? वाचताना वेचलेले ?

☆ “एका वडीलांचे त्यांच्या मुलाच्या विवाहाबद्दल मनोगत….”  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  

नुकतेच – दि ३१ मार्च २०२३ ला माझ्या ज्येष्ठ मुलाचे लग्न झाले .

सोहळा खूप मोठा भव्य करण्याचा मनोदय नव्हता त्यामुळे आपल्या सर्वांना बोलावू शकलो नाही म्हणून क्षमस्व !

परंतु या निमित्ताने आम्ही – (मी – माझी पत्नी आणि मुले आणि वधू आणि त्यांचे वडिलधारे लोक अशा सगळ्यांनी ) मिळून काही गोष्टी लक्षपूर्वक आणि ठरवून करण्याचा प्रयत्न केला आणि तो देवाच्या आणि कुलस्वामिनीच्या कृपेने उत्तम रीत्या सफल झाला तो तुमच्या सगळ्यांशी समभागी (share ) करतो .

आम्ही असे लक्षात घेतले की – विवाह हा एक अत्यंत प्रमुख असा संस्कार आहे .

त्यामुळे हा संपूर्ण विवाह विधी हाच लग्नाचा मुख्य भाग असावा . 

 त्यात – सिनेमा – TV सीरियल – आणि आपले अज्ञान यांमुळे पुष्कळ गैर आणि रसभंग करणाऱ्या गोष्टी घुसल्या आहेत त्या टाळूया .

म्हणून – काही गोष्टी विचारपूर्वक केल्या आणि काही कटाक्षाने टाळल्या .

बँड – म्हणजे रणवाद्ये नकोत . मंगल आणि सुमधुर  वाद्याचे संगीत असावे . म्हणून सनई, सतार, बासरी यांचे आनंद उत्साह वाढवणारे संगीत पार्श्वभूमीवर ठेवले .

या विवाह संस्काराचे विधि अतिशय सुंदर आणि हृदयंगम आहेत .

त्यात सौंदर्य – मांगल्य – पावित्र्य – दूरदृष्टी – सगळं काही आहे .

परंतु आपणच ते विसरून गेलो आहोत .

म्हणून मी स्वतःच चार पाच महिने – विवाह विधींचा अभ्यास केला

त्याचे संकल्प – कृती – मंत्र यांचे अर्थ अभ्यासले – त्याला प्रमाण आणि आधार ग्रंथ वाचले .

ते वाचून मन भरून आले आणि असे प्रकर्षाने वाटले की सर्वांना हे विधी समजले पाहिजेत . 

म्हणून असे ठरवले की हा संपूर्ण विधी समजावणारे एखादे छोटेसे पुस्तक तयार करावे आणि प्रत्येकाला द्यावे . लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाचे आपण स्वागत करतो त्यावेळी हे पुस्तक स्वागताची भेट म्हणून प्रत्येकाला दिले .

आणि सांगितले की आपण इथे लग्नासाठीच वेळ काढून आला आहांत तेव्हा इथे बसल्या बसल्या – हे पुस्तक चाळा – त्यातलाच विधी आपल्या समोर चालू आहे तो बघा . त्याचा अर्थ इथे दिला आहे आणि समोर प्रत्यक्ष कृती होत आहे.

ही कल्पना आलेल्या सगळ्यांनाच आवडली आणि कित्येकांनी त्याच्या अधिक प्रती मागूनही घेतल्या .

प्रत्यक्ष वधू – वर एकमेकांना पुष्पमाला घालताना ऐन वेळी वधूला किंवा वराला उचलून घेऊन एक अनैसर्गिक मजा घेण्याची वाईट कृती लग्नात घुसली आहे . ही कृती करण्यासाठी काही उत्साही तरुण आणि मित्र वाटच पाहात असतात .

त्यांना आधीच फोनवर बोलून विधी किती सुंदर आहे हे समजावले आणि त्यांनाच विचारले की – इतक्या छान भावनांचा संगम होताना – त्या भावनांना विस्कटून टाकणारी – ऐन वेळी पुष्पमाला घालूच न देणारी – उचलून घेण्याची – कृती करायची का?  तेव्हा त्यांनी स्वतःहूनच सांगितले की आम्ही हे करणार नाही .

आपण जेव्हा मंगलाष्टके म्हणतो त्यावेळी अक्षता वाहातो . त्या अक्षता येणार्‍या आप्त स्वकीय – मित्र यांच्या शुभ ईच्छा आणि आशिर्वाद म्हणून – वधू वरांच्या डोक्यावर वाहायच्या असतात . पण ही गोष्ट माहीती असूनही आपण ती त्यासाठी काही आयोजन नसल्यामुळे करू शकत नाही – भावना मनात ठेवून आपण आहे तिथून अक्षता वाहाव्या लागतात आणि त्यामुळे वाहाणे बाजूला राहते आणि जोर लावून फेकाव्या लागतात . मनातील भावना कृतीत व्यक्त करु शकत नाही .

म्हणून आम्ही आणि विधी सांगणार्‍या गुरुजींनी पुढाकार घेऊन एक वेगळी संकल्पना प्रत्यक्षात केली – ती अशी :

मंगलाष्टकांच्या वेळी आलेत्या प्रत्येकाच्या हातात अक्षता असतील पण त्या त्यांनी प्रत्येक वेळी टाकायच्या नाहीत तर हातातच ठेवायच्या .

तसेच आलेल्या सगळ्यांनाच खुर्च्यांवर बसायला सांगितले – वधू वरांच्या बाजूला फक्त उपाध्याय – अंतर्पाट धरणारे आणि करवल्या एवढेच असतील .

त्यामुळे पुढे गर्दी झाली नाही .

बसल्या जागेवरून प्रत्येकाला पाहाता आले.

मंगलाष्टके झाल्यावर वधू – वरांचे पुष्पहार घालून झाले की – ते दोघे गुरुजींसह विधी मंडपातून  उतरून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या जवळ जातील त्यांना नमस्कार करतील . त्या त्यावेळी समोरच्या चार – पाच जणांनी त्यांच्या मस्तकावर त्या अक्षता सोडाव्या . यामुळे लग्नासाठी येणाऱ्या प्रत्येकालाच त्याच्या सदिच्छा आणि आशिर्वादरूप अक्षता वधू – वरांच्या प्रत्यक्ष डोक्यावर वाहाता येतील .

असे करत अगदी सगळ्यांना सुरुवातीच्या ओळीपासून शेवटी पर्यंत आणि पुन्हा परत शेवटच्या ओळीपासून पुढच्या ओळी पर्यंत येणारे आप्त स्वकीय  जिथे बसले आहेत तिथे जाऊन प्रत्यक्ष भेटून त्यांचा वधू-वरांनीच सन्मान केला . आणि भरभरून आशिर्वाद प्राप्त केले .

या सगळ्या कौतुक कृतीला सुमारे २०० जणांच्या जवळ जाण्यासाठी – त्यांना नमस्कार करून शांतपणे पूर्ण करण्यासाठी केवळ पंधरा  मिनिटे पुरली .

यामुळे – वृद्धांना त्यांच्या बसल्या जागी जाऊन नमस्कार करून त्यांचा मान राखता आला आणि नंतर वृद्धांना – रांगेत तिष्ठत उभे राहून वधू वरांना स्टेजवर भेटावेच लागले नाही .

प्रत्येकाला वधू वर जवळून बघताही आले .

आलेल्या प्रत्येकाच्या भावनांना प्रत्यक्ष कृतीची पूर्णता आली – तसे समाधान प्रत्येकाने बोलूनही दाखवले .

गुरुजींनीही विधीतील प्रत्येक कृती – त्याचा अर्थ त्या त्या वेळी थोडक्यात सांगितला .

पाणिग्रहण – कन्यादान – सप्तपदी या मागच्या भव्य आणि उदात्त कल्पना लक्षात आल्या .

त्यानंतर पंगतीमध्ये सर्वांनी सहभोजन घेतले . पंगतीला वाढणाऱ्यांना सुद्धा ही कल्पना आवडली आणि त्यांनीही अगत्याने आणि आग्रहाने वाढले .

आपण सर्व हे विसरून गेलो आहोत की विवाह हा एक उत्साह – चैतन्य – आणणारा समाजाला स्वस्थता देणारा मंगल असा संस्कार आहे . हे विसरण्याचा अजून एक दुष्परीणाम आपणच आणला आहे – तो म्हणजे प्रत्येक विधीमधे फोटोग्राफर आणि व्हिडिओवाले – त्यांना जसे हवे तसे फोटो काढण्यासाठी विधिंच्या मधे घुसून तेच जणू पुरातन कालापासून लग्न लावत आले आहेत अशा थाटात वधू वरांना वेगवेगळ्या पोज घ्यायला लावतात आणि खरे म्हणजे विधी आणि संस्कार यांचा विचका करतात .

अशावेळी यजमान काहीच बोलत नाही त्यामुळे गुरुजी सुद्धा काही करू शकत नाहीत . 

खरे म्हणजे यजमानाने पुढाकार घेऊन या गोष्टी न कळत – शिताफीने टाळता येतात .

आम्ही फोटोग्राफी केलीच पण आधीच ही संकल्पना फोटोग्राफरला समजावून सांगितली आणि त्यांना सांगितले की तुमच्यासाठी म्हणून कोणतीही पोज संपूर्ण विधीत होणार नाही . तुम्ही सर्व बाजूनी फोटो काढा पण विधी तुमच्या साठी थांबणार नाही .

सुंपूर्ण समारंभच – 

“candid photography ” करा .

सगळे विधी झाल्यावर ज्याला जसे हवे तसे एकत्र – ग्रुप फोटो काढून घ्या .

आश्चर्य म्हणजे ही कल्पना फोटोग्राफरला सुद्धा आवडली आणि त्यांनी ही खूप सुंदर आणि भरपूर फोटो काढले .

इतकेच नव्हे तर फोटोग्राफर ने दोनच दिवसांत सर्व फोटोंची एक लिंक तयार करून दिली . आम्ही ती लिंक प्रत्येक कुटुंबाला व्हॉटस्अप वर पाठवली आणि ज्याला जे फोटो हवे आहेत ते डाऊनलोड करून घेतले .

प्रत्येकाला आपले स्वतःचेही – छान फोटो मिळाले .

संपूर्ण समारंभात शांत संयमित आवाजात सनईचे सूर सरु ठेवले होते त्यामुळे वातावरण प्रसन्न तर झालेच पण आवाजही मर्यादित ठेवण्यामुळे प्रत्येकाला एकमेकाशी नीट बोलता आले . 

खूप दिवसांनी भेटणाऱ्या नातेवाईकांना गप्पा मारता आल्या . 

हल्ली संगीताचा आवाज अतिशय मोठा ठेवतात त्याने काय साध्य होते हेच समजत नाही . 

एवढेच नव्हे तर एकमेकांशी धड बोलताही येत नाही .

कानांवर ध्वनीचे अत्याचार सहन करावे लागतात ते वेगळेच . बरे कोणी सांगतही नाही की आवाज मर्यादित ठेवा म्हणून .

आम्ही आधीच ठरवून हे सर्व टाळले . 

त्यामुळे ढणढणाटा ऐवजी उलट प्रसन्नता – उत्साह – गप्पा – हास्यकल्लोळ यांनी समारंभाला जास्त शोभा आली .

तसे लोकांनी बोलूनही दाखवले .

अशा काही गोष्टी सहज साध्य आहेत – करता येतात – अवघड नाहीत .

उगीच प्रवाह पतित होऊन भलत्याच गोष्टी करणे आपण टाळू शकतो .

यात कुठेही कर्मठपणा _ कठोरपणा आणण्याची किंवा आपल्या परंपरांचा वृथा अभिनिवेश दाखवण्याची बिल्कुल आवश्यकता नाही .

योग्य वेळी प्रत्येकाला आपलेसे करून – समजावून सांगितले की छान करता येते – उलट प्रत्येकाचा सहभागही वाढतो .

लग्नाला जाणाऱ्या प्रत्येकाला हे मनातून हवे आहे हे ही प्रकर्षाने लक्षात आले .

मग आपणच आपला अप्रतीम वारसा सांभाळायचा – वाढवायचा आणि भरभरून पुढच्या पिढीला द्यायचा हे आपण निश्चित पणे करु शकतो .

हे सर्व मी लिहीले आहे – ते आधी केले मग सांगितले – या वचनाला जागून आहे.

आपला : नरेंद्र आपटे (ठाणे)

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments