सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
माझ्या घराजवळ पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात, म्हणून की काय कोण जाणे, पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं.
काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकूर बघून माझे पाय थबकले. “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली.
मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?”
ती म्हणाली, “ नाही. ‘बडी बेंच’ नवा नाही. मागच्या बाजूला होता तो फक्त पुढे आणलाय.”
‘बडी बेंच’?माझी उत्सुकता वाढली. buddy म्हणजे मित्र पण buddy bench म्हणजे नक्की काय असावं?
माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती म्हणाली, “आम्हाला जर कधी एकटं वाटत असेल, वाईट वाटत असेल, कुणी खेळायला घेत नसेल ना, तर मधल्या सुट्टीत या बेंचवर जाऊन बसायचं. मग इतर मुलांना समजतं आणि कुणीतरी येतं बोलायला, खेळात घ्यायला, मैत्री करायला आणि मग एकदम बरं वाटतं,” तिनं उलगडा केला.
“अगबाई! हो का?” मी चकित होऊन म्हणाले. किती सुरेख कल्पना आहे! केवढाली ओझी असतात या लहान जिवांच्या पाठीवर. अभ्यास, परीक्षा, रुसवे, फुगवे,एकटेपणा आणि त्या चिमुकल्या जगातले इतर अनेक ताण-तणाव!
“पण कुणी आलंच नाही बोलायला तर?” आयुष्यातल्या अनुभवाने मला विचारण्यास भाग पाडले.
तिनं आश्चर्याने माझ्याकडे बघत कपाळावरच्या बटा उलट्या हाताने मागे केल्या व ती म्हणाली, “का नाही येणार?एकजण तरी येतंच. कारण त्यासाठीच तर आहे ना हा बेंच.” या बाईला इतके साधे कसे कळत नाही, असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता.
एकटं वाटणं, वाईट वाटणं, राग येणं या नैसर्गिक भावना आहेत. त्या भोळ्याभाबड्या जगातसुद्धा काळज्या असतात. अपेक्षांचं ओझं असतं. एखाद्याला खेळात न घेणं असतं. एखादीला नावं ठेवणं असतं. आई-बाबांकडून रागवून घेणं असतं. आणि त्यावर Buddy Bench हा एक सोपा पर्याय आहे. मला कौतुक वाटलं.
“किती छान माहिती सांगितलीस ग! तू कधी बसली आहेस बडी बेंचवर?” माझ्या तोंडून गेलंच.
“होऽऽऽ. नवी होते तेव्हा खूप वेळा. त्यानंतर कित्तीऽऽ मैत्रिणी मिळाल्या.” तिच्या मोकळेपणाने मोहित होऊन मी पुढे चालू लागले.
मनात येत राहिलं…फक्त लहान मुलांसाठीच बडी बेंच का? मोठ्यांसाठी का नाही? ऑफिसमधे,डॉक्टरकडे,वकिलाकडे, कॉलेजमधे, परीक्षा गृहात, लग्नाच्या कार्यालयात असे ठिकठिकाणी बडी बेंच ठेवले तर? त्यामुळे अनेक दबलेल्या भावना बाहेर पडून माणसांचं आरोग्य सुधारेल का? जगातील एकटेपणा कमी होईल का? काहीवेळा त्रयस्थापुढे मोकळं होणं सोपं असतं. नाहीतरी थेरपिस्टशी बोलणे आणि काय असते?
कदाचित एखाद्या नव्या आवाजाशी,समदुःखी असणाऱ्याशी, चार पावसाळे जास्त बघितलेल्या व्यक्तीबरोबर मैत्रीचा नवा रेशमी धागा निर्माण होईल. त्यामुळे जड झालेले ओझे थोडेसे हलके होईल. नाही का?
त्या बेंचवर खाली दोन ओळी लिहिल्या होत्या..
चल..बसू, बोलू, गप्पा मारू, विचारू एकमेका काही प्रश्न
उदात्त हेतू मनी ठेवूनी होऊ buddy, यार, सखा, मित्र!
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈