वाचताना वेचलेले
☆ ‘वडिलांना पत्र…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
प्रिय बाबा,
तुमचं आणि आईचं पत्र मिळालं.आपल्या भावना पाहून खूप वाईटही वाटलं. तुम्हाला माझी गरज आहे, हे कळतंय हो बाबा. आई आणि तुम्ही आता थकलाय. माझी तुम्हाला प्रचंड आठवण येते. मी जवळ असावं, असं वाटतंय. त्याला जबाबदार बाबा, मीही नाही आणि तुम्हीही नाही.
तुमच्या आशीर्वाद आणि इच्छेनं मी अमेरिकेत बिझी आहे. तुमच्या अभिमानाचे फळ आहे मी, बाबा.
मला कळतंय, तुमच्या जवळ यायला पाहिजे, तुमचं दुःख वाटून घ्यायला पाहिजे , तुमच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत.पण या अमेरिकेत सगळं आहे फक्त वेळच नाही.कारण प्रांताची दुरी , मुलांचं शिक्षण , कामाचा लोड किती जरुरी आहे हे कसं सांगू तुम्हाला? मनात असूनही मी तुमच्याकडे येऊ शकत नाही.
मला व्हाट्सअपवर खूप मेसेज येतात. आई -वडिलांच्या कष्टाचे , त्यागाचे , प्रेमाचे. वाचलं की खूप वाईट वाटतं. बाबा, या सगळ्याला मी एकटा जबाबदार आहे?
आज धाडस करून तुम्हाला प्रश्न विचारतोय की एवढी संवेदनाशून्यता माझ्यात कुठून आली? बाबा उत्तर देऊ शकाल ? मला लहानपणी कुठं माहीत होत की इंजिनिअरिंग काय आहे? परीक्षा काय आहे? पैसा काय आहे?
मला फक्त हेच कळत होतं की बाबांनी मला मिठीत घ्यायला पाहिजे , आईस्क्रीम- भेळ माझ्या बरोबर खायला पाहिजे. आईनं मला भरवायला पाहिजे, माझ्याशी खेळायला पाहिजे.
त्या वेळी माझ्यासाठीच तुम्ही कष्ट करत होता. कधी तुमच्या जवळ येऊन बसलो तर फक्त अभ्यास कर , हा क्लास जॉईन कर ,असं वाग, तसं वाग…. याव्यतिरिक्त बाबा आपण दुसरं काय बोललोय, तुम्हाला आठवतंय का?
आईने सतत दुसऱ्या नातेवाईकाची मुलं कशी आहेत, हे सांगता सांगता तिचं बाळ काय मागतंय, हेच तिच्या लक्षात आलं नाही.बाबा, मी तुम्हा दोघांची चूक काढत नाही. मी एवढा मोठाही नाही.
पण अमेरिका काय आहे, पोस्ट काय आहे , पैसा काय आहे ,सुविधा काय आहेत , रुतबा काय असतो हे सगळं मी तुमच्या मांडीवर बसून शिकलोय. आईच्या नजरेतून मला कळायचं की या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत.
रात्रंदिवस फक्त आणि फक्त हेच शिकवलं की पोस्ट / आय आय टी /पैसा, मोठया पदांच्या नातेवाईकाची किंमत किती महत्त्वाची असते.
आईने जेवण देताना , दूध पाजताना , शाळेत जाताना , शाळेतून येताना हेच शिकवलं की माझा राजाबेटा खूप मोठा होणार , खूप पैसा कमावणार , हवेत उडणार आणि ह्या तुमच्या इच्छा पुऱ्या व्हाव्यात म्हणुन कितीतरी नवस केले.
बाबा, मला एवढं संवेदनाशून्य आयुष्य का दिलं? का असं मला घडवलं?
बाबा,आई, सगळा दोष माझाच आहे का हो?
-आपला पुत्र
प्रत्येक आई वडिलांनी विचार करणं गरजेचं आहे की मुलांचा सर्वांगीण विकास करायचा की त्याला एक यंत्र बनवायचं?
शिक्षण तर अतिशय महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा काकणभर जास्त महत्त्वाची आहे नैतिकता, राष्टप्रेम. मातीची गावाची आत्मीयता. आपण काही चूक तर करत नाही ना?
प्रत्येक आई बाबांनी विचार करावा असा विषय .
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈