वाचताना वेचलेले
☆ “पसारा आवरू या…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆
आज स्वयंपाकघर आवरायला काढलं होतं. आवरायच्या आधीच ठरवलं होतं की ज्या गोष्टी गेल्या वर्षभरात लागल्याच नाहीत, वापरल्या गेल्याच नाहीत, त्या सरळ काढून टाकायच्या आणि देऊनच टाकायच्या. अशा बर्याच निघाल्या पाहता पाहता. केवढा पसारा. विस्मृतीत गेलेल्या बर्याच गोष्टी.
कधीतरी त्या हव्या होत्या, पण वेळेवर कुठे ठेवल्या तेच आठवलं नाही. म्हणून ती वेळ भागवायला लगेच बाजार गाठला.
सगळं उरकल्यावर ती वस्तु सापडली. पण मग काय उपयोग?
आखीव, रेखीव, आटोपतं असं असावं ना सगळंच, असं वाटायला लागलंय हल्ली. माझी आजी म्हणायची दोन लुगडी हवीत. एक अंगावर आणि एक दांडीवर…
आता भांडी ढीगभर, कपडे कपाटातून उतू जाताहेत, खाद्यपदार्थांची रेलचेल. कशाचंच नावीन्य नाही राहिलं.
माझ्या ओळखीतली, नात्यातली, अशी उदाहरणे आहेत.
पेशंट असलेली, आजारी असलेली, त्यांनी जाण्याआधी आपलं सगळं सामान वाटून टाकलं. काहीजणांनी तर कुणाला काय द्यायचं, ते लिहून ठेवलं. खरंच नवल वाटलं मला. आपण काहीतरी शिकायला हवं, असं वाटून गेलं.
ह्या वस्तूंचा मोह सुटत नाही. शेवटपर्यंत माणसाला खाण्याचा मोह सोडवत नाही.
खाण्याची इच्छा आणि ह्या गोष्टीतली इच्छा संपली की माणूस जाणार, हे समजायला लागतं.
एक ओळखीच्या आजी होत्या, मुलं-बाळं काही नव्हती. एकट्या राहायच्या. एका वाड्यात.
पुतणे वगैरे होते, पण कुणाजवळ गेल्या नाहीत.आपली पेन्शन कुणी घेईल ह्या भितीने लपवून ठेवत असाव्यात.
गेल्या तेव्हा उशीमधे पण पैसे सापडले. जातांना म्हणत होत्या, ‘नवी नऊवार साडी कुणालातरी पिको करायला दिलीय. तिच्याकडेच आहे. आणा म्हणून.’ असंही उदाहरण आहे.
एक ओळखीच्या बाई गेल्या. कॕन्सर झाला होता, पण गेल्या तेव्हा एका वहीत सगळं लिहून ठेवलं होतं.
जी बाई जाईपर्यंत त्यांची सेवा सुश्रुषा करत होती, तिला स्वतःची सोन्याची चेन आणि वीस हजार रुपयाचं पाकीट ठेवून गेल्या. मुलींना काय द्यायचं, सुनेला काय द्यायचं सगळं लिहून गेल्या.
साड्या, बाकी सामान कोणत्या अनाथाश्रमाला द्यायच्या ते पण लिहून गेल्या. ह्याला म्हणतात प्लानिंग.
देवही तेवढा वेळ देतो आणि हे लोक पण आपल्याला जायचंय हे मान्य करतात. ह्याला हिंमतच लागते.
नाहीतर आपण एक गोष्ट सोडत नाही हातातून. कायमचा मुक्काम आहे पृथ्वीवर ह्या थाटातच वावरत असतो आपण.
तीन-तीन महिन्यांचा नेट पॕक किती कॉन्फिडन्सने मारुन येतो आपण. नवलच वाटतं माझंच मला.
चार प्रकारचे वेगवेगळे झारे, चार वेगवेगळ्या किसण्या, आलं किसायची, खोबरं किसायची, बटाट्याचा किस करायची जाड अशी.
असं बरंच काही. सामानातलं खोबरं आणल्यावर किसणं होत नाही लवकर.
खूप पाहुणे येतील कधी, म्हणून पंचवीसच्या वर ताटं, वाट्या, पेले. पण पाहुणे येतच नाहीत. आले तरी एक दिवस मुक्काम.
घरी एक नाश्ता आणि एक जेवण बाहेर. घरी जेवणं झाली तरी भांडीवाली बाई सुट्टी मारेल, खूप भांडी पडली तर, म्हणून युज अॕण्ड थ्रो प्लेट्स. कुणालाच घासायला नको.
पाहुणे मुक्काम करत नाहीत सहसा. कारण एक सतरंजी पसरवून सगळे झोपलेत असं होत नाही.
कुणाचे गुडघे दुखतात, कुणाला कमोड लागतो. तेव्हा प्रत्येकाला आपआपल्या घरी परतण्याची घाई. घरची बाई पण आग्रह करत नाही कारण तिच्या हातून काम होत नाही.
पाहुणी आलेली बाई मदत करत नाही. सगळ्यांच्या हातात नेऊन द्यावं लागतं. अशा तक्रारी ऐकू येतात.
असं खूप काही आठवत बसतं, पसारा पाहून.
एवढाच पसारा हवा की वरच्याचं बोलावणं आलं, चल म्हणाला की लगेच उठून जाता आलं पाहिजे.
पण तसं होत नाही. दिवसेंदिवस जीव गुंततच जातो. वस्तूंमध्ये, दागिने, पैसा, नाती आणि स्वतःमध्ये पण.
रोज कुणीतरी गेल्याच्या बातम्या येतात. पण तरी नाही.आपण काही सुधारणार नाही.
दरवर्षी घरातला पसारा काढायचा आवरायला. त्याच त्या वस्तु पुन्हा काढायच्या, पुन्हा ठेवायच्या असं चाललेलं असतं आपलं. देऊन टाकलं तरी पुन्हा नवीन आणायचं.
खरंतर जितक्या गरजा कमी, तितका माणूस सुखी …
पण मन ऐकत नाही..
ये मोह मोह के धागे…….
मग त्या धाग्यांचा कोष, मग गुंता, मग गाठ आणि मग पीळ…आणि मग सुंभ जळला तरी पीळ जात नाही.
निसर्गाकडून शिकायला हवं, आपल्या जवळ आहे ते देऊन टाकायचं आणि रितं व्हायचं. फळं, फुलं, सावली, लाकडं सगळं सगळं देण्याच्याच कामाचं.
पण आम्ही नाही शिकत .
थोडक्यात काय तर पसारा करु नये, आटोपशीर ठेवावं सगळं. आणि पसारा करायचाच असेल तर तो करावा दुसऱ्यांच्या मनात.आपल्या चांगल्या आठवणींचा, सहवासाचा, आपल्या दानतीचा. दिसू द्यावा तो आपल्या माघारी. आपण परतीच्या प्रवासाला निघाल्यावर लोकांच्या मनात, डोळ्यात, अश्रुंच्या बांधात.
जातांना आपण मागे बघितलं तर दिसावा खूप पसारा आपल्या माणसांचा, जिव्हाळ्याचा, गोतावळ्याचा.
संग्राहिका :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈