वाचताना वेचलेले
☆ ‘सुट्टी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆
हल्ली जरा सुट्टी मिळाली, की जगबुडी झाल्यासारखे लोक ‘विकेन्ड’ साजरा करायला कुटुंबाला घेऊन निघतात. जाण्यायेण्यात सात-आठ तास (ट्रॅफिक नसेल तर), तिथे जाऊन गर्दीत मिसळून थातूरमातूर साईट सिईंग करायचं किंवा रिसॉर्टच्या रूममध्ये टीव्ही पहात झोपून राहायचं.
सुट्टी संपवून दमून यायचं आणि दुसऱ्या दिवशी कामाला जुंपायचं!
आपण नक्की का जातो वीकएंडला?
कशापासून लांब पळतो?
मला वाटतं,रोजची चाकोरी मोडणं हा त्यामागील महत्त्वाचा हेतू असतो.
चाकोरी म्हणजे काय?
नवऱ्याची नोकरी, मुलांच्या शाळा आणि बायकोचं घरकाम?
चाकोरी म्हणजे रोजची मेल्स, व्हाट्सऍप, फेसबुक, टीव्ही, गर्दी, ट्रॅफिक? मग हे मोडायला, ह्यापासून आराम मिळवायला परत त्यातच का जायचं?
सुट्टीच्या दिवशी घरातलं वायफाय आणि टीव्ही बंद करून टाकावे. फोन स्वीचऑफ करून कपाटात ठेवावा. मुलांची अभ्यासाची पुस्तके दप्तरात भरून ठेवावी. किचनचा गॅस बंद ठेवावा. खूप गप्पा माराव्या. मुलांशी खेळावे, वयस्कांना वेळ द्यावा, बाहेरून ब्रेकफास्टसकट सर्व मिल्स मागवावी.
सर्वांना मान्य असेल तर जवळचे भावंड किंवा जिवलग मित्रांना सहकुटुंब घरी बोलवावे. गप्पांचे फड जमवावे, पत्ते खेळावे, गाणी ऐकावी, वाद्यावरची धूळ झटकून त्यावर एखादा साज छेडावा, मस्त पुस्तक वाचावे.
बायकोला सकाळी सायंकाळी स्वहस्ते चहा करून द्यावा.
नको ती गर्दी, नको ते ट्रॅफिक, नको ते ड्रायव्हिंग!
विकेन्ड कधी एन्ड होईल ते कळणारसुद्धा नाही. एन्ड न होणाऱ्या अनेक आठवणी देत!
अनावश्यक प्रवास तसेच प्रदूषण टाळा ! आनंद मिळवण्यासाठी लांबचा प्रवास किंवा पैसे खर्च केलेच पाहिजेत असे नाही.
आपणच पुढील पिढीला चुकीच्या सवयी लावत आहोत असं नाही ना ?
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈