? वाचताना वेचलेले ?

⭐ मन:शांती… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

“काहीतरी कमी करा आणि कढीपत्ता द्या. त्याचे पैसे देणार नाही.”

“माउली, तुमच्याकडून कशाला जास्त घेईन? दोनशे वीस झाले.दोनशे द्या.”

म्हातारबा हसून एवढ्या प्रेमानं बोलले की आपसूक हात पर्समध्ये गेला. पैसे काढत असतानाच मोबाईल वाजला.

बॉसचा फोन.

“येस सर.”

“मेल चेक कर, दहा मिनटात रिप्लाय दे. इट्स अर्जंट.” फोन कट झाला.

बॉसच्या आवाजावरून टेन्शनची कल्पना आली. तातडीने भाजीची पिशवी गाडीला लावून घाईघाईने घरी निघाले.

“माउली, अवो ताई,”

म्हातारबा हाका मारत आहेत, असं वाटलं. पण मी लक्ष दिलं नाही. अर्जंट मेलच्या नादात घरी पोहोचले अन लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसले.

तासाभराने काम संपलं . टेन्शन कमी झालं. कॉफी पिताना भाजीची पिशवी पाहिल्यावर लक्षात आलं की अजून भाजी ठेवायची आहे. सगळ्या भाज्या बाहेर काढल्या आणि हिशोबाला सुरवात केली. म्हातारबांनी केलेला हिशोब बरोबर होता. चक्क कढीपत्ता फुकट दिला होता. रिकामी पिशवी पुन्हा एकदा झटकली, तेव्हा शंभरच्या दोन नोटा खाली पडल्या. नोटा पाहून डोक्यात लख्ख प्रकाश पडला, की मेलच्या नादात पैसे न देताच आपण भाजी घेऊन आलो आहोत.

 “अय्योsssss ”मी जोरात किंचाळले.

“काय गं,काय झालं?” घाबरून नवऱ्यानं विचारलं.

सगळा प्रकार सांगितला. त्यावर तो म्हणाला,

“बरंय की मग.भाजी फुकट मिळाली…”

“काहीही काय!”

“म्हातारबा बिचारे माझ्याशी चांगले वागले आणि मी पैसे न देताच…

माझ्याविषयी ते काय विचार करत असतील?”

“हे बघ, उगीच इमोशनल होऊ नकोस.”

 “त्यांचं विनाकारण नुकसान झालं हो..”

“पण तू मुद्दाम केलं नाहीस ना.”

“हो. तरी पण नुकसान ते नुकसानच.”

“मग आता काय करणार ???”

“मी जाऊन पैसे देऊन येते.”

“अग…बाहेर मुसळधार चालूये. उद्या सकाळी दे…”

“अरे पण…

मनाला चुटपूट लागलीय. म्हातारबा हाक मारत होते पण दुर्लक्ष केलं. मी अशी का वागले?डफर…”

“तू ओव्हर रिऍक्ट करतेस.

एवढं पॅनिक होण्यासारखं काही झालेलं नाही.”

नवरा वैतागला.

“मला खूप अपराधी वाटतंय.

म्हातारबांचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही.”

“मग चेहरा पाडून दु:ख व्यक्त करत बस. मला काम आहे.”

कुत्सितपणे बोलून तो लॅपटॉपमध्ये हरवला.

माझी अवस्थता वाढली. ‘शिकलेली माणसं अशीच फसवाफसवी करतात. नावालाच चांगल्या घरातली.बाकी …..’.असं म्हणत भाजीवाले बाबा शिव्या हासडतायेत असं वाटायला लागलं.

नको त्या विचारांचे डोक्यात थैमान सुरु झालं. कामात लक्ष लागेना. झालेल्या गोष्टीबद्दल मनात दहा वेळा बाबांची माफी मागितली.

तडक जाऊन पैसे देऊन यावे असा विचार आला. पावसाचा जोर होताच तरीही नवऱ्याचा विरोध असतानाही गाडीवर बाहेर पडले परंतु म्हातारबा भेटले नाहीत.

निराश होऊन घरी परतले. माझ्या पडलेल्या चेहऱ्यावरून काय झालं ते नवऱ्याला समजलं. काही बोलला नाही, पण खवटपणे हसला.

नंतरचा माझा सगळा वेळ प्रचंड बेचैनीत गेला. दुसऱ्या दिवशी घाईघाईत घरातली कामं आटपून पैसे द्यायला गेले पण म्हातारबा दिसले नाहीत. आजूबाजूला चौकशी केली पण कोणालाच बाबांविषयी माहिती नव्हती. प्रचंड निराश झाले.अपराधी भाव प्रचंड वाढला. त्यामुळे विनाकारण चिडचिड सुरु झाली.

“बास आता,अति होतंय”

नवरा डाफरला.

“तुला माहितीय. म्हातारबांना पैसे दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही.”

“तू प्रयत्न केलेस ना. थोडी वाट पहा. जेव्हा त्यांना भेटशील तेव्हा दे.

आपल्याला पैसे बुडवायचे नाहीत.”

“आता आठ दिवस लॉकडाऊन आहे”

“म्हणजे दोनशे रुपयांचे भूत आठ दिवस डोक्यावरून उतरणार नाही.”नवऱ्यानं चिडवलं, तेव्हा मला सुद्धा हसायला आलं.

लॉकडाऊनच्या काळात सुद्धा काहीतरी निमित्त काढून भाज्यांच्या गाड्या जिथं असतात, तिथं रोज जात होते. पण एकदाही बाबा भेटले नाहीत.

 म्हातारबांविषयी सारखी चौकशी करत असल्याने तिथले भाजीवाले ओळखायला लागले होते. लॉकडाऊन संपल्यानंतर एका भाजीवाल्याने म्हातारबांच्या भाजी विकणाऱ्या नातवाविषयी सांगितले.

“दादा, मला तुमच्या आजोबांना भेटायचे आहे.”

नातवाने विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत विचारलं,

“कशासाठी ?काय काम आहे ?”

“कुठं भेटतील ?”

“आज्याची तब्येत बरी नायी. घरीच हाय. ते आता गाडीवर येणार न्हाईत.”

“मला त्यांना भेटायचंय. पत्ता देता, प्लीज.”

नातवाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून मी घडलेला प्रकार सांगितला.

“माज्याकडे द्या. आज्याला देतो.”

“नाही. मला बाबांनाच भेटायचंय. त्यांची माफी मागायचीय.”

त्याने घरचा पत्ता दिला.

ताबडतोब नवऱ्याला घेऊन वस्तीत गेले. एकाला एक लागून असलेली घरे आणि त्यांच्यामधेच असलेला जेमतेम पाच फुटांचा रस्ता. अरुंद बोळ, उघडी गटारं, धो धो वाहणारे नळ, तिथंच कपडे धुणाऱ्या बायका, खेळण्यात हरवलेली लहान मुलं…अशा परिस्थितीत पत्ता विचारत वस्तीच्या आत आत चाललो होतो. अलीबाबाच्या गुहेसारखं वस्तीच्या आत एक निराळंच जग होते.

अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर एकदाचं घर सापडलं.

“आजोबा आहेत का?”

दारात तांदूळ निवडत बसलेल्या आजींना विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्नचिन्हं ?

त्यांनी हाका मारल्यावर म्हातारबा बाहेर आले.

“आजोबा, ओळखलं का ?”

चटकन डोळ्यात पाणी आलं. “वाईच थांबा.चष्मा आणतो.”

म्हातारबा चष्मा घालून आले. मी तोंडावरचा मास्क बाजूला केला.

“आ…,माउली..,तुमी इथं?आत या.”

म्हातारबांचे आदरातिथ्य पाहून आम्ही दोघंही भारावलो.

घरी आलेल्यांचे मनापासून स्वागत होणं,हे आजकाल दुर्मिळ झालंय.

“बाबा,पुन्हा येईन. आज जरा घाईत आहे. पैसे द्यायला आले होते.”

“कसले पैसे?”

“भाजीचे. त्या दिवशी गडबडीत…..”

दहा दिवसांपूर्वी घडलेला प्रकार मी सांगितला, तेव्हा म्हातारबा प्रसन्न हसले.

“माफ करा. चुकून झालं.”

मी हात जोडले.

“अवो, कामाच्या गडबडीत व्हतं अस. माऊली, हे पैशे मिळणार याची खात्री व्हती.”

“कशावरून??”

“माणूस चांगला की लबाड, हे माणसाच्या बोलण्या-वागण्यावरून ह्ये अनुभवी नजरंला बरुबर समजतं.”

“ताई, पैशासाठी यवडी इतवर आलात तवा घोटभर च्या तरी घ्याच.”

आजीबाईंचा आग्रह मोडता आला नाही. चहा घेऊन निघताना….

“बाबा, पुन्हा सॉरी…..”

मी वाकून नमस्कार केला. तेव्हा म्हातारबांनी थरथरता हात डोक्यावर ठेवून भरभरून आशीर्वाद दिला.

“हॅप्पी ?” घरी जाताना नवऱ्याने विचारलं…

तेव्हा मी मान डोलावली.

“पैसे दिले नसते तरी चाललं असतं.बाबा तर साफ विसरले होते.”

“ते विसरले होते. पण मी नाही. त्या चुकीची सल मला त्रास देत होती.”

“काय मिळवलं एवढं सगळं करून??”

“ मनःशांती…!”

मोजता येणार नाही असं समाधान मिळालं. ही धावपळ बाबांच्या पैशासाठी नाही तर स्वतःसाठी केली.

माझ्यातला चांगुलपणा जिवंत ठेवण्यासाठीच हा सगळा आटापिटा.

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments