📖 वाचताना वेचलेले  📖

☆ शिताबाई काय बोलं… श्रीअभिजीत साळुंखे ☆ प्रस्तुती – सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆

‘ चांदण्यांचं खळं ‘  या सदरात श्रीअभिजीत साळुंखे यांनी दिलेले ग्रामीण लेखन. सीतामाईचे वनवासी जीवन हे स्त्री जीवनाच्या त्रासाचे मूळ आहे असे या महिलांना वाटते, हे या शब्दांमधून जाणवते. भाषेचा बाज पूर्ण ग्रामीण, ओवी रचनेत आहे. …. 

न्हवायिळा ग राम  बाई चैताचा गारयीवा

सीता ग मालनीचा रख रख वैशाखी जारयिवा

….. चैत्र पालवीच्या गारव्यात रामाचा जन्म झाला तर वैशाख शुद्ध नवमीला वैशाखाच्या उन्हात सीतामाईचा शेतात शोध लागला

आकाशाचा पाळणा खाली धरती मावली

 नांगराच्या ताशी सीता जई- अभिव्यक्तीनकाला गावली

राम सीतेची जोडी लोक वाङ्मयात जानपद लोक घेतात ती एकरूप झाली आणि बाया बापण्यांनी आपली संसारीक सुख दुःख या भावभावनांची बिरुदं त्यांना लावून आपल्या आयुष्याशी जोडली. 

कवसलीचा राम न्हाय शितंच्या तोलायाचा 

शिता ग हिरकणी राम हलक्या कानायाचा

सीतेला तीन सासवांचा सासुरवास होता हे सांगताना म्हणतात- 

कैकयी सुमती कवसला शितला तीन सासा

 लेक धरतीची सीता त्यांनी धाडला वनवासा

 शितला सासुरवास केला ग केशोकेशी

 सयांस्नी वाटून दिला तिने गं देशोदेशी

बायांचा जाच हा सीतेचाच वाण-वसा असं त्या मानतात. 

वनवास आला शितंसारख्या सतीला 

बारा वर्ष झाली डुई धुतली नहिला

 सासुरवासाचा फास शिते सारख्या सतीला 

घडोघडी परीक्षा बाई जन्माच्या परतीला

रावणाच्या कैदेतून सुटल्यावरही तिला चारित्र्य शुद्धतेसाठी अग्नीपरीक्षा  द्यावी लागली

सतीपणाचं सत्व  दाह आगिनं इजल 

सीता ग मालनिचं मन घडी घडी न झुंजल

गरोदर असतानाही तिच्याबरोबर कोणीही नव्हतं वार्ड चालू होती रडत होती 

आटंग्या वनामध्ये कोण रडत ऐका 

शीतंला समजावती बोरीबाभळी बायका… 

सिता सतीला वनवास असा किती करतील

 लवकुश पोटाला येतील सूड रामाचा घेतील

नंतर लवकुश्यासह सीतेचा स्वीकार केला आणि तिला आणायला लक्ष्मणाला रथ घेऊन पाठवला 

लक्ष्मणदीर रथ सांगाती घेऊन

 वहिनीला न्याया आला मुरळी होऊन 

लक्ष्मण हाका मारी वहिनी चला व घराला 

वाट बघती समधी डोळे लावून दाराला

सीता लव कुश बाळांना त्यांच्याकडे देऊन निश्चयाने म्हणते 

‘आता कशाला जोडू बाई फिरून नातीगोती ‘

वर पडलाय जीव झाली आयुष्याची माती 

वसर वसर माऊली माझे माय धरत्री 

घेई लेकीला पोटात जीव निवू दे अंतरी

…. सीतेचं मातीत सापडणं आणि नंतर कौटुंबिक सुखदुःख भोगून फिरून मातीत जाणं याचा दुवा थेट आपल्या जगण्याबरोबर जोडून या मायमालयांनी मातीच्या लेकीने तिला आपल्या लोकगीतात लोकलयीनं अजरामर केलं. 

लेखक : श्री अभिजित साळुंखे 

माहिती संकलन :   सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी

सातारा

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments