सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ आयुष्य…एक चकवा.… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
आज दोघंही खूपच आनंदात होते..पुण्याहवाचन करण्याची खूप इच्छा होती पण मुलांच्या रूटिनमध्ये व्यत्यय नको म्हणून एकत्र मानसपूजा केली..लगबगीनी आपल्या वाटणीची कामे आटोपली..मुलांना …नातवंडांना सरप्राईज द्यायचं ठरवून दोघंही संध्याकाळीच घराबाहेर पडले…
“आता कळवू मुलांना” उतावीळपणानी तिनी विचारले..अन् होकाराची वाट न बघताच मोबाईल काढला..
तोच मुलाचा फोन वाजला…टेलिपथी..म्हणतच तिनी आनंदानी फोन घेतला…आणि…काही बोलण्यापुर्वीच तिकडून मुलानी निरोप दिला..
“आई..आज आमचा स्वयंपाक नको करूस हं…हिची मैत्रिण खूप वर्षांनी भारतात आली..तिच्यासोबत डिनरला जायचेय..मुलंही चलणार अाँटीला भेटायला…तुम्ही जेवून घ्या हं…आणि हो..औषध – गोळ्या घ्यायला विसरू नका हं..बाय”…
काहीही न बोलता तिनी फोन ठेवला..
तो किंचीत हसला अन् बोलला..”मुलांचा कार्यक्रम ठरलाय नं”..
तिनी मान हलवली..तो उदासला..म्हणाला..”आता..?..ह्या सरप्राईजचं काय?..”
“आपलंच सरप्राईज..आपणच एंजॉय करायचं..”
त्याचे डोळे भरले…. पण ती शांतच…. “ चल घे…”
रात्री मुलाची व्हॉट्स ऍप पोस्ट आली..” आम्ही पोहोचलो…तुम्ही लवकर या..”
आईनी पोस्ट टाकली..” तुम्ही झोपा..”
मुलानी पुन्हा विचारलं..” तुम्ही कुठे,? “
आईनी दोघांचा हॉटेलमध्ये अरेंज केलेल्या डिनरचा फोटो टाकला..
“त्या” दोघांच्या मागच्या कट-आऊटनी मुलगा दचकलाच…
त्यानी थेट फोन लावला…”आई तुम्ही कोणत्या हॉटेलात आहात..? मी येतोय..”
आई शांतपणे म्हणाली..”असू दे बाळा…आम्ही हॉटेल सोडलंय..आणि हो..आज आम्ही घरी येणार नाही..लोणावळ्यासाठी निघालोय..तुम्ही शांतपणे झोपा..आणि हो..बाबांचं नेहमीचं दरवाजे लावण्याचं काम आजच्या दिवस करून घे हं बेटा..सर्वांना आजच्या विशेष दिवसाचा विशेष आशिर्वाद सांग…बाय..”
मुलानी पुन्हा व्हॉट्स ऍप उघडला..आणि भरल्या डोळ्यानी वाचलं…”50th..Wedding Anniversery”…..
त्यानी हळूच तिचा हात हातात घेतला..डोळ्यांच्या कडा पुसत ती म्हणाली…” जीवन म्हणजे चकवा असतो नाही?…फिरून त्याच जागी आणणारा..?. ..वैवाहिक जीवनाची सुरूवात आपण दोघांनीच केली होती नं?…आजही आपण दोघंच उरलोयत..”
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈