वाचताना वेचलेले
☆ ओंजळीतली चांदणफुले – सौ. पुष्पा जोशी ☆ प्रस्तुति – श्री प्रमोद वर्तक ☆
पुस्तकाचे नाव – ओंजळीतली चांदणफुले
लेखिका – सौ पुष्पा जोशी
प्रकाशक – राजा प्रकाशन, मुंबई.
पाने – १०४
किंमत – रु १२५
जीवनसेतू
अनादिकाळापासून मानवाला जीवनाबद्दल प्रेम आहे, ओढ आहे. जीवनाविषयी त्याच्या मनात दडलेले कुतूहल त्याला नव्या नव्या वाटा शोधण्याची उर्मी देते. साहस करण्याची वृत्ती आणि प्रवास करण्याची प्रवृत्ती यामुळे मानवाने दळणवळणाच्या अनेक सोयी व साधने निर्माण केली आहेत. त्यातील पूर्वापार साधन म्हणजे ओढे, नद्या, खाड्या, समुद्र ओलांडून जाण्यासाठी बांधलेले अनेक प्रकारचे पूल! रामायण काळातील वानरसेनेने श्रीरामांसाठी बांधलेला समुद्रसेतू म्हणजे दुष्ट शक्तिचा विनाश करण्यासाठी समूह शक्तिने उभारलेला सेतू होता.
लहान गावांमध्ये पावसाळी झरे, ओढे किंवा पाण्याचे छोटे प्रवाह ओलांडण्यासाठी झाडांचे मजबूत ओंडके किंवा बांबू त्या प्रवाहावर बसवून साकव घालण्याची पद्धत आहे. हिमालयातील कितीतरी दुर्गम गावांमध्ये पोहचण्यासाठी अनेक खळाळते ,रुंद प्रवाह ओलांडावे लागतात. तिथे प्रवाहच्या दोन्ही तीरांना जोडणारा एक मजबूत लोखंडी दोर बांधलेला असतो. त्यावरील कप्पीच्या सहाय्याने बांबूच्या टोपलीत बसून ते प्रवाह पार केले जातात.
इंग्रजांना मुंबई बेट आंदण मिळाले. त्यांचा पसारा वाढू लागला तेव्हा त्यांनी माहिम- वांद्रे इथल्या खाडीमध्ये भर घालून तेव्हाची बेटे जोडण्यासाठी पूल बांधले. वसई -भाईंदरच्या खाडीवरील रेल्वेचा जुना पूल इंग्रजी आमदानीतला आहे.शंभराहून अधिक वर्षे इमानेइतबारे सेवा करुन तो पूल आता निवृत्त झाला आहे. त्या खाडीवर आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेले दोन नवीन पूल पाहत तो सेवानिवृत्त पूल स्थितप्रज्ञासारखा उभा आहे. असाच एक जुना जाणता पूल म्हणजे कोलकत्याचा हावडा ब्रिज. तिथेही आता एकावर एक दोन नवीन पूल बांधण्यात आले आहेत. दुसऱ्या महायुद्धातील एका घटनेवर आधारित ‘ब्रिज आॅन द रिव्हर क्वाॅय’हा एक गाजलेला युद्धपट होता.
ब्रह्मपुत्रा नदी(नद)वर बांधलेला साडेतीन किलोमीटरचा पूल ही आपल्या लष्करी अभियंत्यांची करामत आहे. त्या पुलावरून ब्रह्मपुत्रेचा वेगवान खळाळता प्रवाह ओलांडताना मानवी जिद्द व तंत्रज्ञान यापुढे आपण नतमस्तक होतो. वांद्रे- वरळी सी लिंक ब्रिज हा मुंबईचा मानबिंदू आहे. या सागरी सेतूवरील सहा मिनिटांचा प्रवास म्हणजे भारतीय अभियंते, तंत्रज्ञ, कामगार व त्यांना साथ देणारे देशी-परदेशी हात यांच्या जिद्दीची, श्रमाची यशोगाथा आहे. रात्री प्रकाशाने उजळून निघणाऱ्या त्यावरील त्रिकोणाकृती केबल्स म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या फडफडणाऱ्या सोनेरी-रुपेरी पताकाच! अशा अनेक पुलांमुळे वाहतुकीच्या सोयी सुविधांमध्ये भर पडते हे निश्चित पण असे पूल बांधत असताना मजुरांपासून ते वरिष्ठ अभियंत्यांपर्यंत सर्वजण आपला जीव धोक्यात घालून ही कामे उभी करीत असतात. सागरी सेतू बांधताना समुद्राची भरतीओहोटीची वेळ सांभाळणे, निसर्गाच्या लहरीमुळे केलेले काम फुकट जाणे, मेट्रो रेल्वेसाठी पूल बांधताना जमिनीच्या पोटात खूप खोलवर उतरून कामे करणे या प्रकारचे अनेक धोके असतात. अशा कामांवर होणाऱ्या अपघातात जीव गमावलेल्यांची संख्या बरीच मोठी असते. या सोयी सुविधांचा वापर करताना आपण या साऱ्यांची कृतज्ञ आठवण ठेवली पाहिजे.
मेघालयची राजधानी शिलाॅऺ॑गहून थोडे दूर घनदाट जंगलात एक ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ आहे. दगड, गोटे यांनी भरलेल्या मोठ्या खळाळत्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला जंगली रबराची झाडे आहेत.( या झाडांपासून रबर मिळत नाही.) या रबर प्लांटची जाडजूड, लांब , भक्कम मुळं ओढ्यामध्ये बांबू रोवून त्यावरून एकमेकात गुंफली आहेत.मुळांच्या कित्येक वर्षांच्या वाढीमुळे, तसेच त्यांना दिलेला आधार व आकार यामुळे त्या मुळांचा मजबूत डबलडेकर ब्रिज तयार झाला आहे.आसपासचे गावकरी ओढा ओलांडण्यासाठी त्या पुलाचा उपयोग करतात. कित्येक ट्रेकर्स त्या पुलावरून चालण्याचा थरार अनुभवतात. परदेशी प्रवाशांना या ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ चे खूप आकर्षण आहे .कारण जगात फारच क्वचित ठिकाणी असे जिवंत पूल आहेत. गणित आणि विज्ञान यांची उत्तम सांगड घालणारा कीटक म्हणजे मुंगी. जंगलातील जवळ जवळ असलेल्या दोन उंच झाडांवरून खाली-वर करण्याऐवजी या मुंग्यांनी आपले डोके वापरून झाडांची पाने व तंतू यांचा वापर करून आपल्या कामसू वृत्तीने या दोन्ही झाडांना जोडणारा पूल तयार केला होता आणि त्यावरून त्यांची शिस्तबद्ध वाहतूक सुरू होती.
थेम्स नदीवरील लंडन ब्रिजशिवाय लंडन चे चित्र पूर्ण होत नाही. मावळत्या सूर्यकिरणात अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोचा गोल्डन ब्रिज झळाळत असतो. जपानमधील अकाशी इथला सस्पेन्शन ब्रिज हा गोल्डन ब्रिजहूनही मोठा आहे. स्वीडनमध्ये पंधरा पुलांच्या खालून आमची क्रूझची सफर होती. त्यातला एक ब्रिज संपूर्ण तांब्याच्या पत्र्याने बांधलेला आहे. सूर्यकिरणे त्यावरून परावर्तित होऊन त्याचे लालसर प्रतिबिंब खालच्या पाण्यात पडले होते. कोपनहेगन या डेन्मार्कच्या राजधानीच्या शहरातून एक चिमुकली नदी वाहते. तिच्यावर चारशे वर्षांपूर्वी बांधलेला पूल चक्क संगमरवराचा आहे. त्याचा पादचारी पूल म्हणून अजूनही वापर होतो. तुर्कस्तान मुख्यतः आशिया खंडात येतं. पण तुर्कस्तानमधील इस्तंबूलचा थोडासा भाग युरोप खंडात येतो.इस्तंबूलच्या एका बाजूला असलेल्या बास्पोरस या खाडीवरील पुलाने युरोप आणि आशिया हे दोन खंड जोडले जातात. या खाडीवरील क्रूझ सफारीमध्ये युरोप आशियाला जोडणारा हा सेतू छोट्या-छोट्या लाल निळ्या दिव्यांनी चमचमत असताना दिसतो.
जीवन व्यवहार सोयीस्कर होण्यासाठी मानवाने जसे अनेक पूल बांधले तसेच जीवनगाणे अर्थपूर्ण होण्यासाठी मानवाला सहृदयतेचे सेतू उभारणे आवश्यक असते. जीवनामध्ये संकुचितपणाच्या भिंती उभारण्यापेक्षा मैत्रीचे पूल उभारणे हे केव्हाही श्रेयस्कर ठरते. काही विशिष्ट कामाकरता माणसे एकत्र येतात तेव्हा त्यातून तात्पुरत्या सहवासाचे साकव उभारले जातात. तर कधी त्यातूनच प्रदीर्घ मैत्रीचे पूल उभे राहतात. पती-पत्नीमधील भावबंधनाचा पूल, कौटुंबिक नात्यांचा जिव्हाळ्याचा पूल भक्कम असावा लागतो. समाजकार्य उभे करताना क्रियाशील कार्यकर्त्यांचा समविचाराचा पूल असतो. समान छंद, आवडीनिवडी असणारे त्यांच्या त्या छंदामुळे एकत्र येऊन त्यातून मैत्रीचा पूल बांधला जातो. राष्ट्रा- राष्ट्रातील वैज्ञानिक प्रगती, माहिती- तंत्रज्ञान यांच्या वाहतुकीचे पूल हे जग जोडणारे असतात. मानवाच्या प्रगतीला नव्या दिशा दाखविणारे असतात.
माणसा माणसांमधल्या या पुलांना सामंजस्याचे भरभक्कम खांब असावे लागतात. गैरसमज, कटुता, द्वेष, अहंभाव यांच्या भिंती टाळता आल्या तरच हे पूल उभे राहतात. वेळप्रसंगी आपला अट्टाहास बाजूला ठेवण्याचा, आपल्या मतांना मुरड घालण्याचा, सहनशीलतेचा टोल या पुलांसाठी भरावा लागतो. अशा मानवी पुलांवर एखादं हक्काचं, आपुलकीचं विश्रांतीस्थान असेल तर तिथे थोडावेळ थांबून गतप्रवासाचा आढावा घेता येतो आणि पुढील वाटचालीसाठी नवी उमेद, मार्गदर्शन, शक्ती मिळते.
मानवनिर्मित, निसर्गनिर्मित आणि सुरेल मानवी जीवनासाठी आवश्यक अशा या पुलांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व पुलांना स्वतःची अशी एक गती असते.लय असते. ही लय,ही गती म्हणजे जीवन वाहते ठेवण्याचा मूलमंत्र असतो.ही लय ज्याला सापडली त्याचे जीवन गतिमान, प्रवाही ,आनंदी होते आणि ही लय जीवनाला विलयापर्यंत सांभाळून नेते.
प्रस्तुति – श्री प्रमोद वर्तक
सिंगापूर
मोबाईल-9892561086
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈