सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ मनोरुग्णांचा कुंभमेळा… — लेखक : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
तुमचं नातं कितीही जवळचं असो….
जाणं येणं कमी झालं .. गाठीभेटी कमी झाल्या .. संवाद होईनासा झाला की प्रेमाला , आपुलकीला ओहटी लागणारच !
शेअरिंग झाल्याशिवाय , दुःख सांगून रडल्याशिवाय कुणीही कुणाचं होऊच शकत नाही !
आणि हल्ली हेच होईनासे झाले आहे
किंवा कमी कमी होत होत बंद होण्याच्या मार्गावर आहे !
आपल्याच हाताने आपल्या जवळच्या नात्याला जर तुम्ही अग्नी देणार असाल तर जगण्यामध्ये उदासीनता , डिप्रेशन , भकास वाटणे हे होणारच !
नको तितकी आर्थिक संपन्नता आणि प्रमाणाच्या बाहेर प्रॉपर्टी गोळा करण्याच्या विळख्यात माणूस सापडला की जगण्यातला आनंद , मजा संपणारच !
म्हणून Hi , Hello वाली मंडळी जमा करण्यापेक्षा माणसं जपा , नाती जगा !
सुखदुःखात साथ देणारे दोन चार मित्र , हाकेला धावून येणारे सख्खे शेजारी आणि वेळ प्रसंगी धाऊन येणारी चार रक्ताची नाती जर आपल्या जवळ असतील , तर आणि तरच आपले जगणे सुसह्य होऊ
शकते , नसता मनोरुग्णाच्या कुंभमेळ्यातले आपणही एक मनोरुग्ण व्हायला वेळ लागणार नाही !
मी आणि माझं कुटुंब इतक्या छोट्या वर्तुळात आपण ” सुख मिळवण्याचा ” प्रयत्न करत असाल तर आपल्या प्रयत्नांना तडे जाऊ शकतात !
एखाद्या विषयातलं जबरदस्त टॅलेंट , त्याच्या पोटी मिळणारे गलेलठ्ठ पॅकेज ,उच्चभ्रू सोसायटीतला वेल फर्निशड् फ्लॅट आणि पार्किंग मध्ये असलेली चकचकीत गाडी म्हणजे सुख , या भ्रमातून बाहेर पडा !
काही नाती तरी जपा .. कुणाकडे तरी जात जा .. कोणाला तरी बोलवत जा
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यक्त न होता , दुःख न सांगता कुढण्यापेक्षा जे आहे ते सांगून मस्तपैकी मोकळं रडा !
…. लक्षात घ्या खळखळून हासल्याशिवाय आणि मोकळं रडल्याशिवाय तुम्ही तणावमुक्त होऊच शकत नाही . भावनांचा निचरा झाल्याशिवाय टेन्शन कमी होणारच नाही आणि त्याशिवाय माणूस आनंदी राहूच शकणार नाही .
आणि दुसरी महत्वाची गोष्ट …
…. आपलं समजून तुमच्याजवळ जर कुणी मन मोकळं केलं तर त्याचे गॉसिपिंग करू नका , पाठ वळली की त्या व्यक्तीला हसू नका !
…. इतरांना कुत्सितपणे हसण्याची आणि पदोपदी दुसऱ्याला टोमणे मारण्याची सवय लागली की आपल्या मनाला झालेला कॅन्सर थर्ड स्टेजला गेला आहे , असे समजण्यास काहीच हरकत नाही.
लेखक : प्रा.विजय पोहनेरकर
मो 94 20 92 93 89
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈