सौ. मंजुषा सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ नवीन वर्षा तुझ्या स्वागता… लेखिका : शांता शेळके ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
कुठले पुस्तक कुठला लेखक
लिपी कोणती कसले भाकित
हात एक अदृश्य उलटतो
पानामागून पाने अविरत
☆
गतसालाचे स्मरण जागतां
दाटून येते मनामधे भय
पान हे नवे यात तरी का
असेल काही प्रसन्न आशय
☆
अखंड गर्जे समोर सागर
कणाकणाने खचते वाळू
तरी लाट ही नवीन उठता
सजे किनारा तिज कुरवाळू
☆
स्वतः स्वतःला देत दिलासा
पुसते डोळे हसतां हसतां
उभी इथे मी पसरुन बाहू
नवीन वर्षा तुझ्या स्वागता
☆
लेखिका : शांता शेळके
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈