वाचताना वेचलेले
☆ सुख म्हणजे नक्की काय असतं! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
सोलापूर इथल्या एका संस्थेने माझं दोन दिवसांचं मोटिवेशनल शिबिर आयोजित केलं होतं.
विविध वयोगटांतले आणि विविध व्यवसायातले शिबिरार्थी उत्साहाने सामील झाले होते.
शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता,’आनंदाने कसं जगावं?’
मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं.
प्रश्न अगदी साधा होता,
‘सुख म्हणजे काय?’
उत्तरं अगदी भन्नाट होती.
एकाने लिहीलं, निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख.
एकाने लिहिलं, घरात पत्नीने तोंड बंद ठेवणं म्हणजे सुख.
एक उत्तर होतं, सकाळी उठल्यावर संडासला साफ होणं म्हणजे सुख.
एकाचं उत्तर होतं, म्हातारपणी मुलं आधाराला जवळपास असणं म्हणजे सुख.
कुणाचं उत्तर होतं, भरपूर पैसा गाठीशी असणं म्हणजे सुख.
तर कुणी लिहीलं होतं की शरीर धडधाकट असणं म्हणजे सुख.
सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या.
साऱ्या शंभर शिबिरार्थींच्या सुखाच्या कल्पना जेव्हा मी एकत्र केल्या तेव्हा लक्षात आलं,
प्रत्येकजण कोणत्या तरी एका बाबतीत दु:खी आहे.
म्हणजे कुणाची बायको भांडखोर आहे, कुणाला बद्धकोष्ठाचा त्रास आहे, कुणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत.आणि ती उणीव त्या प्रत्येकाला टोचते आहे.
म्हणजे उरलेल्या नव्व्याणव टक्के बाबतीत तो सुखी आहे.
म्हणजेच काय तर प्रत्येकजण नव्व्याणव टक्के सुखी आहे आणि फक्त एक टक्का दु:खी आहे.
हे केवळ एक टक्का दु:ख आपण चघळत बसतोय आणि उरलेल्या ९९% सुखाकडे दुर्लक्ष करतोय.
आहे की नाही गंमत?
मी जेव्हा त्या साऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली तेव्हा सारेच चकित झाले.
हीच तर सुखाची गंमत आहे.
आपण सुखात असतो. पण आपण सुखात आहोत हेच आपल्याला माहित नसतं.
जेव्हा काही कारणामुळे त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात उणीव निर्माण होते तेव्हा आपल्याला कळतं, अरे… एवढा वेळ आपण सुखात होतो.
लहान असताना वाटतं, लहानपण म्हणजे परावलम्बित्व.
केव्हा एकदा मोठे होतोय आणि स्वत:च्या पायावर उभे रहातोय!
मोठं झाल्यावर वाटतं, किती टेन्शन रे बाबा.
प्रत्येक गोष्टीत टेन्शन.
जागा शोधायचं टेन्शन.
कर्जाचे हप्ते भरायचं टेन्शन.
ऑफिसमध्ये साहेबांना तोंड द्यायचं टेन्शन.
त्यापेक्षा बालपण किती सुखाचं होतं.
गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर वाटतं,
‘संसारसंगे बहु कष्टलो मी!’
केव्हा एकदा मुलं मोठी होतायत आणि या जबाबदाऱ्यांतून मोकळा होतोय.
मुलं मोठी होतात तेव्हा आपण वृद्ध झालेलॊ असतो.आणि गात्रं कुरकुर करू लागतात.
तेव्हा वाटतं, अरे तो बहराचा काळ किती सुखाचा होता!
माझे एक ज्येष्ठ मित्र रवीन्द्र परळकर अलीकडे बऱ्याच दिवसांनी मला भेटले.
शिळोप्याच्या गप्पा झाल्या. म्हटलं,“थोडे वाळलेले दिसताय. बरं नव्हतं की काय?”
तर ते म्हणाले, “प्रोस्टेट्च्या त्रासाने आजारी होतो.काय झालं, एक दिवस रात्री लघवी कोंडली.प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्यामुळे त्याचा भार ब्लॅडरवर आला होता आणि लघवीलाच होईना.ओटीपोटावर भार असह्य झाला.मी वेदनांनी गडाबडा लोळू लागलो.अख्खी रात्र पेनकीलर घेऊन काढली.
दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्टरना घरी बोलवलं, तर ते म्हणाले- युरॉलॉजिस्टकडे घेऊन जा.युरॉलॉजिस्टकडे जाऊन ॲडमिट व्हायला दुपारचे अकरा वाजत आलेले.म्हणजे गेले पंधरा सोळा तास मला लघवीला झालं नव्हतं.वेदना असह्य होत होत्या.
ब्लॅडर फुगून पोटातच फुटायची भीती निर्माण झाली होती.शेवटी एकदाचं मला ॲडमिट करुन घेण्यात आलं.आणि ब्लॅडर पंक्चर करुन सर्व युरीन बाहेर काढण्यात आली.त्या क्षणी माझ्या मनात विचार आला,
‘आपल्याला दिवसातून वेळेवर लघवीला होणं ही सुद्धा किती सुखाची गोष्ट आहे.’ “
परळकरांचं उदाहरण हे सुखाच्या शोधात दु:खी असलेल्या प्रत्येकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे.
हातपाय धडधाकट आहेत.
दोन घास पोटात जातायत हे सुख नव्हे काय?
रामराय कृपाळु होऊन पावसा- पाण्यापासून रक्षण करतोय हे सुख नव्हे काय?
घराबाहेर पडल्यावर मागे एक वाट पहाणारं दार आहे, हे सुख नव्हे काय?
’एका लग्नाची गोष्ट’ या प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं मला आठवतंय,
‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य असलं की ते, घरबसल्या मिळतं?’
मित्र हो, जाणिवांच्या खिडक्या सताड उघड्या ठेऊन विचार कराल, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप सुखी आहात.
चला तर मग, सगळ्या तक्रारी उडवून लावा.सारी निराशा झटकून टाका आणि आनंदाने जगू लागा.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈