📖 वाचताना वेचलेले 📖

☆ स्वान्त सुखाय…… लेखिका – सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

खाऊचे डबे सगळे रिकामे झाले.इतके दिवस मुलांसाठी,घरातील वयस्कर  लोकांसाठी करतो, ही मनातली तीव्र भावना.पण मुलांची आपापल्या दिशेने पांगापांग होऊन ही आता दोन चार वर्षे लोटलीत.वयस्कर मंडळी सगळ्याच्या पल्याड गेलेली आहेत.

तरीही..ठरावीक वेळेत डबे रिकामे होण्याचा क्रम काही चुकला नाही.मनात दबलेलं हसू हळूच ओठांवर आलं.मुलानांच कशाला,आपल्यालाही लागतंच की काहीतरी येताजाता तोंडात टाकायला.फक्त इतके दिवस मुलांच्या नावाखाली लपत होतं.आता उघड उघड मान्य करावं झालं. आपलेसुद्धा,डबे खाऊने भरुन ठेवण्यात  अनेक स्व-अर्थ दडलेले असतात.शेवटी एकच खरं…

स्वान्त सुखाय…!

चिवडा फोडणीस टाकायला घेतलाच.

सकाळचा माँर्निग वाँक घेऊन सोसायटीतल्या डॉक्टर काकू घरावरुन जात होत्या.मला किचन खिडकीत बघून त्यांनी हाक मारली, “बाहेर ये.बघ मी काय केलंय.तुला दाखवायचंय.” हँड एब्राँडयरी केलेला कॉटन कुर्ता त्यांनी मला उलगडून दाखवला.”व्वा! किती सुंदर वर्क, काकू!”मी त्या एंब्रॉयडरीवरून हात फिरवत म्हणाले.”आवडलं ना?छान झालंय ना ग?”

अर्थातच काकू. “किती नाजूक काम आहे हे.फार सुरेख.कलर काँंबिनेशनही परफेक्ट!”माझ्या नकळत…पावती देऊनही झाली.

“मैत्रिणीसाठी करतेय.तिला सरप्राईज देणार आहे.आणि ती जेव्हा बघेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी अनुभवणार आहे.शरीराने दुसऱ्यासाठी करत असतो गं आपण.पण त्यातला खरा आनंद आपणच घेत असतो.हो ना?”

मी म्हटलं, ” हो.स्वांत सुखाय…!”

“काकू, मुलगा झाला मला.तुम्ही आठवणीने गरम गरम तूप-मोदक आणून खाऊ घातलेत  मला प्रेग्नसीत!आठवतंय काकू?”माझ्यासमोर लहानाची मोठी झालेली जयू आनंदाने सांगत होती.गणपती बाप्पाच आलेत!तिच्या आवाजातला आनंद मला सुखावून गेला.

माझं हे करणं म्हणजे तरी काय, मोदक करून खाऊ घालण्यातला आनंद  मीच अनुभवणं.म्हणजेच तर

 स्वान्त सुखाय!

नव्वदी पार केलेले आजोबा.मंदिर परिसर नित्यनेमाने स्वच्छ झाडत असतात.क्षीण झालेली त्यांची क्रयशक्ती .मीच एकदा त्यांना म्हटलं, “कशाला, आजोबा, या वयात झाडता?” “मला आनंद मिळतो बाळा. उगाच का कोण करेल?

माणूस फार लबाड, स्वतःच्या सुखासाठी करत राहतो,पण आव मात्र दुसऱ्याला आनंद दिल्याचा आणतो.

त्यापेक्षा सरळ मान्य करावं,

स्वान्त सुखाय..

मला आजकाल हा स्वान्त सुखाय चा मंत्र फार पटला,रुचला आणि पचनीदेखील पडला.

जिथे आपल्या क्षुल्लक अस्तित्वाने जगतकार्यात तसूभरदेखील फरक पडणार नाही,तिथे माझं कर्म कुणासाठी का असणार?ते फक्त आणि फक्त मला हवं असतं.त्यात माझा आनंद, सुख समाविष्ट झालेलं असतं.म्हणून आपण करत असतो.अहंकाराचे,    अट्टाहासाचे कवच इतके जाड असते की,त्या कर्मातून मिळालेला आनंद आपल्यापर्यंत पोहचतच नाही.’मी केल्याचा’ काटा,ते सुख,तो आनंद आपल्याला उपभोगू देत नाही. राग,अपेक्षाभंग, वैताग,दंभ या खाली सुखाच्या आनंदाच्या जाणिवाच बोथट होऊन जातात.

परवा आईला आंघोळ घालताना मी तिच्याभोवती  पाणी ओवाळत तिला म्हटलं,”झाली बरं ग तुझी चिमणीची आंघोळ.चला आता.पावडर गंध लावायचं ना तुला?” आजाराने शिणलेला तिचा चेहरा खुदुकन हसला. आणि ती म्हणाली, “तुम्हां पोरींचे लहानपण आठवलं ग!”

मी म्हटलं, “आता तू लहान झालीस.होय ना?”

तिचा ओला हात माझ्या चेहऱ्यावरून फिरला.

तिचं हसणं, तिचा तो ओला स्पर्श!

सुखाची भाषा याहून काय वेगळी असणार!

स्वान्त सुखाय चा हा किती देखणा आविष्कार!

माऊली म्हणतात-सत् चित आनंद.म्हणजे आत्म्याचे मूळ स्वरूप चिरंतन सुख आहे.तो सदैव सुख असतो.विकार जडलेले आहेत ते देह इंद्रियांना! परमेश्वरापासून सुखापर्यंत सारं सारं आपल्यातच तर आहे.बस्स्! आपण थोडा बहिर्मुख ते अंतर्मुख प्रवास करायला  हवाय.इतकंच तर!

लेखिका:सौ. विदुला जोगळेकर

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments