वाचताना वेचलेले
☆ ‘जिप्सी’ला सलाम – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆
अरुण दातेंनी सांगितलेली एक हृद्य आठवण-
“मला एकदा अचानक मंगेश पाडगावकरांचा फोन आला. ते म्हणाले, “मी एक नवीन कोरं गाणं लिहिलं आहे. अजून कागदावरची शाईसुद्धा वाळलेली नाही. मी तुला फोन करण्याच्या पाच मिनिटं आधी देवसाहेबांशी बोललो आणि त्यांना गाणं ऐकवलं. आम्ही दोघांनीही हे ठरवलं आहे की, या गाण्याला फक्त तूच न्याय देऊ शकतोस.”ते गाणं म्हणजे, ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’! हे गाणं गाऊन माझी प्रसिद्धी तर वाढलीच, पण माझ्या चाहत्यांप्रमाणे मलाही हे गाणं बरंच काही शिकवून गेलं.
या गाण्याची एक आठवण फारच हृद्य आहे. तो विलक्षण अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो.
माझ्या नाशिकच्या एका कार्यक्रमामध्ये मध्यंतरात माझा बालपणीचा मित्र आणि साहित्यिक वसंत पोतदार मला भेटायला आला. त्याच्याबरोबर एक तरुण मुलगाही होता. त्याला पुढे करून वसंता मला म्हणाला, ‘‘या मुलाला दोन मिनिटे स्टेजवर काही बोलायचे आहे.’’ त्यावर मी त्याला म्हणालो की, ‘‘मी याला ओळखत नाही आणि तो काय बोलणार आहे, हे मला माहीत नाही. त्यामुळे मी परवानगी कशी देऊ?’’ यावर वसंता मला पुन्हा म्हणाला, ‘‘माझ्यावर विश्वास ठेव, त्याला जे बोलायचे आहे, ते फार विलक्षण आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचावे अशी माझी इच्छा आहे.’’ मी म्हटले, ‘‘ठीक आहे, मी त्याला पाच मिनिटे देतो. कारण रसिक गाणी ऐकायला थांबले आहेत.’’
वसंता त्याला घेऊन स्टेजवर गेला आणि त्या मुलाने बोलणे सुरू केले. ‘‘जवळपास एक ते दीड महिन्यांपूर्वीपर्यंत मी पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेलेला मुलगा होतो. ड्रग्जशिवाय मला कुठलेही आकर्षण उरले नव्हते. अगदी आयुष्याचेसुद्धा! असाच एकदा कासावीस होऊन एके सकाळी मी ड्रग्जच्या शोधात एका पानाच्या दुकानाशी आलो. तेव्हा माझ्या कानावर एका गाण्याचे शब्द पडले. ते संपूर्ण गाणे मी तसेच तेथेच उभे राहून ऐकले आणि ड्रग्ज न घेता किंवा त्याची विचारपूसही न करता तिथून निघालो. एका कॅसेटच्या दुकानाशी येऊन दुकान उघडण्याची वाट बघत राहिलो. दुकान उघडताक्षणी मी पाच मिनिटांपूर्वी ऐकलेल्या गाण्याची कॅसेट विकत घेतली. दिवसभरात तेच गाणे किमान ५० वेळा ऐकले आणि पुढचे १०-१२ दिवस हेच करत राहिलो. त्यानंतर वसंत काकांकडे गेलो आणि त्यांना म्हटले की, ‘कुठल्याही परिस्थितीत या गाण्याचे गायक अरुण दाते साहेबांना मला भेटायचे आहे.’ काका म्हणाले, ‘अजिबात चिंता करू नकोस. पुढल्या महिन्यात अरुणचा कार्यक्रम नाशिकमध्ये आहे. आपण त्याला भेटायला जाऊ.’ ज्या गाण्याने माझे संपूर्ण आयुष्य पालटले आणि मी स्वत:चे माणूसपण शोधायला लागलो, ते गाणे आहे, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ आणि त्याकरिताच मी सर्वांसमोर दाते साहेबांचे मुद्दाम आभार मानायला आलो आहे.’’
त्या मुलाचे बोलणे झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या दिवशीची सगळ्यात मोठी दाद त्या मुलाच्या बोलण्याला मिळाली होती.
मला वसंताने स्टेजवर बोलावले आणि त्या मुलाने अक्षरश: माझ्या पायावर लोटांगण घातले. मी त्याला उठवून प्रेमाने जवळ घेतले आणि माईक हातात घेऊन रसिकांना आणि त्याला म्हणालो, ‘‘जे श्रेय तू मला देतो आहेस त्याचे खरे हकदार कविवर्य मंगेश पाडगावकर आणि संगीतकार यशवंत देव आहेत. मी तर या गाण्याचा फक्त गायक आहे. म्हणून मी मुंबईला गेल्यावर तुझे हे धन्यवाद त्या दोघांपर्यंत नक्की पोहोचवीन.’’
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈