सौ.शशी.नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
☆ कोमलतेतील ताकद… लेखक : व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
कोमलतेत ताकद असते. पावसाचं पाणी आकाशातून पडतं.
माती वाहून जाते.
नद्यांना पूर येतात.
भले भले खडक झिजतात.
पाणी वाहतच रहातं.
फुलं ही पाण्यासारखीच कोमल असतात.
एक दगड भिरकावला तर दहाबारा फुलं खाली पडतात.
ज्या दगडामुळं फुलं वेचायला मिळाली तो दगड कुणी घरी आणत नाही . आपण फुलंच घरी आणतो.
ती कोमेजतात पण एवढ्याश्या जीवनात तुम्हाला सुगंधच देतात.
पाण्याचं सामर्थ्य त्याच्या सातत्यात असतं.
प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी त्याच्याशी झुंज देत बसत नाही .
बाजूने वाट काढून निघून जातं.
या वाहण्याच्या सातत्याने खडक लहान होत जातो.
प्रवाह रुंदावत जातो.
सातत्य म्हणजे काळ.
काळाचे सामर्थ्य मोजता येणार नाही.
अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याशा दिसणाऱ्या जलधारेच्या पाठीशी असते.
कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी त्या शब्दाचं गीतात रूपांतर करण्याचं सामर्थ्य असणारी स्त्री जलधारा असते.
साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोपात पडण्यापेक्षा त्याला वळसा देऊन पुढे जाणे चांगलं.
कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं योग्यच असतं.
जलधारा हो, वाहत राहा.
लेखक : व.पु.काळे
प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈