सौ. शशी नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
☆ फटाके आणि फाटके… – लेखक : श्री. बापूसाहेब शिंदे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
परवा सहज बाहेर पडलो. दिवाळी तशी म्हटली तर संपत आली होती.तसंही हल्ली दिवाळी पाचवरून दोन दिवसावर आली आहे.
म्हटलं,जरा सकाळी सकाळी फेरफटका मारून येऊ.
असाच रस्त्याने एकटा चालत होतो. अचानक माझी नजर रस्त्याचा दुसऱ्या बाजूला गेली.
४-५ पोरं-पोरी. जेमतेम ७-१० वयोगटातील असतील…
पोरं तशी फक्त चड्ड्या घालूनच होती आणि त्या पण बऱ्याच ठिकाणी फाटलेल्या, नायतर ठिगळं जोडलेल्या.पोरींचे कपडे पण तसेच ठिगळंच जास्त होती.
प्रत्येकाच्या हातात झाडू होता आणि ते रस्त्याला पडलेले फटाक्यांचे कागद झाडून काढत होते.
जेवढा आनंद आमच्या पोरांच्या चेहऱ्यावर फटाके फोडताना दिसत असतो, त्यापेक्षा दुप्पट त्यांच्या चेहऱ्यावर होता.
जणू त्यांच्यातच शर्यत लागली होती, जास्त कचरा कोण साफ करतोय.
मला कुतुहल वाटलं त्यांचा उत्साह आणि ती धावपळ पाहून .
मी सहज रस्ता पार करून त्यांचेकडे गेलो.
सर्वांना बोलावले आणि विचारले,
“का रे,एव्हढी का गडबड सुरू आहे तुमची..?”
हे ऐकून त्यातला एक पोरगा म्हंटला,
”आमचे आई- बाप रस्त्याची साफ सफाई करतात. आम्हाला दिवाळीची सुट्टी आहे,
म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय, जो जास्त झाडलोट करेल त्याला भरपूर दिवाळी फराळ आणि नवीन कपडे मिळतील आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या कचऱ्याचे वेगळे वेगळे ढीग करायचे.मंग आमचे आय – बाप त्यात काय फटाके असतील तर ते आम्हाला शोधून वाजवायला देणार…”
हे ऐकून मी सुन्न झालो. त्यातून मी सावरून सहज विचारले,”अरे, तुम्हाला तर फटाके ह्यातले शोधून देणार. मग तुम्हाला नवीन कपडे आणि फराळ कसा काय देऊ शकतात ते..?” त्यांच्यातली सगळ्यात मोठी पोरगी बोलली,
”काका ते आमचे आई बाप झाडू मारत मारत जे बी घर रस्त्यात येतं,त्यांना विचारतात काय फराळ उरले असेल तर आमच्या पोरासनी द्या. कुणी देतो,कुणी असूनही हाकलून देतं.
काही लोक लय चांगली असतेत. ते न इचारता देतात.कपड्याचं पण तसंच. कुणी चांगली कापड देतं, कुणी फाटलेली मग आमची आई त्याला जमत असल तर शिवते नायतर ठिगळ लावून देते आणि मंग आम्ही ती आमची दिवाळीची कापडं म्हणून वरीस भर घालून फिरतो…”
हे माझ्यासाठी खूप भयानक होते,
असंही असू शकतं ह्यावर माझं विश्वास बसेना. माझ्या पायाखालची जमीनच सरकली….
सुख – समाधान कशात असतं,हे मला ह्या १० वर्षांच्या पोरांनी दोन मिनिटात शिकवलं होतं.
नाहीतर आम्ही १०० ची माळ आणली तरी त्या मोजत बसतो आणि १-२ फटाके जरी उडले नाही किंवा आवाज जरी कमी वाटला तरी सणासुदीला पण त्या दुकानदाराचा उद्धार करत बसतो…
कपडे तर आम्ही AC शोरूम शिवाय घालतच नाही. त्याशिवाय दिवाळी होतंच नाही, असा आमचा गैरसमज असतो.
कुठं ती AC त गारठलेले कपडे आणि कुठं ती ठिगळांची कपडे ज्यातून गारठापण रोखला जात नाही.
पण त्यासाठी त्या छोट्या जिवांची चाललेली धडपड .त्यांची धडपड आणि आमची धडपड पाहून एकच फरक जाणवला, ते आनंदानं समाधानाने मिळेल तेच सुख मानणारी वाटत होते , पण आमची धडपड ही कधीच आनंदी वाटली नाही.कधी चेहऱ्यावर समाधान दिसलेच नाही.
पण धडपडत राहत जायचे हेच आम्हाला माहिती. कारण आम्हाला सुख कशात आहे,
हेच समजत नाही .मी तसाच मागे फिरलो …घरातले सारे डब्बे शोधू लागलो. मिळेल तो फराळ पिशवीत घातला, पोरांचे मिळतील ते ५-६ कपड्याचे जोड, बायकोच्या कपाटातल्या ढीगभर साड्यातल्या ३-४ साड्या, माझी काही कपडे एका पिशवीत भरले आणि थेट त्या पोरांकडे निघालो.
इकडे माझं काय सुरु आहे, हे माझ्या बायको पोरांना समजत नव्हते .त्यांचा तिकडे दंगा सुरु होता. आमचे कपडे ,खाऊ घेऊन गेले.
मी ते सारं त्या पोरांना दिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं.
मी परत फिरलो आणि जाता जाता त्यांना सांगितलं, इथून पुढं कोणत्याही सणाला माझ्या घरी यायचं आणि इथून पुढे तुम्हाला दिवाळीचे नवीन कपडे ,फराळ आणि फटाके दरवर्षी मी देत जाईन …माझे डोळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पाण्याने डबडबले.
स्वतःला सावरत घरी आलो.
आता माझी बारी होती. मला घरी उत्तर द्यायचे होते …मी घरी पोहचणार तोच दारात सारी मंडळी उभी होती. मी तसाच पायरीवर बसलो. दोन्ही मुलांना जवळ घेतलं.बायको फुगून दाराला टेकूनच उभी होती. मी मुलांना जे काय पाहिलं ते सगळं सांगितलं.
आपण आपल्या ऐपतीप्रमाणे भारीत भारी कपडे, दागिने, सुगंधी साबण आणि सुगंधी उटणं लावले तरच दिवाळी होते, असं समजून आपण विनाकारण किती वायफळ खर्च करतो आणि समाजात असे किती तरी लोक आहेत ज्यांना साधं साबण , तेल अशा साध्या साध्या त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळत नाहीत.
हे समजावू लागलो. तुम्ही २ फुलबाजे कमी घेतले तरी रुसून बसता पण ती मुलं तुमच्या उडवलेल्या फटक्याच्या ढिगातून एकादी न उडलेली फटाकी मिळेल ह्या आशेने मन लावून तुम्ही केलेला कचरा साफ करत आहेत.
हे समजावण्याचा प्रयत्न करत होतो.
ती पोरं रस्ता झाडत झाडत आमच्या घराजवळ आली होती.आमच्या घरचे सारे टक लावून त्यांचेकडे पाहत होते.
साऱ्यांचे चेहरे पडले होते.
तोच माझा छोटा मुलगा माझ्या जवळून उठला, थेट घरात गेला आणि लपवून ठेवलेले एक टिकल्याचे पॅकेट आणि बंदूक घेऊन बाहेर आला नि सरळ त्या पोरांकडे गेला आणि त्यांना दिले.
हे पाहून त्या पोरांनी काम सोडलं आणि जणू काय आपल्या हातात हजाराची माळ पडल्यासारखे एक-एकजण ते टिकल्या बंदुकीत घालून वाजवत नाचू लागले.
माझा मुलगा तसाच पळत आला नि माझ्या कुशीत बसून रडायला लागला. त्याला काय समजलं मला माहिती नाही आणि मीही त्याला विचारणं मुद्दाम टाळलं,काहीही असेल…
तरी एक वात पेटली होती याची मला जाणीव झाली होती. ह्या साऱ्यातून एक गोष्ट मला आणि माझ्या कुटुंबाला समजली. ती म्हणजे “फटाके”आणि “फाटके” ह्यात फक्त एका “कान्याचा” फरक असतो आणि तो “काना” एकाद्या “काठी” सारखा असतो योग्य ठिकाणी लागला तर साऱ्या गोष्टींचा आनंद देणारा आधार बनतो. नाहीतर ते आयुष्याचं ओझं होतो ….
म्हणून ठरवलं आता कोणताही सण आला की अशा २ का होईना,पण ह्या पोरांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम करायचं.
फटाके एकदा पेटले की एकदा मोठा आवाज करून कागदच होतात पण कोणाच्यातरी चेहऱ्यावर एकदा पेटवलेले आनंदरुपी समाधान आवाज न करता पण एखाद्या रंगीत फुलबाज्याप्रमाणे फुलत राहतं.
लेखक :श्री.बापूसाहेब शिंदे.
संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈