सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ जुने कपडे… ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन  भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली, श्रीमंत घरातली ती महिला, एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली.

“नाय ताई ! मला न्हाय परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या पायजेत.” म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून अदबीने काढून आपल्या हाती परत घेतले.

“अरे भाऊ …, फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही. बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत. तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशा तर फार जास्त होतात. मी म्हणून तुला दोन साड्या तरी देतेय.”

” ऱ्हावू द्या, तीनपेक्षा कमीमध्ये तर मला अजिबातच परवडत न्हाय.” तो पुन्हा बोलला.

आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघं प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडेवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिणीकडे पाहात पाहात समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका पारोश्या, केस पिंजरलेल्या, वेडसर महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिणीला ‘मला कांही खायला द्या’ अशा अर्थाच्या काही खाणाखुणा केल्या .

त्या श्रीमंत महिलेनं एकवार किळसवाण्या, जळजळीत नजरेनं त्या वेडसर महिलेकडे पाहिलं. तिची नजर त्या वेडसर दिसणार्‍या महिलेच्या कपड्यांकडे गेली. जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपली लाज झाकायचा तिचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत होता.

त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी, पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विन्मुख परत जाऊ देणं योग्य होणार नाही, असा विचार करीत आदल्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या घरातून आणून देत त्या तिनं त्या वेडसर भिकारणीच्या ओंजळीत टाकल्या आणि भांडेवाल्याकडे वळून ती त्याला म्हणाली, “हं. तर मग काय भाऊ? तू काय ठरवलंयस ? दोन साड्यांच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस की परत ठेवू या साड्या?”

यावर काही न बोलता शांतपणे भांडेवाल्यानं तिच्याकडून मुकाटपणे त्या दोन्ही जुन्या साड्या घेतल्या, आपल्या गाठोड्यात टाकल्या. पातेलं तिच्या हवाली केलं आणि तो आपलं भांड्यांचं टोपलं डोक्यावर घेऊन लगबगीनं निघाला.

विजयी मुद्रेनं ती महिला हसत हसतच दार बंद करायला रेंगाळली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली.तो भांडेवाला आपल्याजवळचं कपड्यांचं  गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला त्यानं आताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या दोन साड्यांपैकी एक साडी तिचं अंग झाकण्यासाठी तिच्या अंगावर पांघरत होता. त्याने ती साडी पांघरली आणि तो शांतपणे तिथून निघूनही गेला.

आता मात्र हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार जड झाल्यासारखं वाटू लागलं. त्या भांडेवाल्यासमोर आता तिला एकदम खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही भांडेवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवलं.

तासभर घासाघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त दोनच साड्या घेऊन ते मोठं पातेलं  देऊ करायला एकाएकी का तयार झाला होता,याचं कारण  तिला आता चांगलंच उमगलं होतं.

आपला विजय झाला नसून आज त्या यःकश्चित भांडेवाल्यानं आपल्याला पराभूत केलं आहे ह्याची तिला आता जाणीव झाली होती.

तर…कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं.

आपल्याजवळ देण्यासारखे काय  आहे  आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही.

ज्याच्याकडे जे आहे , ते त्याने द्यावं. मदत फक्त पैसा खर्च करूनच करता येते असं नाही. तर वेळ,मानसिक,भावनिक आधार देऊन एखाद्याचे जीवन आपण अधिक सुसह्य बनवू शकतो.

रस्ता ओलांडण्यास केलेली मदत,एखाद्याचं ओझं उचलून देण्यास केलेली मदत तितकीच मोलाची.

आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून जर एखाद्यात सकारात्मक बदल होत असतील, तर तीही एक प्रकारची मदतच.

गरज आहे ती आपले विचार करण्याच्या पद्धतीत व नियतीत शुद्धता असण्याची.

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments