📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “गीती गाईन ज्ञानदेव…” कवयित्री – सुश्री लीना दामले ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

आनंद सागरी विहरीन। मुक्त होईन भवचक्रातून।

निरंजन समाधी घेऊन।। सांगती ज्ञानदेव ।।१।।

*

अवघा जनसागर निघाला। संतांसवे आळंदीला।

निरोप द्याया ज्ञानराजाला। बुडाला दुःखार्णवे ।।२।।

*

नामदेव व्याकुळ झाले। दुःखाने जणू पिसे लागले।

कसा राहू ज्ञानदेवा विणे। सांग बापा ।।३।। 

*

ज्ञानदेव समजावीती। नामदेवा वृथा शोक करिसी।

जडदेहाची नको आसक्ती। शरीर हे नश्वर ।।४।।

*

जे जे जगी उपजते। ते ते नाश पावते।

हे तो तुजसी ठावेच असे। नामदेवा ।।५।।

*

कसे समजावू तुजसी। ज्ञानवंत भक्त म्हणविसी।

हा शोक ना शोभे तुजसी। नामदेवा ।।६।।

*

निवृत्ती अंतरबाह्य शांत। सोपाना लीन ब्रह्मस्वरूपात।

मुक्ताई शांत शांत। वियोगाच्या कल्पनेत ।।७।।

*

कार्तिक वद्य त्रयोदशी। शुभ दिन शुभ वेळी।

निघती ज्ञानदेव समाधीस्थळी । सिद्धेश्वरा पास ।।८।।

*

समाधी स्थळ स्वच्छ केले। गोमयाने सारविले।

अंथरीली बेल,तुळशी अन फुले। आसनाभोवती ।।९।।

*

इंद्रायणीत स्नान केले। सुवासिनींनी ओवाळीले।

चंदन उटी लावली नामदेवे। ज्ञानदेवांसी ।।१०।।

*

शांत संयत चाल। कंठी तुळशीची माळ।

चालले ज्ञानदेव। वैकुंठासी ।।११।।

*

सद्गुरू निवृत्तीनाथांसी वंदिले। शुभ आशिष घेतले।

नतमस्तक ज्ञानदेव। गुरू पुढती ।।१२।।

*

नामदेव, निवृत्तीनाथ। घेऊन चालिले ज्ञानदेवास।

बसविले आसनी विवरात। भरल्या कंठी ।।१३।।

*

नंदादीप चेतविले। रत्नदीप प्रकाशले।

अवघी समाधी उजळे। स्वर्गीय प्रकाशात ।।१४।।

*

पद्मासनी बसून। भावार्थ दीपिका समोर ठेवून।

मुखावरी दिव्य हास्य लेवून। घेतले नेत्र मिटून ।।१५।।

*

समाधिस्त ज्ञानेश्वर होती। थरथरत्या हाती जड शिळा बसवती।

नामदेव समाधीवरती। जड अंतःकरणे ।।१६।।

*

ज्ञानसूर्य बुडाला। घन अंधकार पसरला।

शोक अपार दाटला। वैष्णवांच्या मनी ।।१७।।

*

ज्ञानियांचा राजा गेला। नामदेव दुःखार्णवी बुडाला।

निवृत्तीनाथ समजावीती त्यांना। अपार स्नेहे ।।१८।।

*

कुठे न गेले ज्ञानदेव। इथेच आहे ज्ञानदेव।

चराचरी भरले ज्ञानदेव। संजीवन समाधी घेऊन ।।१९।।

*

सगुण समाधी घेऊन। अमर झाले ज्ञानदेव।

पूर्णानंदी राहे सदैव। सिद्धेश्वरा पास ।।२०। 

कवयित्री : सुश्री लीना दामले (खगोलीना)

प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments