? वाचताना वेचलेले ?

☆ “थँक्स गिव्हिंग डेज…” – लेखिका :सौ. प्रतिभा कुलकर्णी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

डिसेंबर महिन्यातील पहिला  आठवडा हा thanks giving days म्हणून साजरा होतो. ह्या आठवड्यात सगळ्या Near and Dear ones ना काही चुकले असेल तर साॅरी म्हणून, त्यांचे आभार आणि प्रेम व्यक्त करतात आणि त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करतात….

पण खरं सांगू,

मला हे केवळ परकीयांचे अंधानुकरण वाटते.

हे म्हणजे कसं झालं ना, वर्षभर केलेल्या चुका सुधारण्यासाठी एखादा सत्यनारायण किंवा होम करायचा आणि परमेश्वराकडे क्षमा मागायची आणि पुन्हा त्याच चुका करण्याचा परवानाच घ्यायचा. त्यापेक्षा नित्य नेमाने सद्वर्तन करावे आणि परमेश्वराचे मनोभावे आभार मानावेत ना.

मला आठवतं आमच्या लहानपणी आम्ही रुसून बसलो की भूक नाही असे सांगत असू. मग माझी आई तिचा हुक्मी एक्का काढायची, ” तू जेवली नाहीस तर मी पण जेवणार नाही. ” आता काय बिशाद होती आमची न जेवण्याची आणि आई वर रागावण्याची? पण हे राग रुसवे किती गोड होते.

माझी मुलंही खूप गुणी आणि समजूतदार होती. पण तरीही मुलंच ती.काहीतरी चुकणारच. अशा वेळेस माझी एकमेव शिक्षा म्हणजे” अबोला”!पण तीच त्यांना त्यांची चूक कळायला पुरेशी असायची. काही वेळातच,”आई तू मला रागव, पण अशी गप्प नको ना राहूस….”  असं  म्हणत त्यांनी मारलेली मिठी मला विरघळायला पुरेशी असायची.

शाळेत मैत्रिणीशी  भांडण झाले की आईला काहीतरी छान, तिच्या आवडीचा डबा करायला सांगायचा आणि मधल्या सुट्टीत गाल फुगवूनच तिच्यापुढे तो डबा चक्क आपटायचा, की कट्टीची बट्टी झालीच पाहिजे.

अगदी पती- पत्नीच्या नात्यातलीही रुसव्याफुगव्याची गंमत लज्जतच आणते की.सकाळीच ऑफिसला जाताना झालेले भांडण एखाद्या गजऱ्याने किंवा तिच्या आवडत्या कचोरीने चहाच्या कपातील वादळच ठरते.  त्यासाठी बायकोनेही कन्सेशन घेऊन  तासभर आधी येऊन त्याच्या आवडीचा केलेला झणझणीत वडापावचा बेत घरातील वातावरणातला जिवंतपणा कायम  ठेवतो.

इतकंच काय ,अगदी जवळची, जिवाभावाची सखी असो किंवा फेसबुकवरील तुमच्यासारखे कधीही न भेटलेले तरीही एक अनोखे नाते निर्माण झालेले मित्र मैत्रीणीही, काही दिवस आले नाही तर विचारतात, “काय गं,काही झालंय का ? बरी आहेस ना? ” त्यावेळी ही  जी ओढ, काळजी असते तिची जाणीवही खूप सुखावणारी असते.

एकंदरीत काय तर ,असे रुसवेफुगवे..त्यानंतरचे मनवणे ( अगदी आमच्या सारख्या सिनियर सिटीझनसमध्येही, बरं   का!)  आहे तोपर्यंतच आयुष्यातील खुमारी आहे. सुग्रास जेवणात जसे झणझणीत लोणचे अथवा चटणी हवीच .तसेच आयुष्यातही अशी हक्काने रागावणारी आणि तितक्याच मायेने मनवणारी नाती हवीतच.

त्यांना असे एका दिवसात थॅन्क्स म्हणून किंवा माफी मागून परके करू नये, असे मला वाटते.

म्हणूनच मला  इकडच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना अजिबात थॅन्क्स अथवा साॅरी न म्हणता त्यांच्या ॠणातच रहाणे आवडेल.

लेखिका: सौ. प्रतिभा कुळकर्णी.

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments