांग उपर करो” म्हटल्यावर कोणीही भडकेल. पण ‘टंग’चा बंगाली उच्चार “टांग” होऊ शकतो, ‘वडा’चा उच्चार ‘बोडा’ होऊ शकतो, अनिलचा उच्चार ‘ओनील’ होतो, ‘चाय पिओगे’चं ‘चाय खाबे’ होऊ शकतं, ‘कवी’चा ‘कोबी’ होऊ शकतो हे मला ठाऊक होते. मी त्या महिलेला हळू आवाजांत हा सर्व भाषिक घोटाळा नीट समजावून सांगितला. बॅनर्जीने दिलेल्या गोळ्या तिला दिल्या आणि त्या दुखऱ्या जागी ठेवून द्यायला सांगितल्या. ती महिला हे ऐकल्यावर खूप ओशाळली. शाब्दिक गैरसमजातून एका सज्जन माणसाला आपण नको नको ते बोललो, याचा खेद तिला होत होता. पुन्हा पुन्हा बॅनर्जीला सॉरी … सॉरी … म्हणत, ती विमानाच्या दिशेने चालू लागली. बॅनर्जीच्या ‘टांग’ने आमच्या फ्लाईटच्या उड्डाणात अडवली जाणारी कॅन्सलेशनची ‘टांग’ नाहीशी केली. पण यानंतर आमच्या ऑफिसांत ‘टांग उपर करो’ हा परवलीचा शब्द झाला. कोणी साधं ‘डोकं दुखतं आहे’ असं म्हणाला, तरी समोरचा त्याला म्हणायचा ‘टांग उपर करो’ आणि पाठोपाठ सर्वांच्या हास्याचा धबधबा कोसळायचा. 

लेखक : श्री अनिल रेगे

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments