श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “घोडं दिसलं की पायी चालू वाटत नाही—” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

” फ्लाईटनेच जायचं गं आई , ट्रेन मधे बोअर होतं मला “

आता सुट्टीत काकाकडे दिल्लीला जायचं अन् सिमला मनाली ट्रिप करून यायचं , असं ठरवत असताना , दुसरीतल्या सईने ठणकावून आपलं मत सांगितलं. “ अगं आज्जी आजोबांना ट्रेन बरी वाटते अन् राजधानी आहे ती चांगली .. एका रात्रीत पोचूही ..”  चारूता सारं सांगत राहिली तरी काही पटले नाही सईला .. 

“ मागे केरळला मग फ्लाईटने का गेलो ? ते  रेल्वे स्टेशन किती घाण असतं .. नाही म्हणजे नाहीच , फ्लाईटनेच जायचय मला .. “

“ओरडायला हवं होतं मी तेंव्हाच खरं .. ” रात्री चैतन्यला चारू सांगत होती.  “ ओरडायला हवं होतं का रे ? पण खरं सांगू , कळतच नाहीये , चूक तिची कि आपली ? मागण्या आता वाढतच चालल्या आहेत तिच्या ..  फ्लाईटने जाणं किती सहज साध्य वाटतय तिला .. बोर्नव्हिटा नसेल तर दूध नको , गाडी नसेल तर प्रवास नको , हाँटेलात गेलो तर चायनिजच हवं अन् माँलमधलं सारं काही घरी यायलाच हवं.. एक ना दोन .. जास्तच लाड करतोय का आपण ?” चारूताच्या विचारांनी परत एकदा उचल खाल्ली. 

“ हमम .. खरंय तुझं  ..” नेहमीप्रमाणे  कुस बदलत एवढच म्हणत चैतन्य झोपून गेला. 

पन्नास पैशाच्या लिमलेटच्या गोळीचं आकर्षण असायचं आपल्याला .. कोणी कधी शाळेत वाढदिवसाचं वगैरे म्हणून चाँकलेट दिलंच तर घरी येऊन अर्ध अर्ध करून खायचो .. गरीब वगैरे काही कधी नव्हती परिस्थिती, पण पैसा असा इतका सहज संपवत नव्हतो  , आता मध्यमवर्ग असा काही राहिलाच नाही की काय ..?. .. मुबलकता आली .. पगार वाढले .. जाहिरात क्षेत्राने व्यापूनच टाकलंय आयुष्य अवघं .. जाहिरातींचा मारा होत राहतोय .. पगार त्याकडे वळत राहतोय .. 

आधी दिवाळीलाच कपडे घ्यायचो नवे .. आणि एखादा वाढदिवसाला .. जुने झालेले ड्रेस आधी घरात वापरले जायचे अन् मग पायपुसणं बनून पायाखाली यायचे..

— आणि परवा साडेसातशे रूपयांचा नाईट ड्रेस घेतला आपण .. सहज ..  आवडला म्हणून ..  आणि मग.. सईला काय म्हणा .. आपणच बदललो नाहीयोत का ? 

संध्याकाळी  खेळून आल्यावर भूक लागली तर केळं, दूध पोहे, गेला बाजार पोळीचा लाडू, असंच काहीसं हातावर ठेवायची आई .. सई पाहतही नाही अशा खाण्याकडे आता .. ह्या सवयी तिला कुणी लावल्या ? बिस्किटं , वेफर्स नी तत्सम खाण्याने भरून वाहतायत डबे आता .. 

आत्ता आठवतय की …आत्याचं घर किती लांबं होतं..  पण चालतच न्यायचे आजोबा .. त्यांचं काय नातीवर प्रेम का नव्हतं ? पण चालणं हेच फार स्वाभाविक होतं…..पुढे सायकल हातात आल्यावर चालत जायला कंटाळायला लागले मी तेव्हा आजी म्हणत असे ..”  घोडं दिसलं कि पायी चालू वाटत नाही !!!”

— पण सुरवात सारी इथुनच झाली का ? पुढे शिक्षण झालं ,  नोकरी लागली तशा मागण्या वाढल्या  माझ्या .. ड्रेसचा कप्पा वाढला ..चपलेचे जोड वाढले .. “ अगं राखून ठेव पैसा हाताशी,आहे म्हणून संपवू नये ..” आई म्हणायची तेंव्हा ‘ हो गं ‘ …म्हणत फणकाऱ्याणे  निघून जायचे मीही .. यथावकाश लग्न झालं , नवरा IT तला .. सहा आकडी पगार त्याचा .. मोठ्ठं घर हवं म्हणून कर्ज काढलं, तेंव्हाही आजोबा म्हणाले होते ..” अगं प्रायव्हेट नोकऱ्या तुमच्या, एवढालं ते लोन काढताय .. अंथरूण पाहून पाय पसरावेत बयो ! “

पण कुठेसं ऐकलेला डायलाँग घोळवायचे मी तेंव्हा .. “ तोकडं पडलं तर अंथरूण वाढवा ना .. सदा पायच का आखडून घ्यायचे आपण ? “

स्टीलची ताटं नको म्हणून डिनर सेट आणले ..एकेक करत नॉनस्टिकच्या भांड्यांचे सेट झाले ..  फ्रिज , टिव्ही लहान वाटायला लागला .. सोफ्यावाचून हाँल सुनासुना भासायला लागला … दिरानं अन् ताईने घेतली गाडी तशी मग आपणही घेतलीच .. बसचा प्रवास अगदीच दुर्मिळ झाला मग .. उपभोगत आलो सारं .. आमचा स्तर आम्हीच वाढवला …. आणि मागची पिढी  खर्चिकच  म्हणत आली आम्हांला ..

कोकणातल्या मूळ गावी जायला लाल डब्ब्याखेरीज दुसरी सोय नव्हती .. गाडी अजून घेतलेली नव्हती .. तेंव्हा जाणारच नाही म्हंटलं नाही, पण तरी नाकं मुरडायचेच मी जाताना .. सासरे म्हणतच मग .. “ तुम्हांला थेट गाडी आहे आता. किती बरय .. आम्ही  ST , बोट , पायी असं करीत करीत पोहोचत असू  कित्येक तासांनी ..”– मला एशियाड हवीशी वाटे .. तसंचं लेकीला विमान हवं आहे आता …. आपल्याच विचारांची धारा पुढे चालवतेय लेक .. काय ओरडणार आहोत आपण तिला ..

असेच विचार करता करता कधीतरी झोप लागली .. दुसऱ्या दिवशी रविवार .. जरासं आळसावतच चारू बसली तोवर कामवाल्या मावशी आल्या .. चांगल्या कपबशा नि चांगल्या चांगल्या बेडशिट्सनी भरलेली पिशवी त्यांच्या हातात .. म्हंटलं “ काय हो हे .. आत्ता कसली केलीत खरेदी ? “.. तर म्हणाल्या .. “ अहो खालच्या मजल्यावरच्या ताईंनी दिलं .. जास्तीचं सामान सगळं काढून टाकून गरजेपूरतच ठेवायचं ठरवलंय त्यांनी म्हणे  ..”  

— खालच्या ताई म्हणजे चारूची मैत्रीणच –  मेधा .. चारूला हे समजेना तेंव्हा तिने मेधाला फोन लावला .. 

“अगं मिनिमलीझमच्या मुव्हमेंटबद्दल वाचलं मधे नेटवर .. म्हणजे आवश्यक त्या वस्तूंचाच फक्त संचय करायचा .. अनावश्यक फाफटपसारा टाळायचा .. काय काय उगाचच जमवत राहतो आपण .. मला फारच पटलं ते .. म्हणून ठरवलय जमेल तितकं करूया .. त्याची ही सुरवात .. “

कुठेतरी उत्तर मिळाल्यासारखं वाटलं चारूला .. ‘ आज रविवार आहेच तर आपणही आज हे निवांत वाचूया .. आणि बघुया आपल्याला पटतय अन् जमतय  किती नि कसं ..’  असं ठरवत ती स्वयंपाकघराकडे वळली .. तशी मावशी म्हणाल्या ..” बरं झालं की हो , खालच्या ताईंनी कपबश्या दिल्या ते .. पोरांना आता स्टीलचं  भांडं चालत नाही .. रंगीत डिझाईनचा कपच लागतो .. आम्ही तर करवंटीतून प्यायचो चहा  .. पण तक्रार नाही केली बघा कधी .. काय करावं .. जनरीतच आहे झालं  …… 

“ घोडं दिसलं की चालू वाटत न्हाई माणसाला .. !!! ” 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments