सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सारथी… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

दोन दिवसांनी तो घरी आलेला. दहा बाय बाराचं त्याचं घर. बायको, लेक आणि तो.

त्याच्या खोलीबाहेरची ती गॅलरी. दरवाजाला लागून गॅलरीत आडवी पडलेली कॉट. कॉटवरचा त्याचा म्हातारा बाप. आयुष्यभर हातगाडी खेचत रस्ता मागे ढकलला त्यानं. थकला तो आता.. पायातलं त्राणच गेलंय त्याच्या आता. खुरडत खुरडत रांगत जातो तो.. अगदीच परावलंबी नाही तो… जरी असता तरी काळजी नव्हती. त्याचा खूप जीव होता बापावर.

त्याच्यासाठी वाट्टेल ते केलं असतं त्यानं.

त्याची बायकोही त्याच्यासारखीच.

सासरा नाही माझा बापच आहे असं समजणारी.

म्हातारा बिचारा कॉटवर बसलेला असायचा दिवसभर.

नातीला गोष्ट सांगायचा..

 

बापानं काबाडकष्ट केले म्हणून..

तो बारावी सायन्स तरी झाला.

पुढचं शिक्षण नाही झेपलं त्याला. आणि

तसा डोक्यानं मध्यम.

 

नोकरी नाही म्हणून घरी बसला नाही. पेपरची लाईन टाकायला सुरवात केली.

साहेब….

खरं तर साहेब त्याच्यापेक्षा वयानं फार मोठे नाहीत. फार फार चाळीस. पण प्रचंड हुश्शार. फार्माचा धंदा.जोरात चाललेला. फार्मा लेनमधे भलंमोठ्ठं ऑफीस.

एक दिवस साहेबांनी थांबवलं त्याला.

‘किती दिवस पेपर टाकणार आहेस अजून ?

ड्रायव्हिंग शिकून घे. मी पैसे देतो. गाडी चालवायला लागलास की, माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचं. उपकार वगैरे करत नाहीये मी.

तुझ्या पगारातून कापून घेईन मी.”

जमलं.अगदी सहज.

सहज गाडी चालवायला शिकला.

साहेबांकडे कामालाही लागला.

साहेबांना माणसाची चांगली पारख.

साहेब सांगतील तसं…

तो कधीच नाही म्हणायचा नाही.

साहेबांचे दौरे असायचे.

सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, बेळगाव…

चार चार दिवस टूर चालायची.

त्याची काहीच तक्रार नसायची.

हातगाडीवाल्याचा पोरगा

आता ड्रायव्हर..

प्रमोशनच की….. आता बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. झोपडपट्टीतून चाळीची एक खोली. पक्क्या भिंती, पक्कं छत. छान संसार सुरू झाला.

काही महिन्यांनी साहेबांनी एक दिवस पुन्हा बोलावलं.

“किती दिवस ड्रायव्हरची नोकरी करणार आहेस ?

यापुढे तुझी ड्युटी फक्त सकाळी आणि संध्याकाळी.

सहा ते दहा.

मधल्या वेळेत कॉलेज करायचं.

डी फार्मसी करून टाक.

फी मी भरीन. पण हे बघ… पुढच्या पगारातून कापून घेईन..”

साहेबांनी सांगितलं ना..

मग करायचंच.

तीन वर्ष फार ओढाताणीची गेली..

अभ्यास, नोकरी आणि संसार…..

जमवलं कसंबसं.

आणि तो “डी फार्म” झाला.

साहेबांकडची ड्रायव्हरची नोकरी चालू होतीच. रिझल्ट लागला. साहेबांना पेढे नेऊन दिले. साहेब खूष.

“गाडीची किल्ली दे इकडे. उद्यापासून मला ड्रायव्हरची गरज नाही. सिटी हॉस्पीटलमधलं मेडीकल आपण चालवायला घेतलंय. आपला माणूस आहे तिथं..

दोन तीन महिन्यात सगळं शिकून घे. नंतर मात्र तुलाच सगळं सांभाळायचंय..

तीन महिन्यानंतर तुला चांगले पैसे मिळायला लागतील.

आजच सुप्रभा बिल्डरकडे जायचं.

गंगापुररोडला स्कीम होत्येय त्यांची.

मी बोललोय त्यांच्याशी. तिथं एक वन बीएचके बुक करायचा.

असे किती दिवस भाड्याच्या घरात रहायचं ?

हफ्ता तुझ्या पगारातून कट होईल.”

ठरलं तर.

साहेबांनी सांगितलं तसंच होणार.

‘बरं..’

नेहमी तो एवढंच म्हणायचा. आणि चालू लागायचा. आज मात्र तिथंच घुटमळला.

“साहेब,

मी तुमची गाडी चालवली.

तुमी माझ्या जीवनाच्या गाडीला, चांगल्या रस्त्याला लावली.

मी कसं आभार मानू तुमचं ?”

साहेब पहिल्यांदा दिलखुलास हसले…

“म्हणजे मला पण तू ड्रायव्हर करून टाकलंस की.

हरकत नाही..

अरे सगळ्यात मोठा ड्रायव्हर तो श्रीकृष्ण.

मी आपली त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो.

ते जाऊ दे. उपकाराची परतफेड कशी करणार ?

तू पण कुणाचा तरी ‘ड्रायव्हर’ हो.

तूही चांगला प्रामाणिक माणूस शोध.

त्याला योग्य रस्ता दाखव.

त्याची गाडी मार्गी लाव.

आणि आपल्या कंपनीच्या परिवारात सामील करून घे.”

हे अनमोल मार्गदर्शन ऐकून, सागरापेक्षा मोठा धबधबा डोळ्यात अडवून, तो घरी निघून गेला.

साहेबही निघाले. आज एका सेमिनारला जायचं होतं त्यांना. नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करणार होते साहेब. विषय होता…

“धंद्यासाठी चांगली विश्वासू माणसं कशी जोडावीत ?”

साहेब नुसतेच हसले आणि निघाले.

इतकी वर्ष साहेबांनी तेच तर केलं होतं…

“धंदे का राज” साहेब आज बिनदिक्कत सांगणार होते…

 जीवनात सारथी व्हा …!!!

… कुणाचे तरी..!!

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments