📖 वाचताना वेचलेले 📖

समज  गैरसमज… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

तहानभुकेने अगदी व्याकुळ,घामाने चिंब झालेले तुम्ही  बऱ्यापैकी सावली असलेलं  झाड शोधून आसपास कुठे पाणी मिळतंय का,हे बघताय तेवढ्यात समोरच्या बिल्डिंगमधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष जातं आणि ती व्यक्ती तुम्हाला ‘पाणी हवंय का?’ विचारते.

त्या क्षणी तुम्हाला काय वाटेल ? त्या व्यक्तीबद्दल तुमचं मत काय होईल ?

ती व्यक्ती मग  खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते, तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची १५ मिनिटं तिथे कोणीही येत नाही !

आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल  काय वाटेल?

हे तुमचं दुसरं मत असणार आहे.

थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते, “सॉरी!मला जरा उशीर झाला; पण तुमची अवस्था बघून, मी तुम्हाला नुसत्याच  पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलं आहे !”

आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल मत काय आहे ?

तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येतं की अरे, ह्यात साखर अजिबातच नाहीये !

आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत होईल?

तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊच काढते आणि म्हणते

“तुम्हाला चालत असेल, नसेल आणि किती कमी- जास्त गोड आवडत असेल हा विचार करून मी मुद्दामच आधी साखर घातली नाहीये.”

आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत झालं आहे ?

मग विचार करा :अवघ्या १५ -२० मिनिटात तुम्हाला तुमची मतं , तुमचे आडाखे भरभर बदलावे लागतायत. अगदीच सामान्यातल्या सामान्य परिस्थितीत क्षणात आपले विचार, आपली मतं तद्दन चुकीची ठरू शकतात, तर मग कोणाबद्दल फारशी काहीच माहिती नसताना, ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे, हे माहीत नसताना, केवळ वरवर पाहून, त्याबद्दल चुकीची समजूत करून घेणं योग्य आहे का ? जर नाही, तर एखाद्या बद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणं योग्य नाही का ?

असं आहे की जोपर्यंत कोणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतंय तोपर्यंतच ते चांगले असतात, नाहीतर वाईट ? गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात. तेव्हा एकमेकांना समजून घ्या.म्हणजे जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत.

मत बनवताना घाई करु नये.

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments