श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “मास्तरच्या लेखणीतून …” – लेखक : एक अज्ञात मास्तर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
विद्यालयाच्या जागेपायी
कुणीच इथं भांडलं नाही
अन् देवालयाच्या जागेसाठी
रक्त कमी सांडलं नाही..
माझाच देव मोठा म्हणण्यात
रक्ताच्या नद्या वाहील्या
ज्ञानगंगा कोरडी पडत
ओसाड शाळा झाल्या…
शाळा अजूनही तशीच
पडक्या, तुटक्या भिंतींची
गरीब माझ्या देशामधी
उभी मंदिरं सोन्याची…
शाळेमधली दानपेटी
भरलेली कधी पाहिली नाही
अन् मंदिराची दानपेटी
रिती कधी राहिली नाही…
शाळेतला पालक मेळावा
पालकांवाचून राहून गेला
देवालयात चेंगराचेंगरीत
माणूस मात्र तुडवून मेला…
विद्या, ज्ञान सर्व देऊन
गुरूजी गरीबच राहीला
अन् अंधश्रद्धेचं दान घेऊन
पुजारी मात्र धनवान झाला…
खरंतर धर्म नावाचं पुस्तक
शाळेत कधीच उघडत नाही
अन् धर्माच्या नावाशिवाय
देशात पानही हाललं नाही…
लेखक : एक अज्ञात मास्तर…
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈