सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ सहावे सुख… — लेखिका : शांता शेळके ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
चिनी लोकांत एक प्रथा आहे. ते परस्परांचे अभिष्टचिंतन करतात त्यावेळी ” तुला सर्व सहा सुखे मिळोत ” असा आशीर्वाद देतात. पाच सुखे म्हणजे – आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार व चांगली मुलं.
सहावे सुख म्हणजेच ज्याचे त्याला कळावे असे सुख. ते त्याचे त्यानेच आयुष्यात शोधून काढायला हवे. ते सहावे सुख समोरच्या माणसाला सापडावे, लाभावे असे अभिष्टचिंतन करणारा म्हणत असतो.
आपल्याकडे तर ज्ञानेश्वरमाऊलींनी सांगितले आहेच “जो जे वांछील तो ते l लाहो प्राणिजात “
प्रत्येकाचं हे सहावे सुख निराळे असेल.
समाजात प्रत्येकाचे राहणीमान वेगळे, आर्थिक स्तर वेगळे, गरजा वेगळ्या. ह्या सगळ्याचा विचार केल्यावर वाटलं त्याचं त्याचं सहावे सुख वेगळे.
आजच्या टप्प्यावर ज्या गोष्टी मला व्हायला हव्या आहेत त्या त्या माझं सहावे सुख असू शकतात.
पण त्या सहाव्या सुखामागे पळायला मला आवडणार नाही. जे आहे, जे मिळतंय ते माझं सहावं सुख आहे.
छान कार्यक्रम बघायला मिळावेत, ट्रिपला जायला मिळावं, आरोग्यपूर्ण असावं – निदान तब्येतीची तक्रार नसावी. चांगलं चांगलं लिहायला सुचावं. ही माझी सहावी सुखं आहेत. तसं तर यादी करू तितकी कमी वा जास्त होईल.
आत्तापर्यंत राहिलेल्या गोष्टी करायला मिळाल्या तर ते ही सहावं सुख असेल. ह्या लेखाच्या शेवटाकडे येताना शांताबाई ते सुख कसे सापडेल हे सांगतात. त्या म्हणतात, त्याचा शोध आपोआपच लागतो.
खरं आहे ते. सुखाच्या खूप मागे लागण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीच्या मागोमाग जाण्यातच खरं सुख आहे. त्या वाटेवर चालताना आनंदाचं झाडं मिळेल, खळाळणारा झरा लागेल, कधी ऊन कधी सावलीचा लपंडाव असेल, गाणारी वाट असेल…. स्वतःची चित्तवृत्ती समाधानी ठेवणं हे सहावं सुख सगळ्यांना लाभावं.
लेखिका : शांता शेळके
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈