? वाचताना वेचलेले ?

☆ Be a CEO of your own life. लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

मी आणि ताई आम्ही दोघी बहिणी. मी पुण्यात तर ताई नाशिकला स्थाईक. आज आम्ही दोघी सिनियर सिटीझन आहोत. मी पासष्ट तर ताई सत्तरीला पोचली.

आयुष्याचा आतापर्यंतचा काळ कसा गेला? कळलंच नाही. घर परिवार आमच्या नोकऱ्या, मुलांची शिक्षणं, त्यांच्या नोकऱ्या, त्यांची लग्नं, नातवंडं, मुलांचे अमेरिकेत स्थायिक होणे, आमच्या अमेरिकेच्या फेऱ्या. म्हणजे आमच्या पारिवारिक सिनेमाच्या सोळा रिळापैकी चौदा रीळं तर जवळपास संपली, म्हटलं तरी चालेल.

आता आयुष्यात बऱ्यापैकी स्थिरता आली आहे. वय बोलू लागलं आहे. अमेरिकेचे ग्रीन कार्ड आम्ही घ्यावं, याबद्दल बऱ्याच चर्चेनंतर आता मुलांनी म्हणणं सोडून दिले आहे.

आम्ही अमेरिकेला येऊ, पण राहू आम्ही भारतातच. हे नक्की ठरलंय.

 ताई म्हणजे सौ. अनिता अजय देशपांडे यांचा नाशिकला मोठा बंगला आहे. रिटायरमेंट नंतर मागची पंधरा वर्षं त्यांनी बंगल्याचा पूर्ण उपभोग/ आनंद घेतला. त्यांच्या शेजारीच ताईचे मोठे दीर श्री अनिल देशपांडे यांचा बंगला. दोघी जावांचं छान पटतं. दोघांना एकमेकांच्या आधार आहे. बरोबर मोकळेपणाही आहेच. आता मात्र वयाप्रमाणे बंगल्याचे मेंटेनन्स करणं कठीण होतं आहे. त्यानंतर सेफ्टी, security चा प्रश्नही आहेच.

आतापर्यंतच्या सर्व पारिवारिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण झाल्या.

आता पुढे काय ? पुढे काय ?

आता स्वतः ची जबाबदारी स्वतःच घ्यायची वेळ आली आहे.

तरुणपणी बघितलेली स्वप्नं – ‘उच्चशिक्षित मुलांनी उंच भरारी घ्यावी’. ती पूर्ण झाली. आता त्या स्वप्नांचे साईड इफेक्ट दिसतायेत. मुलं जवळ नाहीत. तसं बघितलं तर पुण्यासारख्या शहरात प्रत्येक चौथ्या घरी हाच सीन आहे.

स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आपणच घेतलाय/ भोगलाय. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे स्वप्नांचे साइड इफेक्ट पण gracefully handle करावेच लागतील.

वयाच्या या नाजूक वळणावर, ‘पुढे काय ?’

या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. आता प्रत्येक दिवस वेगळा निघतो, शरीराचा प्रत्येक अवयव वेगळा रंग दाखवतोय. वेळेवर सावध होणे गरजेचे आहे.

आज ताईचा फोन आला. म्हणाली,

“अग! पुण्यातील जरा चांगल्या old Age Homes बद्दल विचारपूस करून माहिती पाठव. “

मी म्हटलं, “अग ताई !! हे काय आता, नवीन खूळ तुझ्या डोक्यात आलंय ? चांगला बंगला सोडून Old Age Home वगैरे काय ?”

ताई म्हणाली, “अग! का नाही ? आपले final destination old Age Home ठरविण्यात काय हरकत आहे ?

Safety, Security, medical help, डॉक्टरची सुविधा Dining Mess facility, same age group चे आपल्या सारखेच आपल्याला भेटणार, मग काय हरकत आहे ?

अग !!जसं जसं वय वाढत जाणार तसतसे अनेक प्रश्न समोर येऊ शकतात. आयुष्याचा हाही फेज आरामात पार पडावा, ही तर प्रत्येकाचीच इच्छा असते. पण तसे होईलच याची काही गॅरंटी आहे का ?

खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा, वास्तविकता लक्षात ठेवून आपली सोय करून ठेवावी. काही बदल, Planned Change ठरवून करायचे असतात.

हिवाळ्यात हीटर, उन्हाळ्यात कुलर / AC ची सोय करतो ना, तसंच काहीसं हे पण.

ही म्हातारपणाची सोय आहे, ” ताई म्हणाली,

Be a CEO of your own life. •••

Be your own BOSS. •••

माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतची जबाबदारी माझीच आहे ना!

अग !मुलांना आपली काळजी असतेच. पण ते आता आपली मदत कशी करू शकतील ? आपण आपली व्यवस्थित सोय केली तर त्यांना पण काळजी राहणार नाही.

बरं ! जेथे आपलीच मुले आपल्या जवळ नाहीत, तेंव्हा दुसऱ्यांवर भार टाकणंही बरोबर नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणाजवळच एवढा वेळ नाही/नसतो ग. अपेक्षा करणंच चूक आहे.

तेव्हा एखाद्या छान म्हणजे व्यवस्थित सर्व सोई जेथे उपलब्ध असतील, तेथे आपण रहायला जायचं, हे आम्ही ठरवलंय.

भविष्याची सोय करून, आपल्या मनाला जर आपण शाश्वत केलं. तर मन खंबीर राहतं. वर्तमान ही मजेत जगता येतं. मनाला खचू द्यायचं नाही.

‘Life is very unpredictable, ‘ हे लक्षात ठेवून हा निर्णय घेतलाय.

आयुष्यातील कोडी आपल्यालाच सोडवायची असतात.

लाइफचं हे प्रोजेक्ट आपल्यालाच successfully complete करायचं आहे. “

ताई एक वाक्य नेहमी म्हणते,

“कोणाच्या आयुष्यात Option म्हणून नाही जगायचं. नेहमी Perfect And Special जगायचं. “

प्रत्येक वळणावर जरा थांबून आपल्या आयुष्याचे Alignment करावं.

ताई म्हणाली,

“अग !!!

आता वृद्धाश्रम किंवा Old Age Home बद्दल विचार बदलले आहेत. ज्यांना त्यांची मुलं सांभाळत नाही, ते अशा जागी राहतात, हे असं कोणी आता समजत नाही. “

ताईचा हा निर्णय विचारात घेण्यासारखा आहे.

म्हणतात ना,

प्रार्थना ऐसे करें जैसे सब कुछ भगवान पर निर्भर करता है ।

परंतु प्रयास ऐसे करें जैसे सब कुछ आपपर निर्भर करता है।

लेखिका :सुश्री संध्या बेडेकर.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments