सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ छोटीशी कृती… — लेखक : शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

छोटीशीच गोष्ट असते एखादी. सहज शक्य आहे म्हणून कोणीतरी काहीतरी करून जातं आणि त्यातून दुसऱ्या शक्यता निघत जातात आणि अंतिमतः जो परिणाम असतो तो कधी कधी आपल्या अपेक्षेपेक्षाही मोठा आणि सुखद धक्का देऊन जाणारा असतो. दिवाळीची पणती छोटीशीच असते, पण ती लावण्याची छोटीशी कृती आजूबाजूचा प्रत्येक अंधारा कोपरा उजळवून टाकणारी असते!

तीन-चार महिन्यांपूर्वी माझ्या साड्या पिकोला द्यायला म्हणून माझ्या नेहमीच्या दुकानात गेले होते.तिथे एका दुपट्यावर एक छोटंसं बाळ होतं. खूप मोठ्याने रडत होतं. मुलगी होती. आकारावरून तीन-चार महिन्यांची वाटत होती. तिच्या हातात दुधाची बाटली होती. पण मुलीचा वरचा ओठ दुभंगलेला असल्यामुळे तिला दूध नीट पिता येत नव्हतं.

‘कोणाची मुलगी आहे?’ मी विचारलं, तर प्रतिभा म्हणाली, ‘तिचे आई-बाबा मोठ्या भावंडांना घेऊन समोर डॉक्टरकडे आलेत. मोठ्याला ताप आहे आणि ही इतकी रडत होती की  आईला काहीच करता येत नव्हतं, म्हणून मीच तिला इथे ठेवायला सांगितलं. भूक लागली असेल म्हणून शेजारून बाटली आणि दूध आणलं, पण तिच्या ओठांमुळे तिला पिता येत नाहीये.’बाळ रडतच होतं, आम्ही दोघीही तिला गप्प करू पहात होतो. पण ती काही ऐकत नव्हती.

तेव्हढ्यात त्या बाळाची आई दोन जरा मोठ्या मुलांचा हात धरून रस्ता क्रॉस करून आलीच. मोठा पाचेक वर्षांचा, दुसरा अडीच-तीन वर्षांचा असावा. धाकटा आजारी असावा, कारण त्याचा चेहरा अगदी मलूल होता. दुकानात आल्या आल्या तिने मुलीला मांडीवर घेतलं आणि नीट दूध पाजायचा प्रयत्न करायला लागली. तापाने आजारी मुलगा अगदी तिला बिलगून उभा होता तर मोठा मुलगा पलीकडेच उभा होता. बाळाचं रडणं काही थांबत नव्हतं. उत्तरेतलं कुटुंब होतं. बिहारमधलं.

‘कितने महिने की है’? मी विचारलं. त्या बाईचं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. मला जे बाळ तीन-चार महिन्यांचं वाटलं होतं, ते चक्क आठ महिन्यांचं होतं! पण बाळाच्या क्लेफ्ट लिप मुळे ती नीट गिळू शकत नसल्यामुळे तिची वाढ खुंटली होती.

‘इसका ऑपरेशन हो सकता है, बच्ची बिलकुल ठीक हो जायेगी, पता है ना’? मी विचारलं. तर ती बाई म्हणाली, ‘पता है, डाक्टरने बोला है. पर खर्चा बहुत होगा ना, इसलिये पैसे जमा कर रहें हैं.’

तिचा नवरा एका सोसायटीत वॉचमन होता आणि पदरात तीन मुलं! तिच्याकडे सर्जरीच्या खर्चाला पैसे जमा होईपर्यंत अजून बराच काळ उलटून गेला असता! त्या बाईला मी अजून काही सांगणार तर ती म्हणाली ‘इनको आने दिजिये’. आता तिचे ‘इनको’ कुठे तरी कामाला गेले होते. ते परत येईपर्यंत ह्या केसमध्ये आपण काय मदत करू शकतो, ह्याचा मी विचार करत होते.

एकदम मला आठवलं, की माझ्या एका मित्राचा भाऊ आग्र्यामध्ये कॉस्मेटिक सर्जन आहे, तो अशा

 प्रकारच्या सर्जरी करतो, हे मला माहिती होतं. म्हणून मी लगेच त्याला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली. तो म्हणाला की स्माईल ट्रेन नावाची संस्था अशा सर्जरी करायला मदत करते. त्याने मला त्याच्या ओळखीच्या स्माईल ट्रेन वाल्या दिल्लीच्या माणसाचा नंबर दिला. मी त्याला फोन करून त्याच्याकडून पुण्याचा नंबर मिळवला. माझ्या डॉक्टर मित्रातर्फे कॉल गेल्यामुळे त्यांनी लगोलग पेशंटची सर्व माहिती लिहून घेऊन मला पुण्याच्या लोकमान्य इस्पितळाचा नंबर दिला.

स्माईल ट्रेनतर्फे होणाऱ्या पुण्यातल्या सर्व क्लेफ्ट लीप सर्जरी तिथे होतात. मी त्यांना फोन करून त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली, तोपर्यंत त्या बाळांचे बाबाही तिथे आले होते. त्यांना मी सर्व माहिती दिली. ते म्हणाले की त्यांची आठवड्याची सुट्टी बुधवारी असते. परत लोकमान्य मध्ये फोन करून बुधवारच्या ओपीडीची वेळ, हॉस्पिटलचा पत्ता, कुणाला भेटायचं, बरोबर कुठले केसपेपर आणायचे वगैरे सगळी माहिती काढून त्या जोडप्याला दिली. त्या मुलीच्या बाबांचा नंबर घेतला आणि मी माझ्या कामाला निघून गेले.

त्यानंतर फॉलो-अप करायला म्हणून दोन-तीन आठवड्यांनी मुलीच्या बाबांना फोन केला, तर त्यांनी उचललाच नाही. मग एकदा प्रतिभाला विचारलं तर ती म्हणाली की त्यानंतर ते आलेच नाहीत. पुढे काय झालं ते कळलं नाही म्हणून मला उगाचच चुटपुट लागून राहिली. स्माईल ट्रेन वाल्या दिल्लीच्या माणसाला फोन केला तर तो म्हणाला पुण्याची माहिती त्याच्याकडे नाहीये. मला काही दिवस ती मुलगी, तिचा तो दुभंगलेला ओठ आणि तिचं केविलवाणं रडणं आठवत राहिलं. पण नंतर माझ्या कामाच्या, प्रवासाच्या व्यापात मी विसरून गेले.

परवा अचानक दिवाळीच्या दिवशी प्रतिभाचा फोन आला. कामात होते म्हणून मी तो घेतला नाही. आज परत तिच्याकडे साड्या घ्यायला गेले होते, तर ती म्हणाली, खूप आनंदून की ‘त्या दिवशी त्या बाळाचे आई-बाबा आले होते, त्यांना तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून फोन केला होता. त्या बाळाचं ऑपरेशन झालं. आता ती व्यवस्थित दूध पिते, अंगाने पण भरलीये. ऑपरेशन एकदम फ्री मध्ये झालं, छान झालं म्हणून ते लोक सांगत होते’.

मलाही ऐकून खूपच आनंद झाला. न राहवून मी लगेच परत त्या मुलीच्या बाबांना फोन लावला. परत कोणी उचलला नाही. पण थोड्या वेळाने त्या मुलीच्या आईचाच फोन आला. ’कैसी है बेटी?’ विचारल्याबरोबर ती धो-धो बोलत सुटली. मुलगी आता व्यवस्थित होती, नीट दूध पीत होती, सॉलिड खाणंही आता हळू हळू सुरु केलं होतं त्यामुळे अंगा-पिंडाने सुधारली होती. दिवाळीसाठी ते पूर्ण कुटुंब आता गावी बिहारला गेलं होतं. ‘तीस तारीख को आयेंगे ना दीदी तब आपसे मिलने जरूर आयेंगे, बहुत बहुत धन्यवाद आपका’. आनंद नुसता निथळत होता तिच्या स्वरातून.

मीही तिच्या आनंदात उजळून निघाले होते. रस्त्यावर चालता चालता माझ्या चेहऱ्यावर इतकं मोठं हास्य होतं की येणारे जाणारे थबकून बघत होते. खरंतर मी खूप मोठं असं केलं काहीच नव्हतं. मी फक्त माझा थोडा वेळ आणि माझा शब्द वापरला होता.

ऑपरेशन लोकमान्यच्या डॉक्टरांनी केलं होतं, खर्च स्माईल ट्रेनने केला होता. पणती वेगळ्याच कुणाची होती, तेल कुणी दुसऱ्याने टाकलं होतं, ज्योत पेटवणारे हात तिसऱ्याचे होते, फक्त ज्योत पेटवणासाठी लागणाऱ्या काडीचं काम माझ्या हातून झालं होतं. पण त्या पणतीचा प्रकाश मात्र आमची साऱ्यांचीच मनं उजळवून गेला होता.  यंदाच्या दिवाळीची ही मला मिळालेली  सर्वोत्तम भेट!

लेखिका:सौ. शेफाली वैद्य

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments