सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,

आज उगाचच खूप वर्षांनी आठवली !

शाळा तर कधीचीच संपलीय, पण,

परीक्षेची धडधड मात्र तशीच राहिलीय !!

 

“शब्दांचे अर्थ लिहा” म्हटल्यावर,

अचूक अर्थ आठवायचे !

आता अर्थही बदललेत आणि,

शब्दही अनोळखी झालेत !!

 

“समानार्थी, विरुद्धार्थी शब्द”,

गुण हमखास मिळायचे !

आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,

अन् अर्थांचे अनर्थ झालेत !!

 

“गाळलेल्या जागा भरा”,

हा प्रश्न पैकीच्या पैकी गुण देणारा !

प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच, 

गाळलेल्या जागा भरल्यात!

आयुष्यातल्या काही जागा मात्र,

आजही रिकाम्याच राहिल्यात !!

 

पेपरातल्या “जोड्या जुळवा”,

क्षणार्धात जुळायच्या!

पण नात्यांच्या जोड्या, 

कधी जुळल्या,तर कधी, 

जुळता जुळता फसल्या !

 

“एका वाक्यातल्या उत्तरा”नं पाच मिनिटात,

पाच गुण मिळवून दिलेत !

आयुष्यातले काही सोप्पे प्रश्न,

आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,

एकाच जागी उत्तराची वाट बघत.

 

“संदर्भासहित स्पष्टीकरण” लिहिताच,

पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच !

आता स्पष्टीकरण देता देता

जीव जातो !!

 

“कवितेच्या ओळी पूर्ण” करणं,

अगदी आवडता प्रश्न!

आजही शोध सुरु आहे, 

कवितेच्या सुंदर ओळींचा !

एका चालीत, एका सुरात गाताना,

मिळेल कधीतरी, पूर्णत्व आयुष्याला !!

 

“निबंध लिहा”, किंवा “गोष्ट लिहा”,

पाचापैकी तीन गुण देणारच देणार !

आता कितीही कल्पना लढवा,

किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,

पण त्याचा विस्तार मात्र नियतीच ठरवणार !!

 

तेव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो !

काही प्रश्न “option” लाही टाकायचो !

आता परीक्षा आधीच द्यावी लागते,

अभ्यासक्रम मात्र नंतर कळतो !!

आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,

आणि कुठलाच प्रश्न ऐच्छिक नसतो !!

 

शाळेत सोडवलेली मराठीची  प्रश्नपत्रिका,

आज उगाच खूप वर्षांनी आठवली.

तेव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली !!

 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments