श्री मंगेश मधुकर
वाचताना वेचलेले
☆ ‘डेट विथ डॅड…’ ☆ श्री मंगेश मधुकर ☆
रविवारची आळसावलेली सकाळ. सुटीचा दिवस असल्यानं थोडासा उशिरा उठलो आणि सवयीनं मोबाइलमध्ये हरवलो. हॉलमध्ये आलो. तिथं रोजच्याप्रमाणे नाना पेपर वाचत बसलेले. मला पाहून त्यांनी पेपर पुढे केला.
“तुमचं होऊ द्या. मी नंतर वाचतो.” नाना पुन्हा पेपरमध्ये हरवले. काळ बदलला तरी सत्तरी पार केलेल्या नानांची पेपर वाचण्याची सवय मात्र बदलली नाही. वाचनात हरवलेल्या नानांना पाहून जुने आठवणींचे एकेक फोल्डर उघडून मन मागे मागे जात थेट शाळेच्या दिवसात जाऊन थांबले.
मी नानांचा अतिशय लाडका, त्यांच्यासोबत सायकलवरून डबलसीट केलेली फिरस्ती, पाहिलेलं सिनेमे. सगळं आठवलं. एकूणच बालपण मस्त होतं. नाना माझे बेस्ट फ्रेंड. त्यांच्याबरोबर खूप बोलायचो. बराच वेळ आमच्या गप्पा चालायच्या म्हणजे मी सांगत असायचो अन ते ऐकायचे, सातवीपर्यन्त हा सिलसिला चालू होता परंतु नंतर बदलत गेलं. जसजसा मोठा झालो तसा शिक्षण, उच्चशिक्षण, करियर, नोकरी, लग्न, संसार, ऑफिस अशा एकेक जबाबदाऱ्यात गुरफटलो. मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर्ड लाईफ. दोघांचे आयुष्य वेगवेगळं झालं. वाद नव्हता, पण संवाद नक्कीच कमी झाला. आतातर फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं. स्वभावानुसार त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही अन मलाही जाणीव झाली नाही.
मोबाईलच्या आवाजानं आठवणींची तंद्री तुटली. पुन्हा वास्तवात आलो.
शाळेच्या व्हॉटसपच्या ग्रुपवर औपचारिक वाढदिवस शुभेच्छांचा पाऊस सुरू होता. मेसेज न करता फोन करून मित्राला शुभेच्छा देत असताना लक्षात आलं, की आज २ ऑक्टोबर म्हणजे ओळखीतल्या अजून काही जणांचा वाढदिवस. लगेच पाठोपाठ फोन करून शुभेच्छा दिल्या. सकाळीच फोनवर बिझी झालेल्या माझ्याकडं नानांनी अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं.
“फोन करून शुभेच्छा देण्याची तुमचीच सवय घेतलीय.” नाना फक्त हसले.
“संध्याकाळी अमेरिकेवरून आलेल्या मित्राच्या घरी पार्टी आहे. खूप वर्षांनी भेटतोय. तेव्हा ताईच्या घरी कार्यक्रमाला तू आणि रिया जा.” नाश्ता करताना मी म्हणालो, तेव्हा अपेक्षित असल्यासारखं बायको सूचक हसली.
“आपण ताईकडं पुढच्या रविवारी जाऊ. शंभर टक्के, प्रॉमिस.”-मी
“ठीकय. एंजॉय पार्टी. पण लिमीटमध्ये”
“डोन्ट वरी, थॅंक यू बायको.”
“दुपारी जेवायला गोड काय करायचं?” बायकोनं विचारलं
“राष्ट्रपित्याचा वाढदिवस म्हणून का?” मी गंमतीने म्हणालो.
“मिस्टर, विसरलात ना. आज तुमच्याही वडिलांचा वाढदिवसंय.”
आठशे चाळीस व्हॉल्टचा झटका बसला. पोह्याचा घास घशातच अडकून जोराचा ठसका लागला. दुनियेला आवर्जून शुभेच्छा देणारा मी नानांचाच वाढदिवस विसरलो. एकदम कसंतरीच वाटायला लागलं. पोह्याची डिश बाजूला ठेवून नानांसमोर जाऊन उभा राहिलो.
“काय रे, काही पाहिजे का?”
“वाढदिवसाच्या खूप खूप खूपच शुभेच्छा!” म्हणत वाकून नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली, तेव्हा नानांना खूप भरून आलं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी स्वतःला सावरलं. खिडकीतून बाहेर पाहत उभे राहिले. काही क्षण विलक्षण शांततेत गेलं. मीसुद्धा खूप भावुक झालो.
“दुपारी गुळाचा शिरा करते. नानांना आवडतो. ” बायकोनं नेहमीप्रमाणे परिस्थिती सांभाळली.
सून असूनही नानांच्या आवडी तिला माहिती आहेत आणि मी? प्रचंड गिल्ट आला.
“आज संध्याकाळी तू ताईकडे जाणारेस ना.”
“हो, स्वयंपाक करून जाते.”
“नको.”
“का?”
“आज बापलेक बाहेर जेवायला जातो. नानांना पार्टी!”
“आम्हांला !!” बायको आणि मुलगी एकसुरात म्हणाल्या.
“नक्कीच! पण नंतर आज दोघंच जातो.प्लीज!” दोघींनी समजुतीने घेतलं.
“उगीच खर्च कशाला? बाहेर नको.” सवयीने नानांनी नकार दिला. पण मी हट्ट सोडला नाही.
संध्याकाळी हॉटेलच्या पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी नानांचा हात हातात घेतला. तेव्हा ते हसले. त्यांच्या मनात काय आले असेल, याची कल्पना आली.
पस्तीस वर्षापूर्वीची परिस्थिती बरोब्बर उलटी होती. तेव्हा त्यांनी मला आधार दिला होता. आता मी.
काळाने आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्या सुद्धा.
हॉटेलमध्ये आल्यावर स्टार्टरची ऑर्डर दिली. समोर बसलेले नाना प्रचंड संकोचले होते. त्याचं अवघडलेपण लक्षात आलं. मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर दिसत होती.
“टेंशन घेऊ नका.रिलॅक्स.”
“फार महाग हॉटेल दिसतंय.” आजूबाजूला पाहत नाना म्हणाले.
“किती वर्षांनी आपण दोघंच असं आलोय.”
“तू अकरावीला असताना हॉटेलमध्ये गेलो होतो. त्यानंतर आजच..”
“बापरे!एवढं डिटेल लक्षात आहे. ग्रेट!” नाना काहीच बोलले नाहीत.
“नाना, सॉरी!माफ करा.”
“अरे, होतं असं आणि तसंही आता या वयात कसलं आलंय वाढदिवसाचं कौतुक!”
“वाढदिवस विसरलो म्हणून नाही तर एकूणच. तुमच्याकडे दुर्लक्ष झालं. नकळत का होईना पण चूक झालीच.”
“अरे एकदम कोणता विषय घेऊन बसलास.”
“आज मन मोकळं करू द्या. माझं यश-अपयश, आनंद, दु:ख, चुकलेले निर्णय, निराशा या सगळ्यात ठामपणे पाठीशी उभे राहिलात. माझ्यातला बदल सहज स्वीकारलात . स्वतःवर बंधनं घालून घेतलीत आणि तुमचा कधी विचारच केला नाही. माझ्या प्रायोरिटीजमध्ये मात्र तुम्ही नव्हताच.”
“हीच म्हातारपणाची खंत आहे. जे झालं ते झालं. सोडून दे.” नाना
“तुम्हांला नेहमीच गृहीत धरलं. ” मी हात जोडले. एकदम आवाज कापरा झाला. तेव्हा आलेला मोठा हुंदका नानांनी आवरला. पुढचे काही क्षण शांततेचे होते.
“उगीच मनाला लावून घेऊ नकोस. बापलेकांचं नातं असंच असतं. आई जिवलग मैत्रीण होऊ शकते, पण वडील मित्र झाले तरी अंतर राहतंच.”
“खरंय, पण हे ठरवून होत नाही. तुम्ही कधीच इच्छा सांगितल्या नाहीत आणि मलाही त्या समजून घेता आल्या नाहीत.” पुढचं बोलता येईना.
“ वडील आणि कर्ता मुलगा यांच्यात कमी होणारा संवाद हा या नात्याला शाप आहे. ” एका वाक्यात नानांनी कैफियत मांडली.
“यापुढे काळजी घेईन”
“अरे तू मुद्दाम केलं नाहीस आणि करणार नाहीस हे माहितेय. एवढं मनाला लावून घेऊ नकोस.”
“तरी पण.. खूप अपराध्यासारखं वाटतं.”
नंतर बराच वेळ मी नळ सुरू केल्यासारखा धो धो बोलत होतो. अगदी शाळेत असताना त्यांच्याशी बोलायचो तसाच.बॅकलॉग भरायचा होता. नाना शांतपणे ऐकताना गालातल्या गालात हसत होते.
“काय झालं? हसताय का?”
“इतका मोठा झालास तरी मूळ स्वभाव बदलला नाही.” नाना दिलखुलास हसत म्हणाले. मलाही खूप शांत वाटत होतं. मोठ्ठं ओझं उतरल्याचं समाधान होतं.
“खरं सांगू? बोलायची खूप इच्छा व्हायची. पण तुझी धावपळ, घरातली चिडचिड बघून बोलायची हिंमत झाली नाही. तुमच्या आयुष्यात मोबाईल आणि अस्वस्थता सतत सोबत असते.”
“पर्याय नाही”
“मान्य. तरीही पैसा, संपत्ती, सोशल स्टेटस हे सगळं मृगजळ. त्यामागे किती आणि कुठपर्यंत पळायचं,याची लक्ष्मणरेखा आखून ठेव. स्वतःला जप. तब्येतीची काळजी घे. लोकांसाठी नाही, तर आपल्या माणसांसाठी जगायचं.”
“नक्कीच.”
“आजचा दिवस कायम लक्षात राहील.”
“माझ्याही.”
“सर्वात महत्त्वाचं, आज माझा उपास नाहीये. ” नाना मिष्किलपणे म्हणाले.
बोलण्याच्या गडबडीत मी जेवणाची ऑर्डरच दिली नव्हती.
“आयला, हो की….” नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले. तेव्हा नानांकडे पाहत जीभ चावली.
“चायनीज खाऊ,” नानांची फर्माईश. जेवणाची ऑर्डर देताना नानांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून डोळे भरून आले.
बाप-लेकाच नातं रिचार्ज होऊन अपडेट झालं. आईच्या आठवणीनं एकदमच दोघांची नजर आभाळाकडे गेली.
घरातला अबोल आधारस्तंभ असलेल्या सर्व “बाप”माणसांना समर्पित…
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈