सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ संसारी लोणचं… लेखक : श्री. प्रमोद पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात,
नंतर कुरकुरत का होईना,
हळूहळू मुरतात.
हे लोणचं बाजारात मिळत नाही.
कुटुंबानं मिळून ते घालायचं असतं.
त्याशिवाय जगण्याला
चव येत नाही.
कडवट शब्दांची मेथी जरा
जपूनच वापरावी.
स्वत:च्या हातांनी कशाला
लोणच्याची चव घालवावी ?
जिभेने तिखटपणा आवरला, तर
बराच फायदा होतो.
लोणच्याचा झणझणीतपणा
त्यानं जरा कमी होतो.
‘मी’पणाची मोहरी जास्त झाली,
तर खार कोरडा होतो
इतरांच्या आपुलकीचा रस
त्यात उगाच शोषला जातो.
रागाचा उग्र हिंग तसा तितकासा
बाधत नाही.
लवकर शांत झाला तर
लोणच्याची चव बिघडत नाही.
प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते.
विकारांच्या बुरशीपासून संरक्षणही करते.
समृध्दीचं तेल असलं, की
काळजीचं कारण नसतं.
त्या थराखाली लोणचं बरचसं सुरक्षित असतं.
लोणचं न मुरताच नासावं, तसं काही संसारांचं होतं.
सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण बहुधा कमी पडलेलं असतं.
लेखक : श्री.प्रमोद पाटकर
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈