सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ तुम्हाला कोण आनंदात ठेवतं?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले,”तुमचा नवरा तुम्हाला आनंदात ठेवतो का?”

तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला. त्याला पूर्ण खात्री होती, की ती ‘हो’ असंच म्हणेल. कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती.

पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं,”नाही.” ती म्हणाली, “माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात!”

तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं. तेवढ्यात ती पुढे म्हणाली, “मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही, मी स्वत:च आनंदात राहते.

मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही. माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे.

कुठल्याही परिस्थितीत, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते. जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर, एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल.

आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. माणसं, संबंध, आपलं शरीर, हवामान, आपले ऑफिसातले बॉस, सहकारी, मित्र, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य… ही यादी न संपणारी आहे.

त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं, हे मीच ठरवायला हवं ना! माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय, मी आनंदीच असते!

मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय, मी आनंदीच राहीन. मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय, मी आनंदीच असेन.

माझं लग्न झालेलं असलं तरी लग्ना आधीही मी आनंदीच होते. कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वत:मुळे!

माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा जास्त चांगलं आहे म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही, तर आनंदात राहायचं हे मी स्वत:च ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे. माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही. त्यामुळे माझ्याशी बोलता- वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो.

आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले. तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका.

बोध : वातावरण चांगलं नसलं तरी आनंदी राहा. आजारी असलात तरी आनंदी राहा. कठीण परिस्थितीत, पैसे नसले तरी आनंदी राहा. कुणी तुम्हाला दुखावलं, कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं, अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात, तरी आनंदी राहा. तुम्ही स्त्री, पुरुष कुणीही, कितीही वयाचे असा. असाच विचार करायला हवा; नाही का?

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments