? वाचताना वेचलेले ?

☆ ‘पहा देव कसे काम करतो…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

गोव्याला गेली होती आणि घरात मी एकटाच होतो. माझ्या कारचा चालकही एव्हाना त्याच्या घरी रवाना झालेला होता. बाहेर श्रावणसरी बरसायला सुरुवात झालेली होती.

औषधाचे दुकान फारसे दूर नव्हते. मला पायी सुद्धा जात आले असते. पण पावसामुळे रिक्षाने जाणेच उचित आहे असा विचार करून औषध घेण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो. घराशेजारीच असलेल्या राम मंदिराचे कांही बांधकाम सुरु होते. मंदिरातील मूर्तीसमोर हात जोडून एक रिक्षेवाला देवाची प्रार्थना करीत होता. 

मी त्या रिक्षेवाल्याला विचारलं, “काय रे, खाली आहे कां तुझी रिक्षा?” तो “हो” म्हणाला. मग मी त्याला विचारलं मला नेशील कां सवारी म्हणून?”

तो हो म्हणाला तसा मी त्याच्या रिक्षात बसलो. तो रिक्षावाला बराच आजारी असावा असं माझ्या लक्षात आलं. त्याच्या डोळ्यांमधून पाणी येत होतं. मग माझ्या कडून राहवलं नाही. मी त्याला विचारलं, “काय रे बाबा, काय होतंय तुला? आणि तू रडतोयस कशाला? तुझी तब्येतही ठीक दिसत नाहीये?”

ह्यावर तो उत्तरला, “सतत सुरु असलेल्या ह्या पावसाने मागील तीन दिवसांपासून भाडं मिळालेलं नाहीय, त्यामुळे रोजगार नाही, म्हणून पोटात तीन दिवसांपासून अन्नाचा कणही गेलेला नाहीय. आज तर अंगही दुखतंय. आताच देवाला प्रार्थना करीत होतो की देवा, आज तरी मला जेवण मिळू दे, आज तरी मला एखादी सवारी मिळू दे.” 

कांहीही न बोलता मी रिक्षा थांबवला आणि समोरच्या मेडिकल शॉपमध्ये गेलो. तिथे माझ्या मनात विचार आला की देवानेच तर मला ह्या रिक्षेवाल्याच्या मदतीला मुद्दामहून पाठविलं नसेल? कारण असं बघा की मला सुरु झालेला हा ऍलर्जीचा त्रास जर अर्धा तास आधी सुरु झाला असता तर मी माझ्या ड्रायव्हरकडून मला हवी असलेली औषधे आणवून घेतली असती. मला बाहेर पडण्याची जरुरी भासली नसती, आणि हा पाऊस नसता तर मग मी रिक्षेत सुद्धा कशाला बसलो असतो? 

मनातल्या मनातच माझ्या त्या मनातल्या देवाला मी विचारलं, “देवा, मला सांगा, तुम्ही त्या रिक्षेवाल्याच्याच मदतीसाठी माझी योजना केली आहे ना?” मला मनातल्या मनातच उत्तर मिळालं, ‘हो.’ 

देवाचे आभार मानत मी माझ्या औषधांसोबतच त्या रिक्षेवाल्यासाठीही औषधं विकत घेतली. जवळच्याच हॉटेलातून छोले पुऱ्या पॅक करून घेतल्या आणि रिक्षात येऊन बसलो. 

ज्या मंदिरापासून मी रिक्षा केला होता त्याच मंदिरापाशी परतल्यानंतर मी रिक्षेवाल्याला रिक्षा थांबवायला सांगितली, त्याच्या हाती रिक्षेचं भाडं म्हणून ३० रुपये ठेवले, गरम गरम छोले-पुरीचा पूड आणि त्याच्यासाठी घेतलेली औषधे त्याच्या हाती ठेवत त्याला म्हटलं, “हे बघ, छोले-पूरी खाणं झाल्यानंतर लगेच ह्या दोन गोळ्या घेऊन घे आणि उरलेल्या दोन गोळ्या सकाळच्या नाश्त्यानंतर घे आणि त्यानंतर मला येऊन तुझी तब्येत दाखवून दे.”

रिक्षेवाल्याचा डोळ्यांना पुन्हा पाणी आलं. रडत रडतच तो बोलला, “साहेबजी, देवाला तर मी केवळ दोन घास पोटांत पडू दे म्हणून प्रार्थना केली होती, पण त्याने तर माझ्यासाठी छोले-पुरी पाठवली. कित्येक महिन्यापासून आपण छोले-पुरी खावी अशी इच्छा मनांत होती, आज देवाने माझी ती इच्छा पूर्ण केली. मंदिराजवळ राहणाऱ्या त्याच्या भक्ताची त्याने यासाठी योजना केली आणि त्याच्याकडून हे कार्य करवून घेतले अशी माझी समजूत आहे.” तो आणखी बरंच कांही बोलत होता, भरभरून. पण माझं त्याकडे लक्षच नव्हतं.

घरी आल्यानंतर माझ्या मनांत आलं, ‘त्या हॉटेलमध्ये खाण्याचे बरेच पदार्थ होते, रिक्षेवाल्यासाठी मी कांहीही घेऊ शकत होतो, सामोसे, भाजी किंवा जेवणाची थाळी, कांहीही. पण मी नेमकं छोले पुरीच कां घ्यावी? रिक्षेवाला म्हणाला ते खरंच तसं आहेकां? देवानंच तर मला आपल्या भक्ताच्या मदतीसाठी पाठवलं नसेल? माझं ऍसिडिटी वाढणं, त्यावेळेस ड्रायव्हर घरी नसणं, नेमका त्याच वेळेस पाऊस पडणं  आणि मी रिक्षा करणं ही, तो रिक्षेवाला म्हणतो त्या प्रमाणे दैवी योजना तर नसेल ना?’  

आपण जेव्हा योग्य वेळी कुणाच्या साहाय्यासाठी धावून जातो तेव्हा त्याचा अर्थ इतकाच की आपण ज्याला मदत करण्यास उद्युक्त होतो त्याची प्रार्थना देवानं ऐकली आणि आपल्याला त्याचा (देवाचा) प्रतिनिधी म्हणून किंवा देवदूत म्हणून संबंधित व्यक्तीकडे पाठवलं. म्हणून आपल्या हातून घडलेलं चांगलं कार्य हे देवाने आपल्याकडून करवून घेतलं असं समजावं म्हणजे सत्कृत्याचा वृथा अभिमान होत नाही.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments