? वाचताना वेचलेले ?

⭐ अपेक्षांच  सेटिग… लेखिका: सुश्री मंजिरी राजेंद्र पाठक ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

मिताली नुकतीच लग्न होऊन नव्या घरी आली होती. तिच्या सासूबाई फारच प्रेमळ आणि कार्यतत्पर होत्या. कार्यतत्पर याकरता, की त्यांच्या कामाचा उरक वाखाणण्याजोगा होताच शिवाय त्यांच्या म्हणण्यानुसार घरचं पानही हलत नसे त्यांच्याशिवाय..

हळूहळू मिताली नव्या घरी रुळू लागली होती. त्यादिवशी सगळ्यांचं झाल्यावर सासू-सून जेवायला बसल्या. इतक्यात सासऱ्यांचा आवाज आला, अग tv चा रिमोट मिळत नाहीये. तशा सासूबाई पटकन उठल्या आणि त्यांना tv वरच असलेला रिमोट देऊन आल्या आणि सुनेला म्हणाल्या, “माझ्याशिवाय बाई पानच हलत नाही यांचं.”

सकाळी योगा करतानापण मुलाने म्हणजे मितालीच्या नवऱ्याने अशीच हाक मारली, “अग आई,  माझा डबा भरला का, निघायला उशीर होतोय.” तशा पटकन योगा सोडून सासूबाई डबा भरायला गेल्या.

मिताली हे सगळं पहात होती.

एक दिवस सासूबाईंच्या भिशीचा ग्रुप घरी आला. सगळे एक आठवड्याच्या महाबळेश्वर ट्रिपचे ठरवत होते, पण सासूबाई म्हणाल्या, “मी काही येणार नाही, मी आले तर सगळंच कोलमडेल घरातलं.” तशी मिताली म्हणाली, “आई तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं बघेन. मला माहितीये तुम्ही काय काय करता ते.” सासूबाई म्हणाल्या, ” अग, बरंच काही असतं, तुला नाही जमणार.” तशी मिताली म्हणाली  ” आई जमवून दाखवीन. बघाच तुम्ही.” मितालीने दिलेल्या विश्वासावर सासूबाई दोन दिवसात ट्रिपला गेल्या.

मिताली तिचं ऑफिसचं आवरत होती, तेवढ्यात नवऱ्याने आवाज दिला, “अग, माझा रुमाल , पाकीट कुठे आहे? आई नेहमी काढून ठेवते.” तसे मितालीने जागेवरूनच उत्तर दिले, “कपाट उघडलं की समोर जो ड्रॉवर आहे ना, त्यात आहे. रोज तिथेच असतं.उद्यापासून घेत जा हाताने.”

नवऱ्याने जराशा नाराजीनेच रुमाल आणि पाकीट ताब्यात घेतले. तेवढ्यात मितालीचा आवाज आला, “डबा मावशींनी धुवून ठेवलाय. कढईमध्ये भाजी आणि बाजूलाच डब्यात पोळ्या आहेत,त्यापण भरून घे. मी निघते ऑफिसला.” हे सगळं करण्याची सवय नसलेल्या नवऱ्याला हे ऐकून थोडा धक्का बसला; पण स्वतःच घेण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

ती निघत असतानाच सासऱ्यांचा आवाज आला, “अग, पूजेसाठी फुलं नाहीत परडीत.”  तशी मिताली म्हटली, “अहो बाबा, घरचीच बाग आहे की, घ्या तोडून बागेतून. तेवढीच मोकळी हवा मिळेल आणि चालणंही होईल.”

हे ऐकताच सासऱ्यांनी मुलाकडे पाहिले, तसा तो खांदे उडवून निघून गेला.

त्यादिवशी रात्री मिताली जेवायला बसली, आणि नेहमीप्रमाणे सासऱ्यांचा आवाज आलाच रिमोट साठी, मिताली जागेवरून म्हणाली, “समोर tv वरच आहे, बाबा, ” सासऱ्यांनी निमूटपणे उठून रिमोट घेतला.

अशी अनेक छोटी-मोठी कामे मितालीने स्वतः न करता ज्याची त्याला करायला लावली.

आठवडा सरला, सासूबाई आल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जरा उठायला उशीरच झाला. लगबगीने उठून त्या स्वयंपाकघरात आल्या , तर त्यांचा मुलगा डबा भरून घेत होता. आईला पाहताच त्याने विचारले, “आई, कॉफी देऊ का?”

सासूबाईंचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्या बाहेर आल्या, तर सासरे बाहेर बागेत मस्त कानात हेडफोन लावून फुलं तोडत होते, सासूबाईंना कळेना, हे काय चाललंय आपल्या घरात?

इतक्यात मिताली  कॉफीचे दोन मग घेऊन आली, म्हणाली “आई चला, कॉफी घेऊ.” सासूबाई अजूनही आश्चर्यचकीत होत्या, तशी मिताली म्हणाली, “आई, चिल, expectation setting झालं आहे घराचं आणि घरातल्या लोकांचं, आता आरामात दिवस एन्जॉय करा.”

अचानक सासूबाईंनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, “थॅंक्यू,मॅनेजर बाई. That’s what I was trying to achieve for so many years.”

मिताली खुदकन हसली.

लेखिका :सुश्री मंजिरी राजेंद्र पाठक

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments