वाचताना वेचलेले
☆ प्रसाद हा देवाचा प्रतिसाद ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !’’ माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.’’ गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.
देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही !’’ गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:खभरली कहाणी माहीत नव्हती.
कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’ गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !
गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला; तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल ! आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग ! जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद मानले की सारी घालमेलच संपते.. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.
एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’ सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’
मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही, कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.
परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!
“परमेश्वरही संकटाच्या वेळी कुणाला ना कुणाला आपल्यासाठी प्रसादच म्हणून पाठवत असतो, फक्त तो प्रसाद आपण व्यवस्थित ग्रहण करायला हवा. त्या प्रसादाची किंमत करता यायला हवी.”
देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈