सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रवास… साैजन्य : सुश्री जयंती यशवंत देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

बस सुटणार, एवढ्यात एक तरूण घाईघाईने बसमध्ये शिरला. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती.   हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती. ती थोपवताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला झोकून दिले. त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या वृध्दाला अडचण होतेय का,याचा जराही विचार न करता, स्वतःच्या बाजूला आणि त्या वृध्दाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच पिशव्या कोंबल्या. तो वृध्द अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला. इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरफडत पहात होते.

साधारण तासाभराच्या प्रवासानंतर तो तरुण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला. तो वृध्द आता थोडा सैल होऊन बसला. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकुतलेल्या चेह-यावर दिसत नव्हता.

न राहवून मी त्या वृध्दाशेजारी जाऊन बसले आणि म्हणाले, ” आजोबा, तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचले आणि जाताना साधे आभार मानण्याचेही सौजन्य दाखवले नाही. तुम्ही हे एवढे का सहन केले. . ?”

चालत्या बसमधून खिडकीबाहेर पहात त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिले. चेह-यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले,

” आपला प्रवास किती घडीचा असतो?

निर्धारित थांबा आला, की तो किंवा मी उतरून जाणारच होतो. आता तो अगोदर उतरून गेला. मग एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला. ? जमेल तेवढा सहप्रवास सुखाने, सामंजस्याने करायचा. त्याचा दोघांनाही त्रास होत नाही. !”

आजोबा बोलत राहिले. मी स्तब्ध होऊन शब्द न् शब्द मनात साठवत राहिले. . .

” बाळ, जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे. जीवन असतेच दो घडीचे. !

जन्माच्या वेळी वाटल्या जाणा-या मिठाईपासून या प्रवासाची सुरूवात होते आणि श्राध्दाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस,हाच जीवनाचा गोडवा. . !

त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण. . !

बाळ,या दोन्ही वेळी आपण स्वतः त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाही. मग मधल्या काळात येणारे  कडू-गोड क्षण. . त्याचा सारखाच आनंद घेत जगता आले पाहिजे. !

अनेक माणसं भेटतात या प्रवासात. . त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न असतात. . त्यातली काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात. त्यात गणगोत, नातलग आले. . काही कसलीही नाती नसताना सहज भेटली तरी ती मनात घर करणारी असतात. कधी जवळचे म्हणणारे साथ सोडतात. . त्यासाठी कारणच हवं, असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळी. . त्यांचा पिंड निराळाच असतो. आपण नेहमी लक्षात ठेवावं, अशी साथ देणारी माणसं कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी कधी साथ देत नाहीत. . !

जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असतं. . ते जेवढं वाट्याला येईल, तेवढं आनंदानं जगून घ्यावं; म्हणजे कोणी सामानाचे असो, की विचारांचे. . ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही. या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कला आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते. “

रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत,तर कधी खिडकीतून मागे पळणा-या झाडांकडे. . खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते.

थोडा वेळ स्तब्धतेत गेला. ते कसल्यातरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे, म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होते.

त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली,

” बघ ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा. . पुढे वय वाढत गेलं, की सुखाच्या बाबतीतही तेच होतं. . वास्तविक दोन्ही तिथंच असतात. फक्त आपण धावत असतो. !

धावण्याची शर्यत जणू. त्यात कधी कधी धरून ठेवावे, असे हात निसटून जातात. लक्षात येतं, तेव्हा उशीर झालेला  असतो. . पण एक मात्र खरं. व पु एके ठिकाणी लिहितात,

 ” जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून      चालत नाही. ती दोघांनाही असावी लागते. कारण  ‘भाळणं ‘ संपल्यावर उरतं ते ‘सांभाळणं. . ‘ हे सांभाळणं ज्याला जमलं, त्यालाच ‘जीवन जगणं’ कळलं. . !”

असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं, काय माहीत. .

बसचा शेवटचा थांबा आला. दोघेही खाली उतरलो. दोन पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले. . सावरले. दाटल्या स्वरांत म्हणाले, “पोरी, अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत गं. . !”

मीही उत्तरादाखल पुटपुटले, ” आजोबा, ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं, असे पाय देखील दुर्लभ झालेत हो. . !”

 दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणा-या. .

आपापली वाट चालता चालता आकृत्या धूसर होईपर्यंत दोघेही पुनः पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो.

” दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. . . “

साैजन्य  :सुश्री  जयंती यशवंत देशमुख

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments