? वाचताना वेचलेले ?

☆ परतीचा फराळ – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

परतीचा पाऊस असतो, तसा परतीचा फराळही असतो. आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा …!

घराघरात कुशल गृहिणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपूर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात. मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो. निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत, तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो.

ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं, तशा केल्या आणि संपल्यासुध्दा अशा गायब होतात.

चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो. पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो. ती खाल्ल्यावर डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणाऱ्याला, फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी, असं माझं मत आहे.

पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो. कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्त्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय.

प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते ती गृहिणींना अचूक माहीत असते. इतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळीभाबडी जनता उगाच आनंदून जाते. पण त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं.

डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळयांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवला जातो. कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ येत असते.

जास्त मीठ मसाला तळाशी असलेला दाणे संपत चाललेला चिवडा कांदा- टाॅमेटो -कोथिंबीरीचा मेकअप करुन समोर येतो. मिसळीचा बेत आखला जातो.

शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही. तो संपतो. पोहे उपमा करुन त्यावर सजावटीसाठी वापरली जात ती संपते.

असा हा ‘परतीचा फराळ’ दिवाळीच्या आठवणींचा… रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा…जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचा… जाताजाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र धमाल करु म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यातून बाहेर पडणारा… गृहिणीला केल्याचं समाधान- कौतुक देणारा…आणि शेवटी शेवटी संपत जाताना आणखी चविष्ट होत जाणारा … परतीचा फराळ.

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments