वाचताना वेचलेले
☆ महाविष्णूंना प्रिय आठ पुष्पे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
सुधा मूर्ती यांना त्यांच्या आजोबांनी एक श्लोक शिकवला होता. त्यात, भगवान महाविष्णूंना प्रिय असलेली आठ पुष्पे कोणती याची माहिती दिली होती. आजोबांनी अर्थासकट सांगितलेला श्लोक सुधा मूर्ती यांच्या बालमनावर ठसला. ती शिकवण आयुष्यभर आपल्या आचरणात आणून सुधा मूर्तींनी विष्णूभक्तीत कायमस्वरूपी आठ पुष्पे अर्पण केली. ती आठ पुष्पे कोणती, ते आपणही जाणून घेऊ या.
अहिंसा प्रथमं पुष्पम्
पुष्पम् इन्द्रिय निग्रहम् ।
सर्व भूतदया पुष्पम्
क्षमा पुष्पम् विशेषत:।
ध्यान पुष्पम्
दान पुष्पम्
योगपुष्पम् तथैवच।
सत्यम् अष्टविधम् पुष्पम्
विष्णु प्रसिदम् करेत ।।
अर्थ : –
१. जाणते-अजाणतेपणी हिंसा न करणे, अर्थात अहिंसा, हे पहिले पुष्प,
२. मनावर नियंत्रण ठेवणे हे दुसरे पुष्प,
३. सर्वांवर प्रेम करणे हे तिसरे पुष्प,
४. सर्वांना क्षमा करणे हे चौथे पुष्प,
५. दान करणे हे पाचवे पुष्प,
६. ध्यान करणे हे सहावे पुष्प,
७. योग करणे हे सातवे पुष्प,
८. नेहमी खरे बोलणे, सत्याची कास धरणे हे आठवे पुष्प आहे.
जो भक्त भगवान महाविष्णूंना ही आठ पुष्पे अर्पण करतो, तो त्यांच्या कृपेस पात्र होतो.
ही सर्व पुष्पे कुठे सापडतील? तर आपल्या देहरूपी वाटिकेत ! या सर्व गोष्टी आपल्या वागणुकीशी निगडित आहेत. म्हणून मोठे लोक नेहमी सांगतात, ‘आचार बदला, विचार बदलेल.’ कोणतीही कृती, विचारपूर्वक केली पाहिजे. आपले विचार चांगले असले, तर हातून वाईट काम, चुकीचे काम घडणारच नाही. कोणावर हात उगारणार नाही, अपशब्द बोलणार नाही, अतिरिक्त माया, संपत्ती गोळा करणार नाही, अनावश्यक गोष्टी साठवणार नाही, मनात कोणाबद्दल द्वेष ठेवणार नाही. कोणाही प्राणिमात्राचा, जीवांचा दु:स्वास करणार नाही. ध्यान, दान, योग याबाबतीत सदैव तत्पर राहीन आणि शाळेतली शिकवण म्हणजे `नेहमी खरे बोलेन.’
देवाच्या आपल्याकडून किती साध्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करता आल्या, तर संपूर्ण आयुष्यच सार्थकी लागेल. तर मग तुम्ही कोणकोणती पुष्पे अर्पण करणार ?
संग्रहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈