सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ आईची आई… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

ज्यांना ज्यांना आई आहे, मग ती तरुण असो की वृद्ध, त्या सर्वांनी मुद्दाम खालील लेख वाचून तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा…!

( पेशाने सर्जन असणाऱ्या मुलाने लिहिलेला अतिशय सुंदर लेख !) 

 

वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खिळली ती कायमचीच. सर्व अवयव नव्वदीतले. 

झिजलेल्या कंबरेवरचा मुकामार तिला कायमचा परावलंबी करून गेला. पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं.

तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच… वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता. 

पण म्हातारपण म्हणजे सुकून जीर्ण झालेलं बालपण. तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी. 

 

सल्ला मसलतींचा पाउस पडला. लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर… मनाला पटेना.

अनेक पर्यायांचा उहापोह झाला. आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. सलग सुट्ट्यांचा दुष्काळ.

मग मीच ठरवलं केअरटेकर व्हायचं. चिडक्या, हट्टी म्हातारबाळाची आई व्हायचं.

 

लाळेरं लावून सकाळी चमच्याने पाजलेला चहा… दमदाटी करत भरवलेलेचे चिऊ काऊचे घास. 

कधी ठसका, कधी मळमळ तर कधी उलटी… बहाणेच बहाणे.

 

पेशाने सर्जन, मलमूत्र रोगांशी जुनी दोस्ती. त्यामुळे संकोच सोडणं सोपं गेलं. डोळे मिटून घेण्याशिवाय तिच्या संकोचाला  पर्यायच नव्हता. वेळोवेळी डायपर बदलून, अंग पुसून, पावडर लावून कपडे घालण्यापासून ते तेल लावून वेणी फणी करण्यापर्यंत सगळं.

 

दिवसातून दोन तीनदा घर ते हॅास्पिटल, हॅास्पिटल ते घर अप-डाऊन. धावपळ होत होती; पण थकवा आला तरी जाणवत नव्हता. तिच्या प्रत्येक हाकेमुळे मनातल्या मनात माझाही पान्हा फुटत असावा. 

मनाच्या कुठल्यातरी पातळीवर कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो. कुठल्याही कळा न सोसता मला तिचं आईपण मिळालं हे माझं किती मोठं भाग्य होतं ! 

 

पण फार काळ नाही. काही महिन्यांची सेवा आणि एका प्रसन्न सकाळी माझ्या हिरकणीने गड सोडला.

 

मी माझं कर्तव्य समजून तिची सेवा केली. कुणीतरी म्हणालं पुण्य कमावलंस. 

त्यांचं खरं असेल तर हे छोटंसं पुण्य चित्रगुप्ताच्या डायरीतील माझं पान भरायला पुरेसं होईल.

 

देव आणि आई एकाच नाण्याच्या दोन बाजू. देव खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वीवर पाठवलं। असं कुठंतरी वाचलेलं. त्या वाक्याचा प्रत्यय यावा अशी आपली आई.

 

रामची असो की शामची.

कैकयी असो की गांधारी.

आई सगळ्यांची सारखीच.

 

शरीराने आणि मनाने आपल्या गूढ देवराईतील शक्ती देवता… फक्त आपल्या भल्यासाठीच तिच्या ओंजळीतली माया रिकामी करणारी लक्ष्मी… प्रत्येकाच्या छोट्याशा आकाशातील अढळ स्थानावरील ध्रुवतारा…  तिचं गुरुत्वाकर्षण तर पृथ्वीपे‌क्षाही भारी. खालून वर नेणारं… बिजांडातून ब्रम्हांडात पोहचवणारं.

तिच्या बिजांडात अंकुरलेला सूक्ष्म कोंब म्हणजे आपण… एक दशांश मि.मि.पेक्षाही लहान. गर्भाशयाच्या भिंतीवर ‌मुळं पसरून, तिचंच रक्त शोषून तगणारं बांडगुळ.

 

मधेच केव्हातरी पारंबी फुटावी तशी नाळ फुटते बेंबीतून. त्यातून मिळणाऱ्या खतावर कोंबाचं रोपटं होण्याची सुरुवात होते… चैत्राच्या पालवीसारखे हळूहळू फुटलेले कोवळे कोवळे अवयव. तिचीच ऊर्जा घेऊन सुरू झालेली इंजिनं… आदिपासून अंतापर्यंत अव्याहत पळणारी.

नव्या फुफ्फुसाचा पहिला श्वास आणि नव्या ह्रदयाचा पहिला ठोका तिच्याच मालकीचा. 

नॅनोग्रॅम पासून ते किलोग्राम पर्यंतची वाढही तिच्याच कोठारातील.

 

कणाकणानं वाढणारं ओझं घेऊन तोल सांभाळणारा कणखर मणका….  

कितीही वाकला तरी पोटातल्या गोळ्याला सुरक्षित वाहणारा. 

लाथा मारणारं बाळ, आणि लाथा मारणारी परिस्थिती, दोघांना झेलत तारेवर झुलणारी डोंबारीण.

 

नऊ महिने नऊ दिवसांची कसरत. .. ढोलकं बडवायला नवरा आणि टाळ्या पिटायला ढिगभर जमाव. 

पण मदतीसाठी थाळी फिरवली की सगळ्यांचं घुमजाव.‌

 

बाळनिवासाच्या पायाभरणीत फिक्कट करणारे दिवस. .. धापा टाकत टाकत केलेलं रांधा वाढा, उष्टी काढा. .. सुजून जडावलेले पाय आणि वाढलेले श्वास म्हणजे घटीका भरल्याची नांदीच.

 

चंद्र, ग्रह, तारे बाळाच्या कुंडलीत स्थिरावले, की सुरू झालेल्या प्रसव कळा.

खोल, गूढ, अगम्य कृष्ण विवरातील वादळ.

सुरुवातीला समुद्राच्या हळुवार लहरींचे हिंदोळे. .. नंतर याच लहरींवर स्वार झालेल्या भरतीच्या धडका…  

एकामागून एक…  

…. बाळाच्या ओढीने वाढलेल्या कळा जणू चंद्रासाठी उसळणाऱ्या पौर्णिमेच्या लाटा. काही सौम्य काही रौद्र… उरल्या सुरल्या शक्तीला मुठीत घट्ट आवळून घेतलेल्या, कळांवर कळा…

 

प्राण पुरवणारा वार जागा सोडण्यासाठी भिंतीपासून विलगू लागतो… 

मुळापासून विस्थापित होण्याच्या भितीने बाळही अस्वस्थ होऊ लागते.. .

अशुभ संकेतांची टिटव्यांची टिवटिव… गुदमरणाऱ्या बाळासाठी, खचलेला धीर मुठीत आवळून एक जोराची किंकाळी आणि  निकराची एक शक्तीशाली कळ.

 

किनारा चिरणाऱ्या पाण्याच्या लोंढयात तरंगत आलेलं आणि दाईने झेललेलं गोंडस बाळ.

…. मातेने सोसलेल्या यातनांना बाळाने रडून दिलेली दाद, म्हणजे बाहेरच्या जगातला पहिला श्वास.

…. दुपट्यातल्या सुखाला उराशी कवटाळून अमृतकुंभाला शोधणाऱ्या अधाशी ओठांना कौतुकाने पाहणारे आईचे डोळे.

…. फुटलेल्या पान्ह्यातून गळणारे थेंब वेदनांचा निचरा करत बाळाच्या ओठांवर विसावले की, अमृताच्या अभिषेकात न्हाऊन तिच्या काळजाचा तुकडा झोपी जातो.

 

माता कुराणातील असो वा पुराणातील. तिचं वात्सल्य कुणालाही नतमस्तक करणारं… 

अनुसूया असो की आदिती….. दिगंबराची असो किंवा पैगंबराची… 

…. आई शेवटी आईच असते !

 

जन्माला आलेल्या बाळासाठी तिचं त्याचं नातं अद्वैत…  

तिने शून्य बॅलन्स वापरून उधळलेली अनमोल ममता… 

त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढणारा प्रत्येक मोठा आकडा तिच्या ममतेशी गुणला की शुन्यच. 

 

जगभर फिरला, पण तिच्या उपकारांची परतफेड करणाऱ्या वस्तूंचा मॅाल नाही दिसला.

 

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासबुकं ही या नात्यात फक्त कागदं आहेत…..  

आईचं कर्ज फेडण्याइतका त्यात बॅलन्स कुठे आहे ?

 

या ओझ्यातून किंचित मुक्त होण्याचा एक मार्ग… एक उतराई…..  

…. शक्य असेल तर जरूर बना !

 

लेखक : अज्ञात.

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments