श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “जुन्या वाड्याच्या आठवणी…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

अनेक कुटुंबे गुंफणारा

वाडा म्हणजे हाराचा धागा असतो,

समूहगानातला मल्हार असतो

तो भूप असतो आणि भैरवीही असतो.

 

वाड्याचे अंगण म्हणजे नंदनवन असते

छोट्यांचे क्रिडांगण असते,

महिलांचे वृंदावन असते,

पाणवठा असते, शिळोपा असते,

मोठ्यांचे कधी कुरुक्षेत्रही बनते

अंगण सगळ्यांनाच बोलावत असते.

 

वाड्यात अनेक बिऱ्हाडे असतात

कुटुंब मात्र एक असतं,

एका घरातल्या फोडणीची चर चर

सगळीकडे पोहोचत असते

वाड्यात कुणाचेच काही खाजगी नसते.

 

जोशाचं बाळ कुलकर्ण्यांकडे झोपते

बंडुला घरच्यापेक्षा शेजारच्यांची भाजी आवडते,

मिनी लोखंडयांकडे अभ्यासाला बसते

देसाईआजी पावशांची भाजी निवडत असते.

 

भावाकडे मुंज आहे ना, मग अशी कशी जाते

माझ्या पाटल्या घेऊन जा,

नव्या साडीची घडी मोडायचिये घेऊन जा

कुणाचे दागिने, कुणाची पैठणी

कुणाची वेळ कशी साजरी करायची ते वाड्यालाच माहित.

 

जा रे , शेजारून वाटीभर डाळीचे पीठ आण

देसाई वहिनी थोडं दूध द्या,

तुमचा गॅस संपलाय, आमचा घेऊन जा,

पाहुणे आलेत तुमची मोठी सतरंजी द्या

हे संगीत केवळ वाड्यातच गायलं जातं.

 

जोशी वहिनींचे वडील वारले कोकणात

तार मिळताच वातावरण बदललं,

जोशी वाहिनिंचे घर माणसांनी भरलं

वाड्यासह अंगणही गहीवरलं,

सुख दुः खाचं वाटप केवळ वाड्यातच असतं.

 

वाडा प्रेमळ होता, त्याचा धाक होता

कुणालाच एकाकी ठेवत नव्हता,

वाडे गेले, फ्लॅट आले, घरे मोठी पण मने छोटी झाली,

सोयी वाढल्या , रुबाब वाढला

कुटुंबाची संख्या वाढली,

एकाकी कुटुंबाच्या गर्दीची आता सोसायटी झाली.

 

वाडा गेला, नुसताच गेला नाही

माणसामाणसांना बांधणाऱ्या रेशीम धाग्याच्या गाठी उकलून गेला,

वाडा गेला, वाडा गेला

उरला फक्त आठवणींचा पाला.

 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments