स्व. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित)
वाचताना वेचलेले
☆ तीन शब्दांची कविता….स्व. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित) ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆
इंदिरा संतांची वाक्यागणिक तीन शब्दांची कविता…..???
अक्कु बक्कुची दिवाळी – ईंदिरा संत
आला मामाचा सांगावा
अक्कु बक्कुला पाठवा
आली जवळ दिवाळी
दोघी येतील आजोळी
घरी मोटार आणेन
घेऊन दोघींना जाईना
दोघी आनंदाने फुलल्या
आईभोवती नाचल्या
दारी मोटार येणार
मामा घेवुन जाणार
मामा आम्हांला नेणार
आम्ही आजोळी जाणार
आई मुळीच बोलेना
काम हातचं सोडेना
अक्कु सुजाण थांबली
मिठी आईला घातली
का गं मुळी ना बोलशी
सांग धाडते तुम्हाशी
घेवुन दोघींना जवळ
आई बोलली प्रेमळ
तुम्ही दोघीही जाणार
कशी तयारी होणार
बरे कपडे रोजला
कोरे चांगले सणाला
खण रेशमी मामीला
एक खेळणे बाळाला
नाही पगार अजुन
कसे यावे हे जमुन
दोघी मुळी न रुसल्या
दोघी निमुट उठल्या
काचा कवड्या खेळत
दोघी क्षणात रंगल्या
उद्यापासुन दिवाळी
घरी नाहीत चाहुली
नाही फटाके सामान
नाही खमंग तळण
दोन पणत्या दारात
दोन बहिणी घरात
बक्कु जराशी रुसली
अक्कु निमुट राहिली
दोघी बसल्या दारात
रस्ता उधळी दिवाळी
आली मामाची मोटार
आली मामाची मोटार
अक्कु सांगते कानात
बक्कु ऐकते शहाणी
दोघी करिती स्वागत
मामा बसले चहाला
दोघी गळ्यात पडल्या
आत्या उद्याला येणार
आम्ही येथेच राहणार
आम्ही येथेच राहणार
नाही येणार येणार
शब्द ऐकोनी दोघींचे
डोळे स्तिमित आईचे
किती किती ते सामान
मामा आणती काढुन
खोकी दारुच्या कामाची
खोकी परकर झग्याची
एक रेशमी पातळ
दोन डब्यात फराळ
नाही येणार म्हणुनी
आहे दिलेले मामीने
तुम्ही ताईच्या माळणी
दोघी गुणाच्या गवळणी
तुमचे गुपीत कळाले
डोळे मामाचे भरले
आला मामाला गहिवर
घेता दोघींंना जवळ
मामा जाताच निघुन
आली दिवाळी धावुन
नव्या झग्याच्या झोकात
दारु शोभेची बरसात
नव्या झग्याच्या झोकात
दारु शोभेची बरसात
सरसर कारंजे उडाली
तारामंडळे फिरली
-इंदिरा संत
?????
अप्रतिम कविता, आपल्या पिढीतल्या अनेकांच्या घरातली कथा (की व्यथा), कितीही ओळखीची असली तरीही डोळे पाणावतातच
हो ना?
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈