📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माझं घर… लेखिका – सुश्री वीणा घाटपांडे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

शेजारच्या सिंधूताई परवा खूप दिवसांनी भेटल्या. अमेरिकेला दोन्ही मुलांकडे गेल्या होत्या, म्हणाल्या. दोन्ही मुलांनी आणि सुनांनी अगदी व्यवस्थित आदरातिथ्य केलं. जवळपासची सगळी ठिकाणे दाखवली. अमेरिकन व इतर वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले. दर शनिवार – रविवार कुठे ना कुठे जात होत्या. कुठे काही कमी पडू दिले नाही, पण चार महिने तेथे राहिल्यावर मलाच कंटाळा आला. घरचे विचार मनात येऊ लागले. सकाळ झाली की मॅार्निंग वॅाकचा रस्ता मला बोलावू लागला. घरची साफसफाई, वाणसामान भरायचे मला डोळ्यांसमोर दिसू लागले, काही म्हणा पण आपलं घर ते आपलं!

सिंधूताईंचे बोलणे मला १००%. पटले.खरंच प्रत्येकालाआपलं घर किती प्रिय असतं! आपण ८-१० दिवस  बाहेर राहिल्यावर आपल्याला लगेच कंटाळा येतो.कधी एकदा घरी जाऊ असं होतं. २-४ दिवस बाहेरचे खाल्ले की कधी एकदा वरण भात का होईना, तो घरचा खाऊ असे होऊन जातं.

घरातील प्रत्येक वस्तूवर आपलं अधिराज्य असतं .काही वस्तूंशी आपल्या आठवणी निगडीत असतात.हा इतकी वर्षं चाललेला कुकर, मला मीनामावशीने माझ्या लग्नात प्रेझेंट दिलेला.उषामामीने मंगळागौरीला पुरण यंत्र दिले होते. मला मोत्याचे दागिने आवडतात म्हणून पाडव्याची ओवाळणी म्हणून नवऱ्याने मोत्याचा तन्मणी व बांगड्या घेतलेल्या. वाचनाची आवड म्हणून साठवलेल्या पैशांतून चांगल्या कादंबऱ्या, आत्मचरित्रे आपण घेतली होती. काश्मीरहून आणलेल्या शाली,बेंगलोर सिल्क, आग्र्याहून अगदी जपून आणलेली ताजमहालाची छोटी प्रतिकृती अशा एक ना अनेक वस्तूंच्या आठवणी आपल्या मनात पिंगा घालत असतात आणि न कळत त्या वस्तू आपल्या होऊन जातात.

आपले स्टीलचे कटोरे, ताटल्या, वाट्या भांडी, पोळपाट लाटणे इतके ओळखीचे झालेले असतात व त्यांची इतकी सवय झाली असते की नवीन पोळपाटावर पोळी लाटायला त्रास होतो. बऱ्याचजणांना जागा बदलली, कॅाट बदलली की झोप लागत नाही.

आपल्या घरात आपण free bird असतो. आपल्यावर कुणाचे बंधन नसते.एखादे वेळेस बरे वाटत नसेल, तर आपण आपल्या घरात दिवसभर झोपून राहू शकतो. दुसरीकडे आपल्याला संकोच वाटेल.

प्रत्येकाला आपले घर देवाने लावून दिले आहे.पक्षीसुद्धा संध्याकाळ झाली की आपल्या घरट्याकडे परततात. गुरेढोरे, गायी वासरे आपापल्या घरी परततात. तर असं हे आपलं ते आपल्याचे महत्त्व आहे. घर कसेही असो, ते आपले असते.

लेखिका : सुश्री वीणा घाटपांडे

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments