श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ महिला संपावर… – कवी : डी . आर. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
☆
महिला साऱ्या संपावरती
जाऊन बसल्या अवचित
बघूनी त्यांचा रुद्रावतार
पुरुष झाले भयभीत
*
रोज सकाळी उठल्यावर
आयता मिळे चहा
हवं तेव्हा नाश्ता, जेवण
मिळत होते पहा
*
आंघोळीला पाणीदेखील
बायको देई गुणी
आता तोंड धुण्यासही
तांब्यात मिळेना पाणी
*
शाळेत मुले डबा घेऊन
जात होती कशी
आता कपभर चहा नाही
कोपऱ्यात पडली बशी
*
रविवारच्या दिवशी कसा
पूर्वी मिळे आराम
आता मात्र नशीबी आले
बारीकसारीक काम
*
हॉटेलमध्ये करता जेवण
बिघडून गेले पोट
पैसे देऊन भोजन नाही
उगाच बसली खोट
*
घरात कुणी आले गेले
सरबराई होईना
बाहेरूनच बोले पाहुणा
मध्ये कुणी फिरकेना
*
साऱ्यांचेच अडले घोडे
पाऊल पुढे पडेना
महिलांविना कुणाचे
काम एक होईना
*
मुले, पुरुष, तरुण
सारेच गेले चक्रावून
कळली हो स्त्रीची महती
प्रचिती आली पाहून
*
नम्रपणे त्यांनी केली
महिलांची मनधरणी
महापुरुषही लीन झाले
डोळ्यांत आले पाणी
*
खुदकन महिला हसल्या
वदल्या–” कशी वाटली नारी ?”
हात जोडुनी सारे बोलले
–” दुर्गे दुर्घट भारी “
☆
कवी :श्री. डी. आर. देशपांडे
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com