वाचताना वेचलेले
☆ आईचं गणित नेहेमीच कच्चं… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
जगातल्या तमाम लहान मोठ्या पोरांच्या आयांच गणित हे कच्चं असतं हे माझं ठाम मत आहे…मग ही आई ग्रामीण भागातील शेतकरी असो नाहीतर कॉर्पोरेट जगात मोठ्या हुद्द्यावर काम करणारी आई असो…दोघीही गणितात कच्च्या असतात हे मी सबळ पुराव्यानिशी सिध्द करू शकतो…
आता बघा परवाची गोष्ट…आमच्याचं घरातील हो…ही म्हाळसा एवढी इंजिनिअर झाली पण गणित कच्चं… परवा माझं बांगडू म्हणजे माझी कार्टी हो हॉस्टेलवर जायला निघाली… म्हाळसाने तिच्यासाठी सुक्यामेव्याचे पौष्टिक लाडू करून ठेवले होते …तो डबा तिच्या बॅगेत ठेवत ती पोरीला म्हणाली …” रोज एक लाडू सकाळी संपवायचाचं आहे, प्रत्येक दिवसाचा एक असे मोजून आठ लाडू दिलेत, ते रोज खाल्ले गेले पाहिजेत… ”
पोरगी तिचं आवरता आवरता फक्त ‘हो हो’ म्हणत होती…मी आपलं सहज लाडू कसे आहेत हे बघायला पोरीच्या बॅगेतला तो डबा बाहेर काढून उघडला तर त्या डब्यात जवळपास बारा तेरा लाडू होते…आता ‘मोजून आठ लाडू दिलेत’ असं म्हणून डब्यात बारा तेरा लाडू कसे?…आता मला सांगा आहे की नाही म्हाळसाईचं गणित कच्चं…?
अजून एक किस्सा सांगतो… आमच्या सोसायटीत एक आत्राप कार्ट बागेत खेळत होतं… त्याचा नुसता उधम चालला होता…IT मध्ये उच्च पदावर काम करणारी त्याची आई ऑफिसातून नुकतीच सोसायटीत आली होती…पोराला खेळताना बघून ती थबकली…आई पोराची गळाभेट झाली, मग जरावेळ पप्प्यापुप्प्या, शोन्यामोन्या, लाडेगोडे वगैरे झाले अन क्षणात ते पोरगं पुन्हा उच्छाद मांडायला पसार झाले आणि त्याच्या मागे ही आई उगाचंच आरडाओरडा करत त्याच्या मागे मागे गेली…’हे नको करू ते नको करू…असं नको करू, तसं नको करू’…अशा तिच्या हजार सूचना सुरू होत्या पण पोरगं काय ऐकेना… मग त्या पोराच्या आईने शेवटचं हत्यार काढलं…
” रोहन आता तू माझं ऐकलं नाहीतर तुला दोन सटके वाजवली हां…” त्या आईने दम भरला… बहुदा त्या पोराला आईच्या कच्च्या गणिताची कल्पना असावी…ते काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं…आता फटाके वाजलेले बघायला मिळणार म्हणून मी ही थबकलो, …पण ते पोरगं स्वतःच्याच धुंदीत मस्त खेळत होतं आणि इकडे त्याच्या आईने ‘ तू ऐकलं नाहीतर तुला चार सटके वाजवील’ हे वाक्य दहा बारा वेळा म्हंटल, एकदा हातही वर उचलला पण एक साधा सिंगल सटका काही वाजवला नाही…बघा आहे की नाही आईचं गणित कच्चं?…
अशा रोजच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जाणवतं की आईचं गणित हे कच्चंच असतं…
“डब्यात दोन पोळ्या, भाजी, वरण भात दिलाय…चटणीही आहे, वेळेत डबा खाऊन घे ” असे आई म्हणत असताना कॉलेजला जाणाऱ्या पोराच्या डब्यात तीन पोळ्या कशा असतात यावरूनच कळतं त्या आईच गणित कच्चं असतं…
” तुझ्या पर्स मध्ये दोन हजार ठेवलेत ” कॉलेजात जाणाऱ्या पोरीला असे एक आई म्हणतं असताना पर्स मध्ये पाचशेची एक नोट जास्त का निघते यावरून कळतं आईचं गणित कच्चं असतं…
” सकाळी एकदाचं उठविल, पुन्हा उठवणार नाही तुला कॉलेजला जायला उशीर झाला तू जबाबदार ” रात्री झोपायला जाताना अशी तंबी देणारी आई सकाळी दहा वेळा पोराला उठवायला जाते तेंव्हा कळतं आईच गणित कच्चं असतं…
पोरीला शॉपिंगला नेताना ” पाच हजाराच्या वर एक रुपया देणार नाही…” अशी धमकी देणारी आई जेंव्हा पोरीवर दहा हजार उधळून घरी येते तेंव्हा कळतं आईचं गणितं खूपच कच्चं आहे…
” भूक नाही म्हणजे काय?…चल दोन पराठे खाऊन घे…” अशी दमदाटी करून दोन पराठे खायला घालून पुन्हा तिसरा पराठा बळेबळेचं वाढताना ” छोटे छोटेचं आहेत खाऊन घे गपचूप ” अशी बतावणी करते ना त्यावेळी त्या पराठ्याच्या आकारावरून कळतं आईचं गणितंचं नाही तर भूमितीही कच्चं आहे…
सकाळी शाळेत गेलेलं पोरगं रोज बरोबर अकराच्या ठोक्याला स्कुलबस मधुन घरी येतं हे माहीत असूनही ती आई दहा वाजल्यापासून बाल्कनीत चार चकरा मारते ना तेंव्हा कळतं आईचं गणित कच्चं आहे…
” जास्त आवाज केला तर अशा उलट्या हाताच्या चार झापडी ठेऊन देईल ना…” असं म्हणून एकही झापड न मारणारी आई जेंव्हा चुकून रागाने दोन चापटी पोराच्या पाठीवर मारते अन मग स्वतःच डोळ्यातून दोनशे अश्रू गाळते ना तेंव्हा कळतं आईच्या गणिताची अवस्था फारच बिकट आहे…
जगाच्या पाठीवर कोठेही जा आईचं गणित कायम कच्चचं असतं पण त्याचं आईचं प्रेम, माया, ममत्व हे मात्र अगणित असतं…ते मात्र पक्कं असतं…
जगातील सर्व मातांना समर्पित …
संग्रहिका : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈