? वाचताना वेचलेले ?

☆ “चौकट आक्रसत चाललीय..” – लेखक : श्री प्रभाकर जमखंडीकर ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

माझ्या घराजवळच एक लॉन्ड्री आहे. एक 65 वर्षाच्या आजी ती लॉंड्री चालवतात. तशा त्या ‘वेल टू डू’ फॅमिलीतल्या आहेत.त्यांचा मुलगा  इंजिनिअर आहे. पण वेळ छान जावा आणि तब्येत व्यवस्थित रहावी म्हणून त्या काम करतात. आठवड्यातून दोनदा मी लॉन्ड्रीत जातो. बरेचदा आजींच्या मैत्रिणी तिथे गप्पा मारण्या साठी जमलेल्या असतात. कधी कधी आजींची नातवंडं सुद्धा तिथे खेळत असतात. खोड्या करतात, भांडतात. आजी सर्वांना मायेनं सांभाळून घेतात.

असाच एकदा मी कपडे इस्त्रीला टाकण्यासाठी तिथे गेलो होतो. आजींच्या बाजूला त्यांचा नातू उभा होता. आज तो खूपच छान नटून आलेला. कपाळावर अष्टगंधाचा टिळा, छान नवे कपडे. तीन चार वर्षांचा त्यांचा नातू, छान गोरा, गुटगुटीत अन् गोड. तो त्याच्या आजीला सांगत होता, “आजी तू उद्यापासून त्या सुमंत आजीबरोबर बोलायचं नाही बघ.” आजीने विचारलं, “का रे, काय केलं त्या आजीनं तुला?”

तो: “काही नाही. असंच.”

आजीनं पुन्हा पुन्हा विचारलं, पण तो काही कारण सांगत नव्हता. त्याचं आपलं एकच पालुपद, “तू त्या आजीबरोबर नाही बोलायचं.” शेवटी आजी म्हणाल्या, “थांब मी त्यांना फोन करून बोलवून घेते अन विचारतेच, काय केलं आमच्या नातवाला म्हणून.”

मग नातू सांगू लागला, “मी त्यांच्या समोरुन दोनदा गेलो. तरी आजी मला ‘हॅपी बर्थडे’ म्हणाली नाही. तू नाही बोलायचं.” अच्छा! म्हणजे आजीनं ‘हॅपी बर्थडे’ म्हटलं नाही याचा त्याला राग आला होता तर.

मला आणि त्या आजींना, दोघांनाही हसू आवरेना. तरीही हसू आवरुन आजी म्हणाल्या, “अरे त्यांच्या लक्षात आलं नसेल. त्या आता म्हाताऱ्या झाल्यात. तू सांगायचं ना त्यांना, ‘आज माझा बर्थडे’ आहे म्हणून.”

नातू: “मग मागच्या महिन्यात दिदीचा कसा लक्षात आला त्यांच्या? त्यांनी मुद्दाम केलंय. तू त्यांच्याशी नाही बोलायचं आता.”

आजी: “बरं, जाऊ दे. नाही बोलत त्यांच्याशी.” नातू परत आपल्या खेळात रमला. मला गंमत वाटली. एवढ्याशा मुलाला सुध्दा किती इगो, मान – अपमान! मी त्याच्यापाशी गेलो, हात पुढे केला अन ‘हॅपी बर्थडे’ म्हणालो. त्याने हात पुढे केला आणि थँक्स म्हटलं.

तेवढ्यात आजी म्हणाल्या, “अरे काकांना नमस्कार कर.” पण त्याने ऐकलं नाही. आजीचं कपडे मोजणं चालू होतं. मी मग शेजारच्या दुकानातून एक कॅडबरी घेतली आणि त्याला दिली. त्याने ती पट्कन घेतली आणि चट्कन मला वाकून नमस्कार करुन तो पळून गेला.

गोष्ट छोटीशीच, पण मला खूप काही शिकवून गेली. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आज इगो आहे. ‘माझ्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येकानं वागलं पाहिजे. अन्यथा मी त्याला माझ्या आयुष्याच्या चौकटीतून बाहेर काढणार! अथवा माझी चौकट आकसून घेणार. मी दुसऱ्याला सामावून घेण्यासाठी माझी चौकट मोठी करेन’ असं कोणीच म्हणायला तयार नाही.

परिणाम… आज प्रत्येकजण आपापली अरुंद चौकट घेऊन एकटाच जगतो आहे. नातेवाईकांमध्ये तेच, मित्रांमध्ये तेच, ऑफिसमध्ये तेच, समाजात तेच. स्वतःच्या मिळकतीवर अन हिमतीवर फाजील विश्वास असल्यानेच हे सगळं असं घडतंय. पूर्वी लोक एकमेकांवर अवलंबून होते तेच बरं होतं, असं म्हणायची वेळ आलीय. लाखोंच्या गर्दीतही माणूस एकटा पडलाय. पण इगो इतका झालाय, की त्याला तेही समजेनासे झालंय.

स्वार्थ तर इतक्या टोकाला गेलाय की आपला फायदा असल्याशिवाय कोणी कोणाला विचारतच नाही. जिथे फायदा दिसतो, तेथे लोटांगण घालतील. पण फायदा नसेल किंवा फायदा करून झाला असेल, तर ते तुमच्याकडे  पाहणार नाहीत. खरं तर आपण इतके वाईट कधीच नव्हतो. पण मग हे असं का व्हावं? नेमकं गणित कुठे बिघडलं अन आपली संस्कृती, संस्कार असे रसातळाला कसे गेले?

मला वाटतं, आपण पुन्हा नव्याने मुलांना ‘मी आणि माझा’ च्या पलीकडे पहायला शिकवलं पाहिजे. तेही आज आणि आत्ताच. अन्यथा परिस्थिती असहाय्यपणे बघत बसण्याखेरीज आपल्या हातात काही उरणार नाही एवढं खरं.

लेखक : श्री प्रभाकर जमखंडीकर

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments